पसंत कर


मागील शुक्रवारी घरी गेलो होतो. रविवारी संध्याकाळी आलो. यावेळी देखील तोच रटाळ झालेला विषय. पण, यावेळी खरंच खूप बोर केल आईने. वडील ‘स्थळ पसंत कर’ बद्दल काहीच नाही बोलून. आणि आई खूप खूप बोलून बोर करते. दरवेळी गणपती उत्सवात आमच्या गल्लीतील गणपती मंदिरात आम्ही भंडारा करीत असतो. यावेळी शनिवारी कार्यक्रम ठरवलेला. म्हणून गेलेलो. मस्त झाला. कढी, भात आणि लाप्शी (गुळाचा शिरा). दरवेळी अडीचशे तीनशे पानांचा स्वयंपाक असतो. शुक्रवारी रात्री घरी गेलो. रात्री साडेबारा वाजेपर्यंत मित्रांसोबत गप्पा झाल्या. म्हणजे तसे लवकरच संपल्या म्हणायच्या. रात्री एक वाजता नेहमीप्रमाणे. नेहमीप्रमाणे म्हणजे आमच्या गावी अस आठवत नाही, पण किमान तीन चार वर्ष सहज झाले असतील. रात्री एक वाजता वीज जाते. सकाळी सात वाजता येते. पुन्हा सकाळी दहा वाजता जाते. ते थेट संध्याकाळी सहा वाजता येते. आणि रात्री एक पर्यंत असते. मलाच काय गावालाच राग यायचा बंद झाला आहे. वीस वर्षांपासून पाणी सुद्धा पाच दिवसांनी म्हणजे महिन्यातून सहावेळा (महिन्यातून सहा तास). बोला ‘जय जय महाराष्ट्र माझा’. सोडा, आई साहेबांना पंखा बंद झाल्यावर जाग आली.

काय, मला काय कसं चालल आहे विचारायला सुरवात झाली. मी पण ना, झोपून घ्यायचे सोडून तिच्याशी गप्पा मारत बसलो. खर तर शुक्रवारचा दिवस खुपंच जास्त बेकार गेला होता. त्यात तो प्रवास. खूप डोक दुखत होते. समजलेच असेल. गप्पा मारतांना आई साहेबांनी कधी विषय बदलून स्थळावर आणला लक्षात सुद्धा आल नाही. मग मला सांगत बसली की, महिन्याभरात दहा स्थळ आली. पण कोणाची पत्रिका तर कोणाची राशी, गण, चरण, गोत्र वगैरे जुळले नाहीत. आणि ते देखील अगदी सविस्तरपणे. त्यावेळी खर तर, हसू येत होते. पण स्वतःवर ताबा ठेवला. मग बोलता बोलता त्या दोन स्थळांकडे मोर्चा वळला. त्या किती छान आहे. याच मसाला वगैरे लावून वर्णन केले. मी काहीच बोललो नाही.

त्या माझ्याच कशा बनून राहतील यावर आईचे अनुभव. रात्रीचे अडीच वाजले तरी तेच चालू. कसं बस शांत केल आई साहेबांना. सकाळी उठलो तर, आई साहेब वडिलांना माझ्याशी त्यावर बोला म्हणून फोर्स करीत होती. पण वडील काहीच नाही बोलले. सध्याला घरातील हाच एकमेव ‘प्रश्न’ उरला आहे असे आई वडील मानतात. ‘भंडारा’ कार्यक्रम संपल्यावर संध्याकाळी पुन्हा वडिलांसोबत गप्पा मारतांना आईने ‘पसंत कर एखादी’ म्हणून मागे लागली. वडिलांना माझ्याशी या विषयावर बोला म्हणून त्यांनाही पुन्हा फोर्स. वडिलांना एखादया गोष्टीचा राग आला की ते तो विषय काढत नाहीत. आणि आताही माझा निर्णयाचा त्यांना राग आलेला आहे. आणि आई तिची इच्छा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत चर्चा. मी त्यांना त्याचवेळी ‘नको’ म्हणून म्हटलेलं होते. रविवारी देखील असेच. सकाळपासून तोच विषय. अगदी निघेपर्यंत.

मला जर ती ‘अप्सरा’ भेटली नसती तर, मी नक्की त्या दोघींपैकी एकीला होकार दिला असता. म्हणजे मी पाहिलेली चारही (क्रेझी फोर) स्थळे आणि त्या मुली छान आहेत. पण आई वडिलांनी त्या दोन स्थळात अस काय पहिले, आणि त्या दोघींनी माझ्यात कुणास ठाऊक! मग अजूनच डोके दुखायचे सुरु झाले आहे. आणि ती सर्दी ताई सुद्धा आल्या आहेत. इथे आल्यावर थोड्या वेळातच मैत्रिणीचा फोन. ‘पाणीपुरी खायची का?’ म्हणून. सुरवातीला थोडं आश्चर्य वाटलं. म्हटले कामाशिवाय कसं काय आज फोन. पण नंतर तिला म्हटलं ‘मी दाढी वगैरे केलेली नाही’. मग काय बाईसाहेब खुश झाल्या. मला म्हणाल्या ‘वडिलांना स्थळ पाहायला जाऊ अस म्हणायला संधीच नाही दिलीस’, आणि मनसोक्त हसल्या. मग ती ‘पाणीपुरी’ कशासाठी होती हे लक्षात आले.

असो, अप्सरा अस मला कधी म्हणणार. अरे सांगायचे राहिलेच. शुक्रवारी अप्सराला मी पिंग करून गुड मॉर्निंग केल्यावर ‘बोला’ असे मला म्हणाली. खर तर ती गणपती उत्सव सुरु झाल्यापासून बोलणेच झालेले नाही. मला खूप बोलायची इच्छा होती. तिला म्हटलं ‘काय बोलायचं?’ तर ती बोलली ‘काहीही चालेल’. किती आनंद झालेला म्हणून सांगू. पण त्या आनंदात मी तिला ‘मी गावी जाणार आहे. नगर ला’ अस म्हटलं. मग खूप वेळाने तिने ‘व्हेरी गुड’ म्हणाली. तिने खूप उशिरा रिप्लाय दिल्यावर मी काय बोलणार. म्हटलं कामात असेल. उगाचंच त्रास नको द्यायला. जातंना सुद्धा तिला पिंग केलेलं पण तिने रिप्लाय केला नाही. माझ्या मित्रांनी माझे डोके दुपारी जेवणाच्या विषयावरून फिरवलेल. त्यामुळे मूड गेला होता. जातांना तिला बाय करावं वाटलेलं. तसचं तीच दर्शन सुद्धा झाले असते. पण, सोडा. खूप डोके दुखते आहे तेव्हापासून. आणि आता ‘पसंत कर’ वर कोणती पेन किलर आहे का??


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.