पावसाचे थेंब


गेल्या दोन तीन दिवसांपासून इतके मस्त वातावरण आहे ना! पावसाचे थेंब असले छान पडत आहेत. आत्ता तर, सूर्य नाही पण सीएफएल चा प्रकाश पडावा तसा प्रकाश पडला आहे. एकदम मस्त! मी आत्ताच भिजून आलो आहे. लोक एवढी पावसाला का घाबरतात कुणास ठाऊक? पाऊस पडत असतांना आकाशात बघायचं, ते कोटी कोटी थेंब पडतांना असले जबरदस्त दिसतात ना! आणि रात्रीच्या वेळी तर विचारूच नका. रस्त्यावरील दिव्याच्या प्रकाशात पहा कसले छान दिसतात थेंब. अस शॉवर चालू असल्यासारखे वाटते. वातावरणात एक प्रकारचे चैतन्य आहाहा!

या पावसात कधी वारा आल्यावर चालणारा झाडांचे नृत्य आणि इमारतींच्या अंघोळी कसले छान दृश्य असते. रस्ता एकदम काळा कुळकुळीत होऊन जातो. त्यावरील पांढरे आणि पिवळे पट्टे काय उठून दिसतात. एकूणच स्वर्ग हाच असतो बहुतेक. आकाशात चालणारा विजेचा ब्रेक डान्स, आणि त्यावेळी होणारा अंधार किती शहारे आणतात. सगळं निसर्ग आनंदून गेलेला असतो. मी तर आजकाल पाऊस आला की मस्त भिजून घेतो. अंगावर पडणारे ते पावसाचे थेंब अंगावर एवढा रोमांच निर्माण करतात ना! नाचावसं वाटते. कोणीतरी आकाशातून आपल्या अंगावर पाण्याचे मोतींची उधळण करते असे सारखे वाटते. अंघोळ करतांना असा कधीच अनुभव येत नसतो. एकदा पावसात भिजून बघाच! किती सुख असते. पण, आजकाल पावसात भिजतांना इच्छा निर्माण होतात.

प्रत्येक थेंब जणू काही बॉम्ब पडल्याप्रमाणे वेदना निर्माण करतात. काय सुचत नाही मग, खरे सांगायचे झाले तर त्या वेदना खुपंच अनावर होतात. त्यावर नियंत्रण ठेवतांना खुपंच कसरत करावी लागते. असो, लहानपणी पावसात भिजण्यासाठी आईला किती थापा माराव्या लागायच्या! आठवलं की अजूनही हसू येत. शाळेच्या मैदानावर पाऊस पडून गेल्यावर होणारे तळे. आणि त्यावर रोज कोणी ना कोणी पडायचे. पांढऱ्या रंगाचे सदरे चिखलाचे व्हायचे. पडलेल्यांचे ते रूप आठवले की अजूनही तेवढंच मन गदगदून येत. नुसता पाऊस बघायचे म्हटले तरी, ते इमारतीच्या भिंतींवर पडणारे ते पावसाचे थेंब आणि घरासमोरील तुळशीच्या शरीरावरून ओघळणारे थेंब. आहाहा, कसले छान दृश्य असते. कोकणात गेलो होतो त्यावेळी पाऊस पाहतांना तो तांडव करणारा निसर्ग विलक्षण वाटतो. तिथले ते धबधबे, नागमोडी वाहणाऱ्या नद्या. सगळे सोडून तिथेच रहावे असे वाटते. कोणाचीही चिंता नाही. आणि कशाशी सुत नाही. एकदा त्या काळ्या निशाण्या न घेता पावसात भिजून त्या पावसाच्या थेंबांचा अनुभव घेऊन बघा.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.