काय बोलावं आणि किती बोलावं असा हा विषय! काल परवा एक घटना घडली. आता घटना अशी होती की जळगाव जिल्ह्यातील एका गावात दोन मुलांना पाण्याच्या विहिरीत विनापरवानगी पोहले म्हणून नागडं करून मारहाण केली. त्याचा व्हिडीओ देखील बनवण्यात आला. पत्रकारांनी नेहमीप्रमाणे अत्याचारित कोण आहे याची माहिती काढली तर दोघेही मातंग समाजाचे! आणि आरोपी जोशी आडनावाचा. झालं भली मोठ्ठी बातमी मिळाल्याचा आव आला आणि प्रत्येक चॅनेल/वृत्तपत्राचे पत्रकार धपाधप बातम्या टाकू लागले.
दलितांवर अत्याचार वगैरे वगैरे! खरं तर घडण दुर्दैवीच! पण आमच्याकडे बातमीतील आरोपीच काय होत अथवा अत्याचारित व्यक्तीला न्याय वगैरे गोष्टींमध्ये कुणालाच रस नसतो. रस असतो तो ‘जाती’मध्ये. त्यात जोशी आडनावाच्या माणसाने मातंग समाजाच्या दोन मुलांना नागडे करून मारहाण केली म्हणजे काय! अगदी पुरोगामी वगैरे गोष्टी सुरु झाल्या. ठरल्याप्रमाणे एकमेकांना शिव्या देणं. नेत्यांचं सवर्ण कसे वाईट वगैरे. त्यातही काहींनी ब्राम्हण समाज कसा इतरांवर अत्याचार करतोय वगैरे सुरु झालं. काहींनी तर जुना वचपा काढण्यासाठी त्या मतदार संघाच्या आमदाराची जात आणि काहींनी तर मुख्यमंत्र्यांची जात काढून मनुवाद वगरे सुरु झालं.
पोलिसांनी जेव्हा भटका जोशी नावाच्या समाजाच्या ‘जोशी’ आडनावाच्या व्यक्तीने गुन्हा केला असं सांगितलं. मग सगळे बुचकळ्यात पडले. कारण तो समाज मातंग समाजाप्रमाणे मागासवर्गीय समाजात मोडतो. आता आडनावावरून ‘जात’ अन त्यावरून लायकी काढण्याची नवीन फॅशन सुरु झाली आहे. त्यामुळे पत्रकारांना/मीडियाला असं वाटेल तसा रंग देण्याचे धाडस होते. आणि त्याहून आततायी हे नेते! जणू काही ह्यांच्याच जीवावर सृष्टीचा भार असल्याप्रमाणे तत्वज्ञान पाजळत बसतात. अशा अनेक थापा आजपर्यंत मारल्या गेल्या व कोणत्याही घटनेचे रूपांतर जातीच्या विद्वेषात केले गेले. गरज आहे ती वस्तुस्थिती समोर येईपर्यंत डोकं शांत ठेवण्याची! कारण काहीही झालं तरी आजकालची पत्रकारिता हे व्रत नसून निव्वळ धंदा बनला आहे.