दिवाळीची भेट


ताज ताजातवाना झाला. काय बुवा! आज त्याला भेटायला ‘ओह मामा’ येणार. गेल्या तीन दिवसांपासून सुरक्षा रक्षकांनी केलेली तयारी त्याने पाहिली आहे. बाजूचा त्याचा जुना दोस्त गेटवे हसत ‘ताज’ला बोलला ‘काय, झाली का रे तयारी तुझी?’. ताज ‘हो तर!, मलाही जगाच्या आणि विशेषतः अमेरीकांना मामा करणाऱ्या ओह मामाचे दर्शन घ्यायचे आहे’. ‘काय?’ गेटवे गडबडून बोलला. ताज म्हणाला ‘तुला कळेल तो आल्यावर’. मरीन गप्पा ऐकून हसू लागली. डीएन ने हे पाहून तोंडावर बोट ठेऊन शांत रहायची सूचना मरीनला केली. सीएसटी ‘टी’ घेत किलकिल्या नजरेने ताजला म्हणाला ‘ते तुझ्या डोक्यावर ती छत्री उलटी का लावली आहे?’. ताज ‘अरे ही त्या मामाने पाठवली आहे. मेड इन अमेरिका. त्या छत्रीला रडार म्हणतात. त्याच्या संरक्षणासाठी’.

सीएसटी आश्चर्यचकित होवून बोलला ‘कसं काय रे? पावसाळा तर संपला ना आता’. चर्चगेट खो खो हसू लागला. कुलाबा चर्चगेटला शांत करीत सीएसटीकडे पहात बोलला ‘अरे ते नवीन तंत्रज्ञान आहे रे. बस अस समज की त्याचा उपयोग करून अमेरिका इथे लक्ष ठेऊ शकते’. ताज ‘हो, बरोबर’. ‘कमाल आहे बुवा’ सीएसटी उत्तरला. गेटवे ‘मला अस कळल आहे की, शॉकला आणि भुजंगरावला बोलावले नाही आहे’. हे ऐकताच हुतात्मा आनंदून बोलला ‘खरंच! देव पावला म्हणायचा’. ताज ‘का रे? काय झालं तुला इतकं आनंद व्हायला’. हुतात्मा ‘ ते आले की मला भीती वाटायला लागते रे, कुणास ठाऊक आपल्याही जागेवर आदर्श झाली तरी’. सीएसटी घाबरून ‘नको रे बाबा! मला तर त्या पुण्याच्या भाईची सुद्धा भीती वाटते’. मरीन ‘हो ना!’. गेटवे ‘ते सोडा रे, कसा दिसतो रे तो अमेरिकेचा मामा?’. मरीन ‘इश्श्य! किती हॅंडसम, अगदी माझ्या राहू सारखे!’. डीएन ‘ए खुळी की काय तू?’. मरीन ‘तू चूप बैस, निदान तुझ्यापेक्षा तरी जास्तच गोरा आहे. आणि मऊसुद्धा. मला ना, तो कधी येतो अस झालं आहे’.

गेटवे ‘प्रेमात पडली की काय त्याच्या?’. मरीन ‘इश्श! आम्ही नाही जा’. सगळेच हसू लागतात. तिकडून वाशी येते. वाशी ‘कोण रे बराक? तो येणार म्हटल्यापासून माझी तर बरकतच होती आहे’. ‘ती कशी वाशी?’ ताजने विचारले. गेटवे बोलला ‘अरे तुझ्या डोक्यावर उलटी छत्री, वाशीच्या रस्त्यांवर रंगरंगोटी सरकार महानगरपालिका करीत आहे’. महानगरपालिकेचा विषय निघताच, एक सुंदर तरुणी येऊन उभी राहिली. सर्वांनी आश्चर्यकारक होवून पाहायला लागले. सीएसटी उठून उभा राहिला. आणि नकळत त्याच्या तोडून ‘हाय!’ बोलले गेले. ती लाजली. मरीनने विचारले ‘कोण ग तू?’. ती म्हणाली ‘वाटलंच मला’. गेटवे ‘म्हणजे?’. ती हसून म्हणाली ‘मी मुंबई. तो काळा मला पाहायला येणार म्हणून राज्यकर्त्यांनी मला हे माझ रूप दिले आहे’.

ताज गोंधळून म्हणाला ‘मग तू आधी काळवंडलेली, म्हातारी आणि घाणेरडी कशी होतीस?’. ती उदास चेहऱ्याने ‘तो ओह मामा गेल्यावर पुन्हा मी तशीच बनेल’ अस म्हणाली. सीएसटी तीच्या म्हणण्याचा अर्थ समजून गेला. पण बाकीचे गडबडून तिच्याकडे पहात होते. सीएसटी तिच्याकडे पहात ‘काहीही असो, तो मामा येणार म्हणून का असेना. पण तू आज खुपंच छान दिसतेस’. ती त्याच्याकडे पहात ‘मी अशीच होते आधी. पण या राज्यकर्त्यांनी आणि या पाहुण्या लोकांनी मला विद्रूप केली’. सीएसटी उदास ‘मी समजू शकतो. रोजच किती लोक येतात. आणि तुला त्रास देतात’. आता ताज आणि अन्य सर्वांना उमगले. ताज बोलला ‘हम्म! दिवाळीची भेट म्हणा हवं तर’. मरीन डीएनकडे पहात ‘ओह मामाची दिवाळी भेट’. सर्व जण हसू लागले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.