दिवाना


चित्रपटाचा नायक आनंदात सकाळी कंपनीच्या बसने कंपनीत चाललेला असतो. पावसाच्या सरीने वातावरण अधिकच रोमेंटिक बनवले असते. त्यात नायक नायिकेच्या आठवणीत, तिला भेटण्याची त्याची इच्छा. खुपचं अधीर झाला असतो तो. तिच्यासाठी तो ‘दिवाना’ झालेला असतो. कंपनीत पोहचल्यावर, त्याच्या डोक्यात आज नायिकेशी कस बोलावं अगदी, तिला काय म्हणावं असे सगळे विचार त्याला गोंधळून टाकत असतात. कंपनीत आल्यापासून त्याला तिची आठवण इतकी सतावत असते की सारखा सारखा तिच्या बसण्याच्या जागी दर पाच दहा मिनिटांनी पाहत असतो. पण नायिका काही येत नाही.

शेवटी कंटाळून, कॅन्टीनमध्ये नाश्ता करावा या उद्येशाने तो कॅन्टीनमध्ये जातो. नाश्ता घेण्यासाठी नायिकेचा एक मित्रही तिथे असतो. तो नायकाकडे पाहत असतो. नायक ज्या ठिकाणी नाश्त्याची वाट पाहत बसलेला असतो. त्याच्या शेजारील खुर्चीत येऊन बसतो. नाश्ता घेऊन आल्यावर नायक नायिकेच्या मित्राला आपल्या जागेच्या बाजूला बसलेला पाहतो, ओळख नसल्याने तो त्याची जागा बदलतो. आणि त्याच्यापासून थोडा लांब असलेल्या ठिकाणी बसतो. पण त्याच ‘रो’ मध्ये. नायकाला प्रत्येक घासागणिक त्याला नायिकेच्या गोष्टी आठवत असतात. ती किती सुंदर आणि छान आहे. तिचे ते हसणे, बोलणे सगळ्या सगळ्या गोष्टींमध्ये तो रममाण झालेला असतो. तेवढ्यात नायिका कॅन्टीनमध्ये येते. नायक आणि नायिकेची नजरानजर होते. पण ती बघून न बघितल्याप्रमाणे करते.

नायक तिला ‘हाय’ करणार तेवढ्यात बाजूला बसलेला नायिकेचा मित्र नायिकेला ‘हाय’ करतो. आणि ती देखील त्याला. नायक उदास चेहऱ्याने मान खाली घालून घास गिळायला सुरवात करतो. नायिका निघून गेल्यावर, नायकाचा एक मित्र कॅन्टीनमध्ये येतो. नायकाला बघून तो त्याच्या सोबत नाश्ताला येऊन बसतो. दोघेही गप्पा मारायला सुरवात करतात. थोड्या वेळेतच नायिका देखील पुन्हा नाश्ता करायला कॅन्टीनमध्ये येते. आणि नायकाच्या बाजूची एक खुर्ची सोडून बसते. नायक मनोमन सुखावतो. पण यापुढे घडणार्या घटनांचा अंदाज नसतो म्हणून. त्याच्या मनात ते ‘मुझसे शादी करोगी..’ हे गाणे सुरु असते. थोड्याच वेळात नायिकेचे अजून काही मित्र मैत्रिणी जमतात. त्यांच्या गप्पा इतक्या रंगलेल्या पाहून नायक थोडा, नाराज होतो.

थोड्या वेळाने पाहतो तर त्याचा मित्रही नायिकेला न्याहाळत असतो. नायक वैतागतो. भराभरा नाश्ता संपवून आपल्या मित्राला ‘चल’ म्हणून त्याला तिथून काढतो. आपल्या जागेवर येऊन बसल्यावर कामात डोक घालण्याचा निरर्थक प्रयत्न करतो. पण त्याचे नायिकेच्या आठवणी सोडून दुसरीकडे कुठे लक्षच लागत नसते. कसे बसे कामात लक्ष घालतो. आणि कामाला सुरवात करतो. थोड्या वेळाने नायिकेला पाहण्यासाठी नायक नायिकेच्या डेस्ककडे पाहतो तर, नायिका तिच्या बाजूला बसणारा एक ‘हिरो’शी बोलत असते. नायक थोडा खिन्न होतो. तिच्याशी बोलण्यासाठी तो तिच्या बर्याच फेर्या मारतो. पण ती त्याच्याकडे मुळी लक्षच देणे टाळते. दुपारी जेवणाची इच्छाच नायकाची मरून जाते. दिवस जात असतो. आणि नायिका तिच्या शेजारील ‘हिरो’ सोबत गप्पा मारणे चालूच. नायक ‘जळत’ राहतो. नायिका मात्र आनंदी. नायकाचे डोके तिच्या विचारांनी दुखायला लागते.

कंपनीतून निघतांना देखील तो नायिकेला ‘बाय’ म्हणावे म्हणून पुन्हा पाहतो तर, ती बाजूवाल्याशी हसून बोलतांना पाहतो. आता मात्र नायक दुखी होतो. त्याचा रडका चेहरा कसाबसा ठीकठाक करतो. पण त्याचे डोकेदुखी काही कमी होत नाही. सकाळी येतांना केलेल्या सर्व योजना धुळीस मिळालेल्या असतात. त्याला तिचा चेहरा सोडून दुसरे काहीच आठवत नसते. त्याला नायिकेचा राग येतो. आता नायक नायिकेने स्वतःहून बोलले तरच बोलायचे अस मनोमन ठरवून टाकतो. पण पुन्हा तिच्यावर प्रेम देखील येत असते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.