पंतप्रधानांची विशेष मुलाखत


नमस्कार पंतप्रधान साहेब, आज तुम्ही वेळात वेळ काढून मुलाखत देत आहात त्याबद्दल धन्यवाद. तर मग आपण मुलाखत सुरु करूयात का?
पंतप्रधान– सोनियांना विचारलंस ना?
मी– हो, त्या हो म्हणाल्यात!
पंतप्रधान– (एक मोठा उसासा घेत..) मग कर की सुरु! जो बोले सो निहाल. अरे हो, निहालभाई काय म्हणाले माझ्याबद्दल??
मी– आपण ते मुलाखती नंतर बोलले तर चालेल?
पंतप्रधान– बर.
मी– तुम्ही दुसऱ्यांदा पंतप्रधान झाला. त्याबद्दल अभिनंदन.
पंतप्रधान– धन्यवाद. खरं तर मी पंतप्रधान आहे हे खरे की खोटे हेच मला कळत नाही आहे.
मी– म्हणजे?
पंतप्रधान– म्हणजे स्वप्नात असल्यासारखे वाटते.
मी– मग तुम्हीच पंतप्रधान आहात हे स्वतः ला कसे पटवून देता?
पंतप्रधान– रोज सकाळी उठून मीच माझ्या पोटाचा चिमटा काढतो.
मी– वा! तुम्ही खरंच खूप हुशार आहात.
पंतप्रधान– (दाढी कुरवाळत..) सोनिया मॅडम देखील एकदा म्हणाल्या होत्या.
मी– आज विरोधी पक्षाने देशात बंद पुकारला आहे. त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल?
पंतप्रधान– अहो त्यांना दुसरे काम उरलेच नाही. म्हणून मग वेळ घालवायची कामे करीत आहे. करू द्यात माझ काय जातंय? त्यांना कळायलाच हवं!
मी– काय कळायला हवं?
पंतप्रधान– अहो, ते मला नेहमी कोणत्याही निर्णयांवर ठाम रहात नाही अशी टीका करितात. म्हणून मी आता निर्णयांवर ठाम राहू शकतो हे त्यांना कळण्यासाठी मी निर्णय घेतला.
मी– पंतप्रधान साहेब, तुम्ही भाववाढीचा निर्णय घेतलाय.
पंतप्रधान– हो, सोनियाजी म्हणाल्या मला. त्या जे सांगतात तेच मी करतो. ते तुमचे नाही का शिवाजीराजे आई जिजाऊचे ऐकायचे अगदी तस्स!
मी– पण पंतप्रधान साहेब, इतर देशात पेट्रोलचे भाव आपल्या मानाने खुपंच कमी आहेत.
पंतप्रधान– काय सांगतोस? सांग बर एखादे उदाहरण.
मी– शेजारच्या पाकिस्तानात पेट्रोलचे एका लिटरचे भाव २६ रुपये, बांगलादेशात २२ रुपये, क्युबात १९ रुपये, नेपाळमध्ये ३४, बर्मात ३०, अफगाणिस्तानात ३६, कतारमध्ये ३० रुपये आहे. आणि आपल्या देशात ५३ रुपये.
पंतप्रधान– (चष्म्याची काच पुसत..) त्याचं काय आहे. मूळ पेट्रोलची किंमत १६(रुपये).५० पैसे आहे. म्हणजे इतरांच्या मानाने कमीच आहे.
मी– मग ५३ रुपयांनी कसे काय विकतात पंपवाले?
पंतप्रधान– हे बघ, मूळ किंमत १६.५०, त्यावर केंद्र शासनाचा कर ११.८०, एक्साइस ड्यूटी ९.७५, राज्यांचा कर ८, वॅट ४ रुपये. एकुण झाले ५०.०५ रुपये. बघ आता फक्त तीन रुपयेच तर वाढवले. तर सगळेच चिडलेत.
मी– नाही तुम्ही डिझेल, रॉकेलमध्ये या महिन्यापासून भाववाढ केलीत.
पंतप्रधान– मग काय झालं? आता लोकांनी समजून घेतलं पाहिजे. त्या एका श्लोकात म्हणले आहे ना ‘उदरभरण भरण नोहे, मानिलें हे यज्ञकर्म’. अगदी तसे आहे रे! किती खर्च वाढलाय. सरकार चालवणे साधी गोष्ट नाही. (तेवढ्यात पंतप्रधानांचा ब्लॅकबेरी वाजला.. आणि बंद झाला. साहेब फोनकडे बघत म्हणाले) अरे सोनिया मॅडमचा फोन आला आहे. मला आता निघाले पाहिजे.
मी– ठीक आहे. पण सोनिया मॅडमनी मिस कॉल का दिला तुम्हाला?
पंतप्रधान– (लाजत..) आम्ही नाही जा!! ते आमच्या दोघातले सिक्रेट आहे.
मी– अच्छा! ठीक आहे. एक शेवटचा प्रश्न, तुमची पुढच्या योजना काय?
पंतप्रधान– खूप आहेत रे! संसदबंधूंचे पगार वाढवायचे आहेत. आणि त्यामुळे भाववाढ अटळ आहेत. राहुलसाठी वधू शोधायची आहे. पक्षाची गंगाजळी वाढवायची.. अशा अनेक महत्वकांक्षी योजना आहेत रे. अरे एक मुख्य विसरलोच! बायकोने येतांना भाजी आणायला सांगितली होती. चल रे!
मी– एक शेवटचा प्रश्न. जनतेला उद्येशून काही..
पंतप्रधान– त्यांना सांग, जनतेने आता स्वतः चे प्रश्न स्वतःच सोडवायला शिकले पाहिजे. सरकारला दोष देऊन काही फायदा नाही. चल जय हिंद! जय सोनियाजी!


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.