प्यार किया तो..


म्हणजे आधीच म्हणणार होतो. पण.. राहू द्या. आता मी कंपनीत येतांना बाजूच्या इमारतीसमोर दोन कबुतरांना गुटर्गू करतांना पहिले. ही गोष्ट मला आता नवीन राहिलेली नाही आहे. पुण्यातच काय सगळीकडे अस चालते. काय करणार? कंपनीच्या डाव्याबाजूला थोड्याच अंतरावर कावळ्यांचे कॉलेज आहे. त्याच्या थोड पुढे गेले की, ब्रिगेडीयरांनी केलेल्या भीम पराक्रमाने पावन झालेली एक वास्तू. त्याही थोड पुढे गेले की, एक नावाजलेलं इन्स्टिट्यूट. इकडे कंपनीच्या उजव्या बाजूला खोक्यातील हिरो हिरोईनचे इन्स्टिट्यूट. त्याच्या आणखीन थोड पुढे गेल की चिमण्यांचे कॉलेज.

आजूबाजूला ही वन स्टार देखील नसलेली परंतु किमती फाईव्हस्टारच्या असलेली हॉटेल. आहेत दोन एक चहा-कॉफी डेची लाल पिवळी दुकाने. त्यामुळे या भागच वातावरण जरा जास्तच ‘हॉट’ आहे. मी इंटरव्यूला आलेलो त्या दिवशी देखील आणि जेव्हापासून जॉईन झालो त्या दिवसापासून रोज सरासरी एक कबुतरांचे जोडप्याला भर रस्त्यात गुटर्गू करतांना पाहतो आहे. हो ‘पाहतो’. मी काही ‘महात्मा’ वगैरे नाही. किंवा संस्कृती रक्षक. म्हणजे असही नाही की टक लावून पाहतो वगैरे. परंतु, आता जाता येतांना दिसले किंवा लक्ष गेले की होतेच ना ‘दर्शन’. संध्याकाळी नाष्ट्याला जातांना सगळीकडे नुसता चिवचिव आणि कावकाव चालू असतो. रात्री कंपनीतून निघून बसस्टॉप वर येऊन उभे राहिले तरी हेच. एकतर एखादा कावळा सिगारेट ओढत असतो. आणि त्याच्या धुराने मी खोकत असतो.

बर कावळे किती मोठे आहेत? साधी मिसरूड देखील न फुटलेले. आणि भरदाव वेगाने चाललेले हिरो आणि त्यांना घट्ट पकडून बसलेल्या त्यांच्या होंडांची ‘कृत्ये’ पाहून जाम टेन्शन येते. इथली आजी आजोबा मंडळीही काय कमी नाहीत. आजकाल मी ‘असा कसा वेगळा वेगळा’ वाटत आहे. म्हणजे दिसणे वगैरे नाही. ती गोष्ट वेगळी की मी आता पूर्ण काळा झालो आहे. चेहरा काळवंडून गेला आहे. आणि डोळ्याभोवती ते दोन कृष्णवलय खूपच स्पष्ट दिसू लागले आहेत. आणि तब्येती बद्दल न बोललेले बरे. काय तो खोकला आणि सर्दी. आणि काय ती शरीरयष्टी. मला नक्कीच एखादा आफ्रिका खंडातील चित्रपट निर्माता गांधीजींच्या रोलची ऑफर देईल अस वाटते आहे. असो, एकूणच सांगायचे झाले तर ते ‘प्यार किया तो डरना क्या’ चा आदर्श सर्वांनी आचरणात आणलेला दिसतो आहे.

माझा हा ‘रामाचा’ अवतार कधी संपणार? कुणाचीही आज्ञा नसतांना चाललेला वनवास. आणि सीता नसतांना चाललेला ध्यास. ‘कृष्ण’चा रोल नाही मिळाला तरी चालेल. पण रामावतार नको अस झाल आहे. इथले सगळे कृष्ण आणि त्यांच्या राधा रोज ‘रासलीला’ करीत असतात. बर बसस्टॉपवर रोज कोणीना कोणी येऊन उभे राहते. आणि त्यांना पिकअप करायला त्यांच्या राधा गाड्या घेऊन येतात. कसले भाग्यवान आहेत! बर देव पण ना माझी मस्करी वगैरे करतो की काय देव जाणे. अस आगीतून फुफाट्यात. ज्या गोष्टीची इच्छा असते ते राहिले बाजूला आणि नाही ते दाखवत बसतो. एकूणच रोज एक नवीन दिवस आणि नवीन अनुभव येत आहेत.

कधी कधी वाटते मित्रांप्रमाणे व्हावे. ‘लैला नसलेले मजनू’. यार, ह्यांना कोणीही चालते. माझा एक मित्र आहे. त्याला अनेक आवडणार्या मुलींपैकी एक. त्याने तिचे नाव ‘डार्लिंग’ ठेवलेले. ती असेपर्यंत त्याला ती आवडायची. ती प्रोजेक्ट संपून गेल्यावर तिच्या मैत्रिणीवर डोळा. त्याला असा विचारात बदल कसा? विचारले तर बोलला ‘फुल ना फुलाची पाकळी’. जाम हसून हसून पोट दुखलेल. सोडा, सध्याला फक्त कंपनीने दिलेलं काम हेच डोक्यात आहे. पण ही कबुतरे पहिली की थोडा फार क्षणासाठी विचारचक्र सुरु होते. मन ‘महामूर्ख’ असते. डोक्याचे निर्णयच योग्य असतात. मनाच्या दृष्टीने अमावस्या आहे.

अरे, विषय भलतीकडेच वळला की, हे आज कबुतरांचे गुटर्गू चाललेलं माझ्या इमारतीच्या सिक्युरटीने लक्षात आणून दिले. मला डोळे मिचकावून तिकडे पहा अस खुणावत होता. असो, माझा काही विरोध वगैरे नाही. प्रत्येकाला इथे हवे ते हवे तिथे हवे तसे करण्याचे स्वातंत्र्य आहे. राहुल बाबाच नाही का रोज काहीतरी भलते सलते करीत असतो. बाकी बोलूच.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.