द बॉस


जगातील सर्वात भयानक प्राण्यांमध्ये ‘बॉस’ हा प्राणी गणला जातो. काही वैज्ञानिकांच्या मते, डायनासोरपेक्षाही हा भयानक प्राणी आहे. हा प्राणी कंपन्यामध्ये आढळतो. हा प्राणी जणू दिसायला सर्वसामान्य असला तरी फारच भीतीदायक असतो. हा प्राणी, साधारणतः केबिनमध्ये बसून कंपनी नावाचा रथ हाकत असतो. रथाला जुंपलेले घोडे, त्याच्या भाषेत ‘गाढवं’ तो रथ रक्ताचे पाणी करून ओढत असतात. परंतु नेहमी त्याला कामाचा घडा अर्धा रिकामाच दिसतो.

प्रत्येक सेवक त्याला ‘सर्’ म्हणून हाक मारतो. आणि तो त्या हाक मारणाऱ्याला ‘कामचोर’. कामाचा खजिना सेवकापुढे रीता करतांना, तो कधीच वेळेचा विचार करीत नाही. दिवस रात्र त्याच्यापुढे समान. काम अवघड असो अथवा सोपे कोणतीही गोष्ट त्याला  ‘ताबडतोप’च हवी असते. आणि झालेल्या कामावर कायम नाखुश राहणे हाच पिंड. आणि ‘समथिंग डिफरंट’ हे त्याचे ब्रीदवाक्य. ह्याचे ‘लाड’ पुरवतांना सेवकाच्या केसाच्या रंगात ‘डिफरन्स’ यायची वेळ येते. पण ह्याच काय ‘समथिंग डिफरंट’ काय संपत नाही.

ह्या प्राण्याची एक खासियत म्हणजे नेमक्या सेवकाची जेवणाची किंवा घरी जाण्याची वेळ आणि काम सांगायची वेळ नेहमी एकाचं वेळेस येते. झाक टायमिंग करतो हा प्राणी. आणि नेहमीप्रमाणे ‘काम’ प्रायोरिटीवरच असते. काय म्हणतात ते ‘पी वन’. हा प्राणी सेवकाचे डोके ‘खातो’. हेच एकमेव आवडते खाद्य. वेळप्रसंगी सेवकाला झाप झाप झापून हा प्राणी आपले फस्टट्रेशन दूर करतो. हिटलरने जातांना त्याने त्याची ‘डायरी’ ह्यांच्याकडे सोपवून गेला की काय ह्याची शंका सेवकांना पदोपदी येते. हिटलर कसा होता? याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘बॉस’. आणि सेवक त्याच्यासाठी ‘सॉस’. ‘बॉस’ला नेहमीच सेवक वेळ ‘लॉस’ करतात, असा समज.

यदाकदाचित स्वामी विवेकानंदांनी एखाद्या कंपनीत नोकरी केली असतो तर ‘मी कोण?’ हा प्रश्न पडलाच नसता. बॉस नावाच्या प्राण्याने इतक काम वाढवून दिल असत की, स्वामीजींना प्रश्न पडण्यापुरता देखील वेळ मिळाला नसता. त्यामुळे, कदाचित विश्वविख्यात झालेली भारतीय ‘योगा’च्या ऐवजी कदाचित बॉसची शिक्षा ‘भोगा’ विश्वविख्यात झाले असते. कदाचित माउलींनी देखील मग ‘बॉस जे वांछिल तो ते लाहो’ अस म्हणाले असते. बॉसला कधीही आपल्या सेवकाने सांगितलेली चूक ही अपमानच वाटते. अस करण्याने हा रक्तपिपासू प्राणी चवताळतो. त्यामुळे, बॉस प्राण्याला अस ‘डिस्टर्ब’ करा पण ‘ऑन युअर रिस्क’.

काल माझ्याकडून अशीच एक ‘चूक’ झाली ज्याची तासभर जास्तवेळ बसून शिक्षा भोगावी लागली. सर्व्हरवर चेंजेस केल्यावर बॉसकडे झालेले चेंजेस दिसेना. म्हणून मी दोनदा कोड चेक केला. परंतु, तरीही बॉसच्या पीसीवर चेंजेस दिसेना. थोड्या वेळानंतर मी बॉसला ‘पेज रिफ्रेश’ करून पहा अस म्हणण्याची खूप मोठी चूक केली. आणि केलेले चेंजेस दिसू लागताच माझ्या कंपनीचा ‘कृष्ण’, सारथी उर्फ बॉस दुखावला गेला. आणि त्यानंतर बॉसने दिलेली अर्जंट कामाची शिक्षा भोगावी लागली. आता ही चूक करण्याची ही दुसरी वेळ आहे. एकूणच हा बॉस नावाचा प्राणी इतर सेवक प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. त्याच्याच शब्दात ‘समथिंग डिफरंट’.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.