बँकांची लफडी


सकाळी मित्राचा फोन आला. फोन उचलला तर तो बोलला ‘अरे, आजही बँकेचे काम झाले नाही’. असो, मी फ़क़्त हसलो. कारण आज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची बँकांना सुट्टी आहे हे मला माहित होत. त्याच्या सांगण्यावरून मी त्याच्या जळगावच्या नातेवाईकाच्या खात्यात पैसे ऑनलाईन जमा केले. त्याला त्याच्या नातेवाईकाच्या मदतीला दोन तासात पैसे पाठवायचे होते पण ते करायला तीन दिवस लागले. दोन दिवस त्याने दोन तीन बँकेच्या पाच एक शाखांचे उंबरठे झिजवले होते तरी त्याचे काम झाले नाही. आज सुट्टी बघून तो जाम चिडला होता.

बर ह्याच्याकडे पैसे होते. आणि ते त्याने नातेवाईकाच्या खात्यात ऑनलाईन पैसे पाठवले. एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे ऑनलाईन पाठवल्यावर ते त्या खात्यात जमा व्हायला किमान तीन दिवस लागतात असे कळले. मग ह्याने मला माझे खाते कुठल्या बँकेत आहे असे विचारले. आता त्याच्या नातेवाईकाचे खाते असलेली बँक आणि माझे खाते असलेली बँक एकच आहे कळल्यावर त्याने मला तू ऑनलाईन पैसे नातेवाईकाच्या खात्यात जमा कर असे म्हणाला. पण त्यावेळी माझ्या खात्यात त्याला हवी तेवढी रक्कम जमा नव्हती. मग मी माझ्या बँकेच्या पुण्याच्या मुख्य शाखेत फोन लावला. त्यांना बँकेत पैसे भरण्याची वेळ काय आहे असे विचारल्यावर चारपर्यंत अस उत्तर आले. आता त्याला माझा प्रश्न कळला नव्हता का कुणास ठाऊक. पण त्या बँकेच्या शाखेत गेल्यावर पैसे जमा करण्याची वेळ एक वाजेपर्यंत होती अस कळल.

मग त्याने त्याचे स्वत:चे खाते असलेल्या बँकेत चौकशी केली. तिथेही तेच. दुसऱ्या दिवशी सकाळी ह्याने एटीएम मधून पैसे काढून ती रोख रक्कम जमा करण्यासाठी नातेवाईकाचे ज्या बँकेत खाते आहे. त्या बँकेच्या हिंजवडीच्या शाखेत गेला. तिथे शिर्डीच्या साईबाबा मंदिराप्रमाणे मोठीच्या मोठी रांग. मग तो चिंचवडच्या शाखेत गेला. पण तिथे त्या बँकेचा ‘सर्व्हर डाऊन’. मग हा निगडीच्या शाखेत गेला. पण तिथे जमा करणाऱ्याच्या भल्या मोठ्या तीन रांगा. शेवटी हा वैतागून दुपारी दीड वाजता कंपनीत आला. आज पुन्हा बँकेत सकाळी लवकर गेला तर सुट्टी. असो, माझ्या  खात्यात आज पैसे जमा झाल्याने त्याचा प्रश्न सुटला. पण हे अस अनेकदा घडतं. आणि  ज्यावेळी खरंच ताबडतोप गरज असते त्याचवेळी नेमक अस होत.

एकदा मी संगणकाच्या कर्जाविषयी चौकशी करायला बँकेत गेलो होतो. आता संगणकासाठी ‘पर्सनल लोन’ मिळते हे मला माहित होते. आणि त्यांचे जाहिरात देखील नीट वाचली होती. पहिल्या दिवशी गेलो तर त्या विभागाच्या मुख्य बाई उद्या ये मग सांगते असे म्हणाल्या. दुसऱ्या दिवशीही तेच. तिसऱ्या दिवशी विचारायाला गेल्यावर मला विचारले की तुमच्या कंपनीचे खाते आमच्या बँकेत आहे का?. मी ‘नाही’ म्हटल्यावर. मग तुम्हाला लोन मिळू शकत नाही अस सांगितले. मग त्यांना ते जाहिरात पत्रक दाखवले. त्यात असे कुठेच लिहिले नव्हते. ते पाहून ती उलट माझ्यावरच माझा वेळ वाया घालवू नका असे बोलली. आता तेच जर तिने दोन दिवस आधीच सांगितले असते तर माझा वेळ वाचला असता. दुसऱ्या बँकेत संगणकाच्या लोन विषयी चौकशी करायला गेलो तर तुमच्या पहिल्या कंपनीचे, या कंपनीचे ऑफर लेटर, जोईनिंग लेटर आणि एक्सपिरियन्स लेटर तसेच जिथे राहतो त्याचा प्रुफ आण मग बघू असे म्हणाले.

आता खर तर त्यावेळची कंपनीने देखील एवढी माहिती आधी आण मग तुझ्या इंटरव्यूचे बघू असे म्हणाले नव्हते. लोनच्या माहितीसाठी याची गरज काय? काय कळल नाही. असो, नंतर मी संगणक डायरेक्ट रोख खरेदी केला. ती गोष्ट वेगळी. नंतर असेच एकदा माझ्या मित्राने माझा एक चेक मुंबईतून टाकला. पण आठवडा होऊन देखील चेक जमा झाला नाही. चौकशी केली तर चेक मुंबईतून पुण्यात जमा व्हायला पंधरा दिवस लागतात असा बँकेने जावईशोध लावला. पंधरा दिवसांनी सांगितले की तुमचा चेक बाऊन्स झाला आहे. असो, त्यावेळी महिन्याभरासाठी माझी तंगी झाली होती.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.