पण


हो खरंच! मी मराठीच आहे पण, माझ्या ट्विट्स आणि फेसबुकवरील सर्व स्टेटस ‘इंग्लिशमधून’ असतात. कॉमेंट्स देखील मी ‘इंग्लिश’ मधून टाकतो. त्यासाठी मराठीचा वापर करीत नाही. काय बुवा! आता नेटवरही मराठी मराठी कशाला? माझी ‘सही’ देखील मराठीत नाही. मी लिखाण सुद्धा मराठीत करीत नाही. परंतु मी मराठी आहे. मी गप्पा देखील मराठीत करीत नाही. आणि कंपनीत तर छे बुवा! कुठे पण मराठी कसं बोलायचे? आता सिनिअर लोक मराठी कुठे आहे? आणि ‘हिंदी’ बोललं तर बिघडलं कुठे?.

मी मराठीच आहे परंतु, इमेल इंग्लिशमधूनच पाठवतो, मराठीतून नाही. आनंद झाला की, मी मोठ्याने ‘यस’ म्हणून किंचाळतो आणि चिडलो तरी शिवी ‘वॉट द ****’ अशी देतो. मराठीत शिवी देणे देखील अन प्रोफेशनल वाटते. आई बाबा म्हणून हाक मारायला देखील मला लाज वाटते. म्हणून डॅड आणि ममा अस म्हणतो. मी हॉटेलात कधीच वेटरला मराठीत ‘ऑर्डर’ देत नाही. मी मराठी गाणी ऐकत नाही. मी फोनवर सुद्धा मराठीचा वापर करीत नाही. परंतु तरीसुद्धा मी मराठीच आहे. अगदी खर सांगायचे झाले तर, सकाळचे गुड मॉर्निंग पासून ते गुड नाईटपर्यंत मी कधीच मराठीचा वापर करीत नाही. अस पण नाही, की करीतच नाही. परंतु इंग्लिशप्रचुर मराठी. थोडक्यात काय, एका पूर्ण वाक्यात किमान एकतरी इंग्लिश शब्द असतोच. कुठेही आणि कधीही मी असाच!

मात्र ‘भय्या’ने मराठीत बोलायला हवं. त्याने मराठीतच बोलायला हवं. तो नियम मला मात्र लागू नाही. परप्रांतीयांनी मराठी शिकावे असा माझा खाक्या! परंतु माझी मोडकी तोडकी मराठी भाषेला, शिकायची अट नाही. थोडक्यात, दुसर्याला सांगे ब्रम्हज्ञान ‘पण’ स्वतः कोरडे पाषण!. आता असून देखील मी कुठेच काहीच बदल करणार नाही. असाच वागणार! तरीही मी मराठी पण..


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.