परी


परवा जयंतीच्या दिवशी उशिरा उठायचा विक्रम केला. प्रयत्न करून देखील घरातून निघायला उशीर झाला. कंपनीत जाण्यासाठी लेट मॉर्निंगची देखील एक बस असते. म्हणून मग कंपनीच्या बस थांब्यावर गेलो. तर कोणीच नव्हते. म्हटलं शेवटी व्हायचं तेच झालं. थोडा पुढे गेलो तर कोणी तरी माझ्याकडे बघत होते. थांब्याच्या जवळ गेल्यावर रोज माझ्याच बस मधून येणारी एक ‘अप्सरा’. ती सोडून बाकीचे ‘नेहमीचेच’ महाराष्ट्राचे जावईबापू नव्हते. तिला बघून वाटलं की बस अजून येऊन गेली नसेल. पण सगळे जावई अचानक गायब कसे?, मनात बस निघून गेले की काय याची पाल खूप मोठ मोठ्याने चुकचुक करत होती. तरीही थांबलो. दोन मिनिटांनी मी तिच्याकडे आणि ती माझ्याकडे असे पहायचो. आणि नजरा नजर झाली की लगेच आम्ही दोघेही दुसरीकडे पहायचो. अस दोन चार वेळा झालं.

किती सुंदर आहे ती, काय वर्णन करावे.. निखळ कांती, कमनीय बांधा, डोळे आहेत की पाणीदार मोती, आणि त्यावर तो नाजूकसाजूक चष्मा. गोल गोल गाल, रसरशीत ओठ. अस वाटत होत की वेरूळची लेण्यांमधील एखादी कलाकृती पाहतो तो की काय. गोरी गोरी पान फुला सारखी छान. त्यात तीच्या गळ्यातील सोनेरी चेन खुपंच उठून दिसत होती. नाजुकशी बाहुलीच! हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये खुपंच मनमोहक वाटत होती. कसबसं मनावर ताबा ठेवला. ‘परी’च वाटत होती. तसे, तिला नेहमी पहायचो. पण इतक्यांदा आणि इतक्या जवळून पहिल्यांदाच पहिले. त्यादिवशी ती खरंच सुंदर होती की मी स्वप्नात आहे हेच कळत नव्हते. पंचविशीची नार. असो, थोडक्यात, खुपंच सुंदर आहे ती. थोड्या वेळाने मोबाईलमध्ये वेळ बघितला तर, खुपंच उशीर झालेला. ताबडतोप माझ्या एका मित्राला फोन लावला.

तो रोज बाईकने कंपनीत येत असतो. माझ्या घराच्या जवळच राहतो. त्याला कुठे आहे विचारलं तर तो कंपनीच्या फारच जवळ पोहचला होता. झालं म्हणजे बस चुकली. मग माझा शेवटचा ऑप्शन पीएमटी जाव असा विचार करून तिथून मी निघालो. पण मनात तिचा विचार घोळत होता. पण कसं बोलू हेच समजत नव्हत. पण यावेळी हिम्मत करून बोललो. तिला म्हणालो ‘बहुतेक बस गेली असावी.’ तीचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. ती मला म्हणाली की, पण मी दहा वाजल्यापासून इथे आहे. तिला म्हणालो की, बसची वेळ जाऊन बराच उशीर झाला आहे. मला नाही वाटत येईल. आता दोनच ओपशन्स आहेत. चाफेकर चौक मधून पीएमटी पकडायची किंवा निगडी बस स्थानकातून बस पकडायची. तिला मी निगडीला चाललो आहे अस सांगितले. ती ‘मी घरून काही व्यवस्था होते का ते पाहते ‘ असे म्हणाली. मी हो म्हणून निगडी आलो. नेहमी प्रमाणे हवी असलेली पीएमटी येतच नव्हती. आता चाफेकर चौकात यासाठी नाही की चढायला सुद्धा जागा नसते पीएमटीमध्ये. शेवटी पाऊण तासाच्या प्रतीक्षेनंतर मिळाली. आणि कंपनीत जायला बारा वाजले. तिचा मनात विचार येत होता.

कंपनीतील माझ्या कोणत्याच मित्राला माझी जयंती आहे हे माहित नव्हते. आणि योगायोग असा की, माझ्या एका मित्राचा वाढदिवस देखील त्याच दिवशी. पण शेवटी तोही चिंधी. संध्याकाळी मी माझ्या मित्रांना एक छोटीशी पार्टी दिली आणि मग माझा वाढदिवस आहे अस सांगितलं. कंपनीतील माझे मित्र सर्व खुपंच चांगले आहेत. पण मनात तिचाच विचार येत होता. जुने मित्रही ‘मतलबी’ असतात. त्यांना मी नेहमी महत्व देत आलो. पण त्यांना माझ्या वाढदिवसाची साधी कल्पना देखील येऊ नये हे आश्चर्याची गोष्ट. काल सकाळी कशीबशी बस पकडली. आणि विशेष म्हणजे ‘परी’ माझ्या बाजूच्या बाकावर येऊन बसली होती. पण माझी हिम्मतच झाली नाही, तिच्याकडे बघायची आणि बोलायची. खूप मनात येत होत. मग विचार केला बस मधून उतरलो की बोलेल. पण शेवटपर्यंत हिम्मत झाली नाही. असो, आज हिम्मत करून बोलायचं अस ठरवलं आहे. बघुयात काय होते ते!


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.