नाही


संपली एकदाची उत्कंठा! तिला बघायला काल गेलो होतो. लुक सोडला तर बाकी सगळ छान आहे. असो, आई-वडिलांना ते स्थळ योग्य वाटत आहे. त्यामुळे आज सकाळपर्यंत मी फारच गोंधळून गेलो होतो. ‘प्रत्येकात काही ना काही कमी असते. कुठे ना कुठे काही तरी तडजोड करावीच लागेल’ अस वडील म्हणत होते. पण खर सांगू का, तिला पाहून काहीच वाटत नव्हते. काही तरी इच्छा निर्माण व्हायला हवी ना!

रात्री आईसोबत या विषयावर बोललो. तर ती ‘तुला आवडेल तिच्याशीच लग्न तुझे करूयात. अजून स्थळ बघता येतील’. सकाळी बहिणाबाईला सांगितले. तर ती देखील ‘आवडली नसेल तर नको म्हणून सांग. टेन्शन कसले घ्यायचे त्यात?’. मग कुठे गोंधळ संपला. असो, काल तिच्या घराचा पत्ता शोधायला फार वेळ लागला नाही. तिच्या शेजारचे आजोबा रस्त्यात भेटले. त्यांनीच घर दाखवले. निगडीतच असल्याने जाणे मुळात सोपे होते. तिच्या घरचे स्वभावाने खूप चांगले आहे. आणि तिचा स्वभाव देखील. पण काहीही झाल तरी ती ‘सांगलीकर’. म्हणजे सध्याला देखील तिथेच असते. इथे नातेवाईक असतात. त्यामुळे ती पाहण्याच्या कार्यक्रमाला इथे आलेली होती.

ती खूपच साधी आहे. म्हणजे आम्ही जवळपास तासभर तिथे होतो. पण तिने मोजून दोनदा माझ्याकडे बघितले. आपल्या मराठी मुली खूप साध्या भोळ्या असतात. पण पुण्यातील मराठी मुली नाही. त्या जरी मराठी असल्या तरी, त्यांना साध्या भोळ्या म्हणणारा ‘साधा भोळा’ म्हणावे लागेल. म्हणजे मी, ज्या मुलींना भेटलो आहे त्यावरून म्हणतो आहे. कारण मी जे पहिले स्थळ बघितले ते पुण्यातीलच. त्यामुळे तिच्याशी बोलतांना आणि काल जिच्याशी बोललो तिच्याशी यात खूप जमीन अस्मानाचा फरक होता. काल जिला भेटलो. आणि याआधीही जे एक स्थळ बघितले. त्यावरून जनरल त्यांच्या अपेक्षा मुलगा ‘चांगल्या नोकरी’ असलेला आणि ‘सुस्वभावी’ असावा ह्या. इतक्या माफक अपेक्षा.

पण आमच्या पुण्याच्या मुलींच्या ‘तो पुण्यातीलच असावा,  चांगली गलेलठ्ठ पगाराची नोकरी, आई वडील सोबत नको’ ह्या बेसिक अपेक्षा असतात. अजून अनेक असतात. त्यावर काही बोलून फायदा नाही. कारण, अपेक्षा ठेवण्यात काही गैर नाही. त्या असतातही छान. एकदम डोक्यावरचे एक मणाचे ओझे कमी झाल्याप्रमाणे वाटत आहे. आज मूडही मस्त आहे. फार काही बडबड करत नाही. थोडक्यातच ‘गोडी’ असते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.