फेडअप


खुपंच खजील झाल्याप्रमाणे वाटत आहे. काल देवाने इतकी चांगली संधी दिली. आणि मी ‘नेहमीप्रमाणे’ गाढवपणा केला. तिने काल स्वतःहून मला पिंग केलेलं. याआधी एकवीस सप्टेंबरला, म्हणजे मागील महिन्यात माझ्याशी मोकळेपणाने बोलली होती. त्यानंतर काल. आणि त्यावेळेसही माझ्यातील चुका समोर आलेल्या. आणि कालही. कालचा दिवस कसा गेला म्हणून सांगू. माझ्या फ्लोरवर जातांना कॅन्टीनमध्ये ती दिसली. तो लाल रंगाचा ड्रेस. देवाचे उपकार म्हणायचे तिचे लक्ष नव्हते. नाहीतर तीचा तो नेत्रकटाक्ष. ती तीच्या मित्राशी बोलत होती. तीच्या जवळून जातांना चक्कर आल्याप्रमाणे झाले होते. एकदा वाटले तिला तिथेच ‘हाय’ म्हणावे. पण ती समोर असतांना काय होते कुणास ठाऊक. काहीच करू शकत नाही. असो, डेस्कवर गेलो.

कॅन्टीनमध्ये ये म्हणावे म्हणून मित्राला फोन लावला. तर तो नव्या कॅन्टीनमध्ये. आणि ही जुन्या कॅन्टीनमध्ये. त्याने आधीच नाश्ता घेतलेला. वाटलं होते त्याला तू नाश्ता करून घे बोलावे. पण ठीक आहे अस बोलून त्या कॅन्टीनमध्ये जाण्यासाठी निघालो. खर तर ती जुन्या कॅन्टीनमध्ये होती म्हणून मी नाष्ट्याचे निमित्त. तिला पाहण्याची इच्छा खुपंच दाटून आलेली. त्यात ती आज इतकी छान दिसत होती. पण इमारतीच्या बाहेर पडणार तेवढ्यात त्या मित्राचा फोन आला. मला म्हणाला माझा नाश्ता झाला आहे. आणि मी निघतो आहे. मग काय सांगू किती आनंद झालेला. त्याला वाटले मी रागावेल. पण ‘ठीक आहे’. म्हणून धावत जुन्या कॅन्टीनमध्ये गेलो. तिला शोधात होतो तर, ती कॅरम खेळत बसलेली. किती गोड हसत होती. आहाहा! किती दिवसांनी ती अशी मोकळी होती. त्यावेळेसही तिथे जावे अस वाटले. पण माझ्यातील ‘शूरवीर’. सोडा, ज्यूस घेऊन ती दिसेल अशा ठिकाणी बसलो.

खर तर मला तिला पाहता येत होते. पण एकदाच नजर टाकली. आणि धडधड इतकी वाढली ना! ते ज्यूस एका घोटात पिऊन टाकले. म्हणजे मी नेहमी असेच पितो. पण यावेळी एका सेकंदात. बूट पॉलीश करून आणि मान खाली घालून निघालो. खर तर तिला पाहण्याची खुपंच इच्छा होत होती. पण सोडा. डेस्कवर आल्यावर थोड्या वेळाने तीही तीच्या डेस्कवर आली. तिला पिंग करून गुड मॉर्निंग केल. थोड्या वेळाने तिने स्वतःहून पिंग करून ‘हाय’ केल. खरंच स्वप्न की सत्य हेच कळत नव्हते. मी ‘हाय’ केल्यावर ती म्हणाली ‘आय एम फेड अप इन धिस प्रोजेक्ट’. त्यातलं ‘फेड अप’ चा अर्थ खरंच माझ्या लक्षात आला नाही. माझे इंग्लिश फारच ‘पक्क’ आहे. काय बोलणार? पण तिच्याशी बोलतांना मेंदू काहीच विचार करीत नाही. मी तिला सरळ मला ‘फेड’चा अर्थ काय असतो? अस विचारले. काय यार, किती छोटीशी गोष्ट होती. ती ‘फेड अप’ अस म्हणाली. मी नुसतेच ‘ओके’ बोललो.

ती मला, मी ह्या प्रोजेक्टमध्ये वैतागली आहे अस म्हणाली. आणि मी काहीतरीच आपले ‘फेडअप’ चा अर्थ विचारात बसलो. माझ्या मित्राला ती चॅट दाखवून त्या ‘फेडअप’चा अर्थ विचारला. तर तो तिकडे हसत बसला. ती चिडली असणार. मला म्हणाली ‘फोर्गेट इट, बाय’. मी पुन्हा गाढवासारखा ‘प्रश्नचिन्ह’ टाकून मोकळा झालो. मला मग ‘तू पण ना, यु आर इंक्रीज माय फष्ट्रेषण’. ती कामामुळे वैतागलेली. माझ्यासमोर मन हलक करीत होती. आणि मी सरळ ‘अरे, माझे इंग्लिश खुपंच भारी आहे, म्हणून’ म्हणालो. वरतून ते चुकीचे सॉरीचे स्पेलिंग लिहिले. तिने नुसतेच ‘स्माइली’ टाकले. तिला ‘व्हाय, ऑल आयपीएल मेंबर से धिस एव्हरी डे एन एव्हरी मिनिट?’ म्हणालो. तीच्या प्रोजेक्टच्या नावाचा शॉर्ट फॉर्म आणि आयपीएल मिळते जुळते आहे. काय यार मी सुद्धा? ती टेन्शनमध्ये आणि मी आपले असले. तीही तेच ‘पांचट मारू नकोस, प्लीज’ म्हणाली. तरीही माझ घोडे थांबेनच. तिला ‘हो खरंच, कधी संपतच नाही. नो डेडलाईन’. ती नक्की खुपंच चिडली असणार. मला ‘बाय’ म्हणाली. तिला पुन्हा थोड्या वेळाने पिंग करून मी ‘डू नॉट टेक टेन्शन’ म्हणालो. ती ‘ओके, व्हेरी इझी फॉर यु टू से. नाऊ प्लीज लिव्ह मी अलोन’. पाहून कानाखाली मारल्याप्रमाणे झाले. खुपंच बेकार वाटायला लागलेलं.

तिला ‘ओके सॉरी’ बोललो. तिने पुन्हा ‘स्माइली’ आणि पुढे ‘जष्ट जोकिंग’ बोलली. दुपारी ती जुन्या कॅन्टीनमध्ये आजकाल जेवते म्हणून तिथे गेलो. तिला पाहून खूप छान वाटायला लागले. पण तिथले जेवण खुपंच डब्बा असते. पाहूनच जेवण करावेसे वाटेना. कसबस मन बनवून रांगेत उभा राहिलो. खर तर ती त्या कॅन्टीनमध्ये होती म्हणून दोन पाच मिनिटे तिथे तीच्या आसपास ‘जेवण’ घ्यायचे निमित्त का असेना पण तिथे राहता आले असते. पण मी त्या केटरच्या समोर जायला आणि ती उठून जायला एकच वेळ झाली. मग जेवण घेऊन काय फायदा?. पण देवा कृपेने, तो माझे कार्ड चालत नाही बोलला. मग काय मज्जा. तिथून सटकलो. काल दुपारीही उपास. नंतर माझ्या मित्रांनी मला या विषयावरून खूप झापलं. आधीच कानाखाली खाल्यावर जस वाटत ना, तस् वाटत होते. त्यातून त्यांचे ‘लेक्चर’. काही हरकत नाही. मी माझी इंग्लिश ‘शुद्ध आणि चांगली’ करेल. वाटले तर, चायनीज आणि पाली देखील शिकायला मी तयार आहे.

काय करू? खूप मोठी संधी गेली हातातून. त्या ‘फेडअप’ने वाट लावली. नाहीतर मी तिला आपण चहा/ कॉफी घेऊन येऊ म्हणायची संधी.. इतकी चांगली संधी आली होती. तीही हो म्हणाली असती. सोडा, माझ्यात काहीच चांगली गोष्ट नाही आहे. आणि आता तर खुपंच बेकार वाटत आहे. पण ती का नाराज हे तरी कळले. दुपारी काकूंना मदत केली. आता ती का पिंग करेल स्वतःहून? माझी इंग्लिश पाहून..


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.