पांढऱ्या पेशी


आम्ही पांढरपेशी जमात. आम्ही कधीच कुठेच दिसत नसतो. पण असतो. आमची डरकाळी घराच्या बाहेर कधी ऐकू जात नाही. आम्ही सल्ले देण्यात सर्वात पुढे असतो. टीव्ही नामक राजाचे आम्ही गुलाम. आम्ही काय विचार करायचा, हे तो राजा ठरवतो. आम्ही कधीच कोणत्या लफड्यात पडायचे टाळतो. सरकारने भाववाढ करावी, आणि ती आम्ही निमुटपणे स्वीकारावी. हेच काय ते आमच्या माथी लिहिलेलं. देश आमचा म्हणायला. आणि न चुकता झेंडावंदन करणे हे आमचे कर्तव्य. असे आम्ही पांढरपेशी जमात आहोत. आम्ही स्वतःला जगात सर्वात क्षुद्र आहोत, असे समजतो. या शरीरातील लालपेशी खाकी वर्दी घालून आम्हा पांढरपेशीना सतत कायद्याच्या लसी देत असतात. आणि आम्ही ते ऐकतो देखील. कितीही मोठी दुर्घटना घडो. पण आम्ही कायमचं शांत. आता याला आम्ही आमचा पळपुटेपणा किंवा भित्रेपणा न समजता, याला आमचा मोठेपणा समजतो.

या देश नामक भव्य दिव्य शरीरात आम्ही पांढऱ्यापेशी रोग प्रतिकारक्षम नसून, प्रेक्षकक्षम आहेत. लाल पेशींचे काम आणि आमचे काम यातील फरक आम्ही कधीच विसरून गेलो आहोत. शरीराच्या अनेक भागात आज रोगराई पसरली आहे. दोन दिवसांपूर्वी आमच्याच एका पांढऱ्या पेशीवर काही कीटकांनी हात टाकला. आम्हा पांढरपेशीवर कोणताही किटाणू हल्ला करतो तरीही आम्ही त्याला प्रतिकार करायच्या गोष्टीचा साधा विचारही करीत नाही. घडलेली घटनेत आम्ही आमच्या पांढऱ्या पेशींच्या चुका काय हेच शोधतो. आणि उपाय करण्याऐवजी, पुढील हल्ल्याची वाट पाहत बसतो. आम्हा पांढऱ्या पेशींचा जन्मच मुळी सिनेमे पाहण्यासाठी, आणि क्रिकेटच्या सामन्यात टाळ्या पिटण्यासाठी झाला आहे.

रोगराई इतकी अफाट पसरत असतांना त्याचा प्रतिकार करण्याचे काम जणू लाल पेशींचे आहे असेच आम्ही मानतो. आमचा सडका मेंदूला आमच्या या रोगराईच्या वेदना कधी पोहोचतच नाही. आणि आम्ही भाबड्या आशेने मेंदू काही तरी आदेश देईल याची वाट पाहत आहोत. डोळे चिघळलेल्या जखमा आणि फुटलेल्या नसा पाहतात. पण आमचे हात कधी मलमपट्टी करायला किंवा आम्ही पांढऱ्यापेशी रक्तबंबाळ अवयवाला बरे करायला खपलीचे कार्य करायला धजत नाही. मुळात आम्ही हे पांढऱ्या पेशींचे कामच नाही असे आम्ही समजतो. रोज कान किंकाळ्या आणि दुखाच्या वेदना ऐकते. पण आमचे मन एवढे पोलादी आहे की त्याने मन पघळत नाही. डोळ्यातून अश्रू धारा देखील येत नाही.

मला काय त्याचे? हाच काय तो आमचा सवाल. बघ्याची भूमिका हाच आमचा पिंड. पुस्तकी शिक्षण आणि मोठ मोठ्या वाक्यांनी आम्ही आमचे शरीर बलदंड करण्याच्या फ़क़्त संमेलनात घोषणा करतो. मुर्दाड, भेकडे मनांनी आम्ही उद्याच्या उश:कालाचे साहित्यात गोडवे गातो. काय करायचं असल्या मुर्दाड पेशींचे आणि त्याची गोडवी गाणाऱ्या साहित्याचे? ज्या पेशींना शरीरातील शिरलेल्या रोगाचा प्रतिकार करायचा नाही. असे ‘बोलघेवडे’ पेशींवर विचार. किटाणू यावेत आणि आम्हा पांढरपेशीवर यथेच्छ हल्ले करावे. आमचे शरीर रोज जर्जर होत आहे. आम्ही पांढरपेशी समाजाने फक्त मुकपणे ते पहावे. हे शरीर म्हणजे आपली जीवनदायिनी आहे.

हे हात, पाय, डोळे, कान, नाक हीच आपली शस्त्र आहे. आम्ही पांढऱ्या पेशींचा जन्म लढण्यासाठी झाला आहे. आमचे जीवन या शरीरासाठी आहे. कारण हे शरीर हेच सर्वस्व आहे. तेच आपले मंदिर आणि तेच आपले दैवत आहे. आपल्या शरीराचा मेंदू सडला आहे. अजूनही मेंदूच्या आदेशाची वाट पाहणे व्यर्थ आहे. आणि कायद्याच्या लसी कधीच निकामी झाल्या आहेत. न्याय व्यवस्थेची ओषधे, गोळ्या रोगगुरु समोर आणि किटाणूच्या कसबापुढे नाकामी ठरली आहेत. अजून किती दिवस आम्ही पांढऱ्यापेशी अशा ‘क्षुद्र’ रोगाला बळी पडून आपले शरीर निकामी होतांना पाहणार आहोत. यापुढे कोणताही किटाणू पांढऱ्यापेशीवर हात टाकतांना सापडला किंवा टाकलेला कळला तर त्या किटाणूला नष्ट करा. गोळ्या, ओषधे याने तसले किटाणू एकेनासे झाले आहेत. यावर उपाय एकच रोगाचा चौरंग.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.