पुनःश्च हरी ओम आता कितवा आहे ते सांगता येणार नाही. पण पुन्हा नोंदी लिहिण्याचा यत्न करणार आहे. अनेकदा ठरवूनही यात सातत्य काही येईना. ज्या गोष्टीने दशकभरापूर्वी वेड लावलेलं आज ती गोष्ट कृतीत आणण्याचा काही योग येत नाहीये.
खरं तर टाळेबंदी अन कोरोनाच्या कृपेने अनेक विषय डोक्यात येतात. परंतु पूर्वी (पूर्वीचा अर्थ दहा वर्षे आधी) प्रमाणे ते काही मांडता येत नाही. माझ्या लहानपणी बहुतांश मुलांप्रमाणे माझ्यातही न्यूनगंड होता. प्रत्येक गोष्ट आपण करतो ती चुकीची असते वा होते असा माझा ठाम समज गैरसमज होता. शालेय जीवनात असतांना तर मला दुसरा करतोय ते बरोबर अन मला वाटते ते चुकीच असं वाटायचं! त्यातून व्यावसायिक जीवनात आल्यावर अगदी उलटा स्वभाव बनला.
सुदैवाने अनेक गोष्टी सकारात्मक घडत गेल्याने त्या स्वभावाची काही अडचण निर्माण झाली नाही. परंतु आता पस्तीशी ओलांडल्यावर मध्यबिंदूवर असावे असं वाटत. तसं अवघड आहे. पण प्रयत्न करत असतो. आक्रमक स्वभावाला मुरड घालतो. तात्काळ प्रतिक्रियावादी न होण्याकडे भर देतो. समजूतदारपणा खरं तर सगळ्यांकडेच असतो परंतु आजूबाजूचे वातावरण अन परिस्थिती आपल्या स्वभाव अन वागण्यावर फार मोठा प्रभाव पाडते.
खरं तर आज ह्या गोष्टी बोलण्याचा तसा काही विशेष अर्थ नाही. परंतु, आपण जे ठरवतो ते कृतीत यायलाच हवं असा दंडक गेल्या काही वर्षे केलाय. काही बाबतीत ते यशस्वी देखील झालंय. परंतु सगळ्याच क्षेत्रात अजून यश मिळालेलं नाही. त्यापैकीच एक म्हणजे नोंदी/ब्लॉग चा प्रपंच!
अनेक गोष्टी करायच्या आहेत. अनेक गोष्टींवर मते मांडावीशी वाटतात. परंतु, प्रापंचिक माणसाला प्रपंच नेटका करण्यात बराचसा वेळ खर्ची घालावा लागतो. अन अनेक संकल्पना अन गोष्टी पुढे ढकलल्या जातात! तसं अशक्य काहीच नाही. प्रयत्न केल्यास यश मिळते. काही वेळेस तुम्हाला झुंज द्यावी लागते. पण प्रयत्न करीत राहिल्यास यश मिळण्याचा हमखास योग्य! हे सगळे अनुभव आहेत. तर त्याच अनुभवाच्या ज्ञानावर रोज किमान एक नोंद लिहिण्याचं प्रयोजन केलेलं आहे.
पाहुयात यावेळी तरी यश मिळवता येतंय का ते! ते कुणीतरी म्हटलंय ना ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’. फारच पिळलं का? बऱ्याच दिवसांनी असं मनमोकळं बोलतोय त्यामुळं समजून घ्याल ही अपेक्षा करतो.