धीर धर रे मना


धीर, धैर्य ही खूप मोठी गोष्ट आहे. आता हे सांगण्यासाठी मला साधारण तीन वर्षे घालवावी लागली. खरं तर माझा मूळ स्वभाव चंचल! एखाद्या खुशाल चेंडूप्रमाणे जीवन चाललेले! कशाची फिकीर नाही. कोणतीही अडचण नाही. शालेय जीवनात साधारण विद्यार्थी ते आजचा एक धडपडणारा उद्योजक! पण जस जसे धैर्य वाढत गेले. तसं तसे त्याचे महत्वही उमजत गेले. 

माझा लहान भाऊ! हुशार नाहीतर अतिरेकी हुशार गटात मोडणारा! शालेय जीवनापासून पहिल्या क्रमांक वगैरे मिळवणे. अगदी खेळातही! मग जो काही घरच्यांचा अन आजूबाजूच्यांचा ज्ञानाचा वाटेकरी मीच होऊन जायचो. आता इतका हुशार भाऊ भेटण्याचेही अनेक तोटे असतात. सगळेजण सांगायचे, ‘तो बघ आणि तू बघ!’. फार राग यायचा त्यावेळी! पण बंधुराज तितकेच लाडके! त्यामुळे राग शांत व्हायचा. हाहा!

एकच गोष्ट त्यामुळे झालेली. प्रत्येक गोष्टीत मी स्वतःला कमी समजायला लागलेलो. प्रत्येकवेळी मी चुकीचाच ही भावना बळावलेली. थोडक्यात न्यूनगंड. अगदी पहिली नोकरी मिळेपर्यंत असे चाललेले. पुढे हळूहळू न्यूनगंड संपला. पण चंचल स्वभाव अनेकदा निर्णय घेतांना भोवयाचा. चूक मग महागात पडायची.

थोडाफार हट्टीपणा असल्यामुळे धीर व चिकाटी सारख्या गोष्टींचे दर्शन झाले. जोपर्यंत हवे ते मिळवण्याची उत्कट इच्छा निर्माण होत नाही. तोपर्यंत तुम्ही धीर धरू शकत नाही. धीर म्हणजे शांत महासागर. जोपर्यंत हवे ते मिळवत नाही तोवर थांबणार नाही हा हट्टच सातत्य निर्माण करतो. मिळेपर्यंत निश्चल राहणे धैर्य निर्माण करते. मग कितीही राग आला तरी तुम्ही ध्येयाचाच विचार करता.

चिंता अन प्रश्न मग गौण होतात. तुमचे धैर्य तुम्हाला अढळ बनवते. ध्येयाचा हा प्रवास ध्येय गाठेपर्यंत चालतो. मग येणाऱ्या अडचणींचा देखील आनंद घेता येतो. अनुभवातून धीर धरण्याची क्षमता वाढते. खरं तर प्रत्येकजण आपापल्या अनुभवानुसार निर्णय ठरवतो. मीही त्यातील एक.

धीर धरण्याचे कौशल्य मनाला शिकवले. तर अनेक प्रश्न सुटतात. ज्यावेळी व्यवसाय सुरु केला. त्यावेळी धैर्याची परीक्षा सुरु झाली. आर्थिक व मानसिक अडचणींचा डोंगर उभा राहिला. पण ह्या धैर्याने त्यातून बाहेर काढले. कोणतेही काम कधी वाया जात नसते. मार्ग निघू शकतात. अडचणी सुटू शकतात. गरज आहे धीर धरण्याची. वेळ हा रामबाण इलाज आहे. प्रयत्न करून पहा. मग लक्षात येईल. अनेक क्षण कदाचित यक्षप्रश्न वाटेल. पण थोडं ठामपणे उभे राहिलो तर प्रश्न सुटेल!

,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.