प्रायश्चित्त


प्रायश्चित्त! बस झाली रे! ही रडारड. ब्लॉग भिजला आता. फार नको, आता नक्कीच ‘ओव्हर डोस’ झाल आहे. गेले तीन दिवसांपासून म्हणजे ३१ डिसेंबर पासूनच किती ते फोन, आणि किती ते मेसेज! खरच आता हे सगळ पाहून घरात कोणीतरी गेल्याप्रमाणे वाटत आहे. उगाच फार झाले तर ब्लॉग उघडल्यावर तुमच्या संगणकाच्या मॉनिटरला त्रास होईल. चला ठीक आहे. ह्या जन्मात नाही जमल! पण पुढच्या, काय म्हणतात ते ‘पुनर्जन्मात’ मी जीवन नावाच्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला उर्फ देवाला मला हेमंतचा ‘रोल’ नको म्हणेन.

त्या ‘ इंद्र देवाचा’ रोल दे अस सांगेन. ‘नाही’ बोलला तर, आठव्या जन्मात तीच ते ‘कंत्राट’ म्हणजे ते सात जन्माचे नाते असते ना! नाहीतर निदान त्या दिग्दर्शकाला त्या ‘इंद्रप्रस्थ’ मध्ये कुठलाही रोल दे अस म्हणणे. निदान तिच्या ओळखीच्या लोकांपैकी एखादा तरी. पण जर समजा हे झाल नाही तर मी निदान पुन्हा ‘ब्लॉग’ वगैरेच्या भानगडीत पडणार नाही. उगाच! माझ्यामुळे सर्वांनाच त्रास झाला. खूपच सतावलं मी सर्वांना. पण चिंता नसावी. ‘अप्सरा २’ वगैरे येणार नाही. खूप चुका केल्यात. चुका कसल्या ‘पापं’ झालीत. त्या ३१ डिसेंबर नंतर खूप चुका लक्षात येत आहेत. पण, मी प्रेम केल ही चूक नाही. उलट ते माझे भाग्य! की, मी अशा मुलीच्या प्रेमात पडलो. इतकी सुंदर आणि इतकी चांगली. कदाचित मागील जन्मीचे पुण्य होते काहीतरी. त्यामुळे हे भाग्य मिळाले.

पण या सहा महिन्यात खरच, माझ्याकडून दुसर्या कोणत्याही गोष्टीचा विचारच झाला नाही. बरेच जण नाराज झाले आहेत माझ्यामुळे. एक खूप मोठी चूक केली मी. पण खरच त्यावेळी मला एवढी अक्कल नव्हती. म्हणजे सहा वर्षापूर्वी, माझा एक खूप जिवलग मित्र आहे. आधी म्हटलं नव्हत का, तो कधीच चुकून सुद्धा फोन लावत नाही. त्यावेळी आम्ही दोघे एक संगणकाचा कोर्स करीत होतो. त्यावेळी माझी एक मैत्रीण होती. आता नगर मध्ये मैत्रीण असण म्हणजे खूप मोठी गोष्ट! ह्याची मी तिच्या नावाने चेष्टा करायचो. पण सगळ मस्करीत. पण हा गडी तिच्यात इतका गुंतला. बर, ती काय फार खास नव्हती. आणि तिला कळायचे सुद्धा की, हा तिच्यावर मनापासून प्रेम करतो आहे ते. पण ती मुद्दाम त्याला आणखीन सतवायची. आणि ह्या कार्टून ला वाटायचे की, मी त्याच्या चित्रपटातील व्हिलन आहे.

मी तिला एक दोनदा समजावले. पण तिला तसं वागण म्हणजे खेळच झाला होता. मला म्हणायची की, सांग कोणाला पटवून दाखवू. यार, शेवटी शेवटी तो माझ्याशी बोलायाचाही बंद झाला. यार, मला कोणाच्याच चित्रपटात खलनायकाची भूमिका नको. त्यामुळे, मी तिच्याशी बोलायचे बंद केले. मग साहेब रुळावर आले. शेवटी कोर्स संपल्यावर हा मला म्हणत होता की मी तिला ‘प्रपोज’ करतो. पण ती उगाच ह्याला डिप्रेस करेल. नाहीतर हा टेन्शनमध्ये येईल अस करेल. आणि नंतर हा कुढत बसेल, अस वाटलेलं मला. म्हणून मी त्याला ‘नको’ म्हणून त्याला थांबवलं. त्याला वाटायचे ती ह्याला होकार देईल. काय माहित, पण मला नव्हते वाटत. मी आणि तो सोबत पुण्यात आलो. खर तर खूप हुशार आहे. आणि चांगला चित्रकार देखील.

पण त्या गोष्टीनंतर आता तो इतका बदलून गेला आहे ना! म्हणजे सिगारेट वगैरे व्यसने लागली आहे. एकटा राहतो. कधीच कोणाशी संबंध ठेवत नाही. संपूर्णच बदलून गेला. कायम रडका. जॉब चे सुद्धा अवघड करून टाकल त्याने. यार, विचार केल्यावर त्याला बोलून मोकळा हो म्हटले असते तर.. कदाचित तो असा नसता. एकतर त्याच्या म्हणण्याप्रमाणे ती त्याला भेटली असती. नाहीतर तो यातून सुटला तरी असता. यार, त्यावेळी त्याची अवस्था माझ्याप्रमाणे झालेली. त्याला ही त्यावेळी मदत हवी होती. आणि मी चुकीची मदत केली. असो, काल आम्ही दोघे भेटल्यावर त्याला मी माझी चूक सांगितली. किती वर्षांनी त्या कार्टूनला आनंद झालेला. त्याला सगळ, सांगितल्यावर त्यालाही पटल. काही का असेना. आता तो आधीप्रमाणे नाही, पण नक्की पुन्हा तसा बनेल याची मी आता खात्री देवू शकतो.

थोड बर वाटल. काल मी मोरया गोसावी मंदिरात गेलेलो. पेढ्याचा नेवेद्य दाखवला. ते पेढे ह्याच्यासाठी की, मी मोरयाला म्हटलेलो ना! असो, बोललो तर शब्द पाळायला हवा ना! तिकडे ती माझी छोटी बहिण नाराज आहे. सोडा, खूप नाराजी वाढली आहे. फार वेळ लागणार नाही हे बदलायला. नाती एखाद्या सोनेरी धाग्याप्रमाणे असतात. टिकवण आणि जपण खूप अवघड असते. पण एका गोष्टीचा आनंद आहे. ती नाराज नाही झाली. आणि ती नाराज नाही त्यामुळे खूप छान वाटत आहे. आज सकाळी तिचा उठल्यावर तो ‘ऑल द बेस्ट’चा मेसेज पाहून मस्त वाटत आहे. फक्त तो माझा डावा खांदा खूप दुखत आहे. ते त्या ३१ डिसेंबरला सकाळी व्यायाम करतांना कसा काय लचकला आता आठवत नाही. पण आता जाम दुखतो आहे.

चला ऑफिसला जायची वेळ झाली. पहिले तीन दिवस नाईटशिप आहे. असो, प्रायश्चित्त करतो आहे.. देव करो झालेल्या चुका माझ्याकडून सुधारल्या जावो. पण तिच्यावर केलेले प्रेम ही चूक नाही. आणि असेल तर ही चूक आयुष्यभर करायला मी तयार आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.