दिशा आणि दशा


दैनंदिन कामाच्या गराड्यात आपण आपल्यालाच विसरून जातो! दिशा नसतेच! आपल्याला काय करायला हवे वा आपल्याला जे करायचे असते ते न होताच आपण गुंतून पडतो. कधीकधी कामाचा व्याप एवढा वाढतो की आपण जे ठरवलेलं असत ते देखील विसरून जातो! अगदी आठवीपासून न चुकता अर्थर्वशीर्ष, रामरक्षा व मारुतीस्तोत्र म्हणायचो! गेल्या वर्षभरापासून ते कामामुळे रोजच राहून जायचं. पुन्हा सातत्य यायला वर्ष गेलेलं.

अनेकदा कामाच्या व्यापामुळे अनेक गोष्टींना सुट्टी द्यावी लागते. मग कधी वेळ मिळाला तर त्याची आठवण होते. व गेलेल्या वेळेचं गणित काही केल्या बसत नाही. मुळात आपण जन्म कशासाठी घेतला व आपल्याला काय करायचे याचाही आपण कधी विचार करीत नाही. त्यामुळे दिशाहीन आपला वारू उधळतो! आपण फार काम करतो. त्यात व्यस्त देखील असतो. वर्षानुवर्षे गुंतून पडतो. व वयाच्या संध्याकाळी आपल्या इच्छा आपल्याला आठवतात. आपण व्याकुळ होतो. त्या इच्छा स्वस्थ बसू देत नाहीत. आणि मग आपण इतरांना त्या सांगून नाहक त्रास देतो. हाहा! हे टाळायचं असेल तर दिनक्रमात स्वतःसाठी वेळ काढा! व्यायाम, मनन, चिंतनसारख्या गोष्टी आणा.

खरं तर हे सांगण्याआधी मला या गोष्टी आणायला बराच मोठा काळ जाऊ द्यावा लागला. जेव्हा लक्षात आलं की आपल्याला काय करायचंय तेंव्हा जवळपास इतरांकडे नोकरी करण्यात एक दशक उलटून गेलेलं! आता दोन वर्षांपासून व्यवसायात आनंदाने धडपडतो आहे! अडचणी आहेत पण त्या सोडवतांना आनंद देखील आहे! त्यामुळे विचार करा काय करायचं आहे. आणि जीवनाला दिशा द्या नाहीतर दशा करून फक्त दुःखच मिळेल!


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.