पीएमपीएल म्हणजे जलद आणि उद्धट सेवा


आज कंपनीतून निघायला उशीर झाला. माझ्या मित्राने मला बोपोडी पर्यंत त्याच्या दुचाकीवर सोडले. बोपोडीच्या बस स्थानकावरून (स्थानक वगैरे काही नाही. पण जिथे बस थांबतात त्यालाच इथे स्थानक म्हणतात) निगडीची बस पकडली. बसायला जागा नव्हतीच. मग मी पार पुढे, बस चालकाच्या मागे असणाऱ्या जाळीला धरून उभा राहिलो. नेहमी प्रमाणे वाहक म्हणजे कंडक्टर काही लवकर तिकीट मागायला आला नाही. ड्रायव्हर पण काही विचारू नका. धूम ३ चा वगैरे कोणी विचार करत असेल तर त्याचा विचार नक्की व्हावा. काय घाई म्हणावी त्याची, वा अगदी समोरील गाड्या एका मागून एक मागे जात होत्या. अस वाटत होत कि संगणकावर कुठला तरी रेसिंग चा खेळ खेळत आहोत. दापोडी, फुगेवाडी कधी गेल कळलंच नाही. वल्लभनगरच्या थोडे पुढे असताना, एका स्कूटीवर दोन स्त्रिया चालल्या होत्या. आमची बस मागून आली. बस आणि ती स्कुटी यातलं अंतर फारच कमी होत. त्यात एका ठिकाणी त्या स्त्रीने ब्रेक मारला. झाल ह्या ड्रायव्हारने कशी बशी वेगात असलेली बस सावरली. पण शांत बसेल तो ड्रायव्हार कसला. त्याने बस तिच्या पुढे नेवून तिला शिव्यांची लाखोली वाहिली.

मराठी भाषा शिव्यांच्या बाबतीत किती समृद्ध आहे, याची खात्री नक्की पटली. आता याने बस तिच्या अंगावर जावू नये म्हणून ब्रेक मारला तर, मागच्या दुचाकीवाल्याने ह्याला शिव्या दिल्या. हे ऐकताच ड्रायव्हार ने बस थांबवली. तो पण हिरो ड्रायव्हारच्या बाजूच्या खिडकी पाशी येवून त्याला तुला समजत नाही का? अस विचारले. आता मी इथे तो काय म्हटला याचा सारांश सांगितला. शब्द सांगण्याच काही अर्थ नाही. कारण तो पण त्या ड्रायव्हारचाच भाऊ. मग दोघांचे वाक्युद्ध सुरु. पण काय आश्चर्य ड्रायव्हारने गाडीचा दरवाजा उघडताच हिरोने धूम ठोकली. चला काही का असेना बस सुरु झाली. मग त्या ड्रायव्हारने आपली चूक कशी नव्हती हे बाजूच्या लोकांना पिंपरी ते आकुर्डी चौक येईपर्यंत सांगितले. शेवटी मी उतरल्यावर पुढे काय झाले ते काही मला माहित नाही. पण पीएमपीएल च्या बसेस मध्ये खर तर हा काही नवीन अनुभव नाही परंतु त्यांची सेवेच वर्णन करायचे झाल्यास ‘जलद आणि उद्धट सेवा’ असे करता येईल. पुण्यात पीएमपीएल चे स्थानके आणि जिथे बस थांबतात यात किमान ५० मीटरचे अंतर असते. जे रोजचे असतात त्यांना याचे काहीच वाटत नाही. पण नवीन गोंधळून जाईल एवढे नक्की.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.