न संपणारा चित्रपट


आजकाल रोज एक नवीन समस्या. आणि रोज नवीन अडचण. काय करावं तेच सुचत नाही. माझ्या ‘थेअरी’ मास्तर मित्र रोज एक नवीन आयडिया देतात. एकाने मध्यंतरी, तू हा चित्रपट पहिला आहेस का? नाही म्हटल्यावर तो तरी पहिला असशील असे प्रश्न विचारून भंडावून सोडले. मागील आठवड्यात एकाने समस्या सोडवण्यासाठी ‘दबंग’ पहा म्हणून सल्ला दिला. ठीक आहे म्हणून तो ‘दबंग’ पहिला. पाहून समस्येवर उत्तर मिळण्याऐवजी ‘डोके भंग’ झाले. काय बोलावं त्या महाकाय सलमान बद्दल. सोडा, मुळात काय चालल आहे हे समजायला खूप वेळ गेला. त्यात ती मारामारी. बापरे, म्हटलं चित्रपट मध्येच बंद करावं तर चिडून तो चुलबुल पांडे बाहेर येऊन मलाच ठोकायचा. म्हणून मग चालू ठेवला. संपल्यावर उसासा टाकला.

काय यार, त्या चुलबुलची ‘अप्सरा’ तयारच असते त्याच्यासाठी. कधीही जा, असतेच. तिच्याकडे वेळच वेळ ह्याच्याशी गप्पा मारायला. आणि इथे माझी कायम ‘बिझी’. आज दुसरा ‘रोबोट’ मधील (सर्व रोबोट भक्तांची क्षमा मागून) स्टाईल वापर बोललेला. म्हणून सीडी डीव्हीडी दुकानात चौकशी केली. कुठेच मिळेना. मग एका ठिकाणाहून ‘भाड्याने’ आणली. आणि आताच त्या ‘रजनी’देवाचे दर्शन घेतले. पण त्यातही कुठेच काही माझ्या समस्यांचे उत्तर सापडले नाही. म्हणजे आता ‘रजनी’ देव असल्यावर प्रश्न आणि समस्या कशा असणार. मी तर रजनी देवाबद्दल इथं पर्यंत ऐकल आहे की ते, आरशा समोर उभे राहिले की आरसा फुटतो म्हणे. काय माहित खर की खोट. कदाचित असेलही. कारण दोन देवाधि देव रजनीकांत देव एकमेकांसमोर आले की, त्या आरशाची काय बिशाद. कृपा म्हणायची ते थेटरातले पडदे फाटले नाहीत.

देवाची हजारो रूप पाहून डोळ्याचे पारणे फिटले असेल. असेच कदाचीत विश्वरूपदर्शन याआधी अर्जुनाने घेतले असेल. मग म्हटलेलं तो ‘अनजाना अनजानी’ पाहावा. पण डोळे सहन करण्यापलीकडे गेलेले आहेत. म्हणू मग नाही पहिला. तो आधी ‘अवतार’ पाहिलेला. काल टीव्हीवर तो ‘क्या कुल है हम’ लागलेला. त्यातही हेच. काही ना काही कारणाने चित्रपटाची नायिका नायकाच्या जवळ असते. इथे माझ्या चित्रपटात दूर दूरच चालली आहे ती. खर तर तुलना करणे चुकीच आहे. पण काय करू, माझा चित्रपट असा चालू आहे ना. की मलाच नवीन वाटते रोज. चित्रपटात नायिका कायम बिझी. आणि नायक ज्या ज्या वेळी नायिकेला पाहण्यासाठी तीच्या डेस्ककडे पाहतो, त्यावेळी कधी नायिकेची मैत्रीण नाही तर कधी तिची सिनिअर असते. आणि त्यांनाही कळते की चित्रपटाचा नायक त्यांना पाहतो आहे. पण नायकाला नायिका हवी असते. ती दिसतच नाही.

बर जेव्हा केव्हा दिसते त्यावेळी नुसतीच झलक. कधी कामानिमित्त दुसऱ्या सहकार्याच्या डेस्कवर चाललेली. किंवा कॅन्टीनमधून जेवण करून बाहेर येतांना. आता ‘गझनी’ मधील आमीर किंवा ‘थ्री इडियट्स’ मधील आमीरच्या ‘अप्सरा’ला अशी कामे का नसतात. तयारच असतात. आता ते देखील खर आहे की मी काही आमीर उर्फ फुंगसुख वांगडू वगैरे नाही. पण माझा चित्रपट गेल्या दोन महिनाभरापासून हेच चालू आहे. अजून नायक नायिकेच्या नजरेला नजर भिडवू शकत नाही. आणि ‘हाय’च्या पुढे जात नाही. आता तर डेस्क जवळून सुद्धा जात नाही. आणि डेस्कवर येऊन बोलेल हे तर स्वप्न वाटत आहे. त्या ‘पार्टनर’मध्ये त्या गोविंदाकडे अप्सराचा मोबाईल नंबर असतो. आणि तिच्याकडे सुद्धा ह्याचा. आणि ह्याने मिस कॉल केल्यावर ती फोन करते. इथे, तीचा नंबर आहे पण करता येत नाही फोन. आणि त्या ‘लाईफ पार्टनर’मध्ये तर त्या तुषार कपूरला त्याची अप्सरा ताबडतोप ‘हो’ म्हणते. ‘नटरंग’ मध्ये देखील असेच.

काय असेल माझ्या चित्रपटाचे नाव? ‘हम आपके है कोन?’ की ‘नो एंट्री’? काय, सगळंच नुसतंच घडतं आहे. ना माझ्या चित्रपटात गाणी. न नायकाला पाहून नायिकेला ‘कुछ कुछ होता है’ होत. ना तिला ‘हीरो’ वाटतो मी. सगळीच ‘खिचडी’ झाली आहे. रोजचं दोघेही एकमेकांना ‘अनजाने’.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.