फ्लेक्स


मी बसस्टॉपवर बसची वाट पाहत उभा असतो. स्टॉपच्या समोरच्या बाजूला एक इमारतीचे चित्र असलेले जाहिरातीचे फ्लेक्स असते. ‘तुमचे स्वप्न साकार करण्याची संधी’ अस काहीस लिहिलेलं असते. बस येते. बस निघाल्यावर प्रत्येक चौकाचौकात वेगवेगळया बिल्डरांची अगदी अनाकलनीय बॅनर/भित्तीपत्रके असतात. एका बिल्डरची जाहिरातीत संध्याकाळची वेळ, एक मुलगी शेतात दोन्ही हात लांब करून पाठमोरी उभी आहे. बाजूला लिहिले असते ‘युअर ड्रीम होम’. त्याच्या बाजूलाच दुसऱ्या बॅनरवर एक तरुण हसऱ्या चेहऱ्याने, कदाचित बाजूच्या दोन लहान मुलांचा बाप असावा. त्याच्या दोन मुलांसोबत गोट्या खेळतांना. बाजूला लिहिले असते ‘कंट्रीयार्ड’. बस पुढे निघते.

पुढच्या चौकात येते. एक हिंदी कौटुंबिक मालिकेतील शोभणारी नायिका. साडी, गळ्यात मंगळसुत्र, कपाळावर कुंकू आणि केसांमध्ये देखील ‘सिंदूर’ नुसती पाहत उभी असते. म्हणजे त्या बॅनरमध्ये ती अशी का पाहते तेच समजेनासे होते. बाजूला ‘क्या आपके बिल्डरने आपके घर का सुरक्षा मिशन किया?’ लिहिले असते. बॅनर कुणाचा तर वायरच्या जाहिरातीचा. त्याच्याच बाजूला पुन्हा त्याच कंपनीची एका दुसरी दिव्याची जाहिरात, एक मुलगी नुसतीच हसतांना. का हसते आहे कुणास ठाऊक, तिथे खाली एक प्रश्न ‘क्या आपके घर मे खुशियों का उजाला है?’. बस वेगाने निघते. पुढे पटापट एक दोन मोठ मोठे दादाचे हसतांना जाहिरात. कबड्डी स्पर्धेचे की दादाचे बॅनर हेच समजत नाही.

पुढच्या सिग्नलला, शाहीद कपूर. मस्तपैकी स्टाईलमध्ये पाहतो. त्याच्या डाव्या हातात एक मोठे लाल रंगाचे घड्याळ. बाजूला लिहिले असते ‘विजेत्याला कधी एक्सपायरी डेट नसते’. जाहिरातीच्या खालच्या बाजूला पेट्रोल कंपनीचा लोगो. मग ही पेट्रोल कंपनीची जाहिरात आहे की घड्याळाची असा भ्रम निर्माण होतो. बस सिग्नल सुटल्यावर निघते. सहज बाजूला लक्ष जाते तर एक भल्या मोठ्या आडव्या जाहिरातीत तो स्मॉल बी रागात पाहत असतो. आता तो असा का पाहतो आहे हेच कळत नाही, थोडक्यात ‘नो आयडीया!’. पुढे रस्त्यात एक गोड मुलीचा फोटो. बाजूला लिहिले असते ‘ऑनली फॉर फोर इयर किड्स’. बहुदा लहान मुलांच्या कपड्याच्या दुकानाची जाहिरात असावा. बस धावत असते.

पुढच्या चौकात ते उदीता गोस्वामीचे टेनीस कोर्टवर फोटो. नुसताच तिचा फोटो आणि जाहिरात एका इमारतीची. आता इमारतीचा आणि तिचा काय संबंध असा मी विचार करीत असतो तोच. बाजूला आणखीन एक बिल्डरची असलीच जाहिरात. थोडे पुढे आल्यावर संजूबाबा एका पुडीची जाहिरात करतांना. त्यापुढे आल्यावर एका बस त्या सगळ्या मुलांसोबत तो वोडाफोनच्या कुत्र्याच्या फोटोचा फ्लेक्स. झु झु मुळे बिचाऱ्याचा जॉबच गेलेला. फ्लेक्स पाहिल्यावर आनंद वाटतो. त्यापुढे एक मुलगी कारच्या दारातून डोक काढून हसते आहे असा फ्लेक्स. ती अस का करते हे समजेपर्यंत आय सी आयसीआय, आणि यामाहाचे फ्लेक्स येऊन जातातही. बस पुढे निघते. एका बाजूला एका छान बाळाचा आणि त्याच्या आईचा फोटो. असो, एका हॉस्पिटलच्या जाहिरातीचा फ्लेक्स. बाजूला ‘बेस्ट केअर’ वगैरे लिहिलेलं.

त्यापुढे असेच युनीनॉर्चे अनाकलनीय फ्लेक्स.  पुढे बस एका चौकात येते. येत असतांना एका एसटीडी बुथवर छोटाच बोर्ड ‘चाय से मेहंगी कॉफी! मगर लोकलसे सस्ती एसटीडी’. मस्त आहे. पुढे एका बसस्टॉपवर एका बँकेचा फ्लेक्स. परंतु त्या मुलीचे कोणीतरी डोळे फोडल्याने भयानक वाटतो. त्यापुढे फर्निचर, लुट वगैरे. स्वेटर घातलेल्या मुला मुलींचे कपड्यांच्या दुकानावरील फ्लेक्स. थोड पुढ गेल की, सचिन आदिदासच्या बाहेर खुर्चीतला फ्लेक्स. थोड आणखीन पुढे आल्यावर एक मुलगी दुसऱ्या मुलीचे गालगुच्चे घेतानाचा फ्लेक्स. काय कळत नाही एअरची टेलला नेमक काय म्हणायचे आहे. एक बेडूक एका इन्स्टिट्यूटची जाहिरात करतांना. एक बोरावके ‘कु कुच कु’ चिकन चा बोर्ड. पुढे एक ड्रेस घातलेला ‘शौर्य’वान मुलगा.

त्यापुढे सचिनचा कौन जितेगा वर्ल्डकपचा फ्लेक्स वगैरे. बस थोडी अजून पुढे येते. परंतु फ्लेक्स काय संपत नाहीत. इंडीयन क्रिकेट लॉटरीचे मिस्कील चित्र ‘अमूल’च्या फ्लेक्सवर. पुढे हा ज्वेलर, तो सन्स, स्पा, ही बाईक आणि ते हाऊस. शेवटी चिमण्यांच्या बसस्टॉपवर उतरतो. तो बाजूला पुन्हा स्मॉल बी रागात! असा का पाहतो याची शेवटपर्यंत ‘आयडीया’ येत नाही. काही आयडिया आहे का? तो असा का पाहतो?


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.