पुन्हा ही चूक घडणार नाही


मागील दोन दिवसांपासून मी सर्दी आणि तापाने आजारी पडलो होतो. पण चिंतेचे आता काही कारण नाही. आज सकाळी ताप असल्याने मी कंपनीत काही गेलो नाही. परवा मी जेव्हा पुणे विद्यापीठातून येत होतो त्याचवेळी शंका आली होती. कारण मला कधी नव्हे एवढा थकवा जाणवला होता. बॉसला सुट्टी मागताना खर तर खूप लाज वाटत होती. पण तरी देखील मी फोन करून सुट्टी मागितली. आणि त्याने मोठ्या मनाने दिली देखील. अख्खा दिवस झोपून काढला. काल पण खर तर तेच केल होत. काल रात्री ताप उतरला होता. पण सकाळी पुन्हा आला होता. असो आता फ़क़्त डोक दुखत आहे. माझ्या या तापामुळे अनेकांची तशी डोकेदुखी झाली. आई तर काही विचारू नका. तिला तर काय करू आणि काय नको अस झाल होत.

वडिलांनी मला दवाखान्यात जा आणि ओषधे घे अस सांगितलं. काकाने त्याची कंपनीतून सुटल्यावर कोथरूडला जाऊन आवळा काढा आणला. कंपनीत माझ्या न येण्याने कामाचा बट्याबोळ झाला असेल तो वेगळाच. माझ्या सहकारी मैत्रिणीचा फोन आणि एसएमएस देखील येऊन गेला. पण त्यावेळी मला शुद्ध कुठे होती. आजार आणि मी यांची भेट मागच्या सहा वर्षांनी आज पडली. मला पावसात भिजायची आवड. पण त्यामुळे कधी सर्दी किंवा ताप आला नाही. डोकेदुखी हा प्रकार आमच्या कंपनीतील काही सहकारी मुलींमुळे कळला. मला सर्दी जर मी रडलो तरच होते. असा माझा अनुभव आहे. आपली तब्येत आपणच सांभाळली पाहिजे असा घरी दंडक असल्याने दवाखाना असा कधी प्रकारच नाही. आपल शरीर म्हणजे एक मंदिर आहे. ते चांगले असावे, स्वछ आणि सुंदर दिसावे. यासाठी आपली प्रकृती सांभाळावी. असे घराचे नियम.

दहावीपर्यंत पोळी हा प्रकार मला माहित नव्हता. भाकरी आणि आमटी हेच जेवण. गोळ्या, बिस्कीट हे कधीच वडिलांनी आम्हाला दिले नाही. पण या बदल्यात बदाम, खारका, खोबरे, दुध हे दिले गेले. फायदा तेव्हा नाही आता दिसतोय. पण तरी देखील आजारी पडलो. याच कारण हेच कि मध्यंतरी पासून दुध आणि बदामापेक्षा अधिक हॉटेलचे चमचमीत पदार्थ, आईस्क्रीम यांचे प्रमाण वाढले आहे. कदाचित या गोष्टी लक्षात याव्यात म्हणून आजाराने भेट दिली असावी. जाऊ द्या जे होते ते चांगल्या करिताच होते. मला माझी चूक कळली. पुन्हा हि चूक घडणार नाही. तुम्हाला काल भेटता न येण्याची खंत अजूनही मनात सलते आहे. घडलेल्या प्रकाराबद्दल क्षमा असावी. पुन्हा असली चूक घडू देणार नाही. तुम्ही देखील तुमच्या प्रकृतीही काळजी घ्या. डोक अजून दुखायचं कमी झालेलं नाही. डोकेदुखी कमी झाल्यावर बोलूच.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.