बाबा


मॉम बाबाचे नाक पुसत बोलली, ‘बाबा, उठ लवकर! आज शाळेत नाही जायचे का?’. बाबा रडक्या आवाजात ‘मॉमsss, आधी माझे लगीन’. मॉम ‘कशाला? मी असले तुझे चोचले पुरवणार नाही. चल उठ पटापट आवरून घे’. ‘ते काही नाही. आता बोल. नाहीतर मी नाही जात चिंचवडला’ बाबा चिडून बोलला. मॉमने हसत ‘अरे त्यासाठीच तर तुला तिथे पाठवते आहे ना’. बाबा ‘काय? पण तू तर म्हटलीस तिथे भाषण द्यायला जायचे ना’. मॉम ‘माझ्या राजा, अरे पुण्यातल्या मुली येतील की, मग एखादी तरी पटव’. बाबा त्रासलेल्या चेहऱ्याने ‘ते त्या ओरिसा प्रमाणे तर पोरी नसतील ना??’. मॉम ‘चल वेडा कुठला.. आवर लवकर पीयू येईलच इतक्यात. आणि जरा दाढी करून जा’. ‘अरे मनमोहना, बेड टी झाला का रे बाबाचा’ मॉम ओरडली.

बाबा विमानातून उतरला. सभागृहात बाबा येताच, सर्वांनी एकच घोष सुरु केला ‘बाबा तुम आगे बढो!’. स्टेजवर येताच बाबा बाजुच्याला पहात बोलला ‘अजून किती आगे बढायचे रे? आल की स्टेज’. सर्वजण खुर्चींवर बसले. बाबा मात्र उभा.. माईक समोर. सगळे विधी पार पडल्यावर बाबाने पोरी पाहायला सुरवात केली. हळूच एक आवाज आला, ‘बोल की बाबा रे’. बाबाच्या कानी आवाज पडताच बाबाचं चित्त ठिकाणावर आले. तरी एका पोरीवरून त्याची नजर हटेना. बाबाने बोलायला सुरवात केली. आज मी तुम्हाला सर्वांना काही सांगायला नाही आलो, तर ऐकायला आलो आहे. अस बोलतच सगळ् सभागृह दणाणून गेल. आज तुम्ही मला वाटेल ते प्रश्न विचारा. तुमच्या शंका, माझ्याबद्दलची तुमची मते अगदी मनमोकळ्यापणे सांगा.

सुरवात कर, म्हणू त्या पोरीकडे माईक देण्यास सांगितले. ती मुलगी ‘हाय, मी बबडी’. तिचे शब्द कानावर पडताच तितक्याच आवेशात ‘हाय हाय! मी बाबा’. अस म्हणताच सारा प्रेक्षकवर्ग हसायला लागला. मग बाबाने स्वतःला सावरलं. नेक्स्ट, एक मुलगा उभा राहून बोलला ‘राज यांच्या भाषिक, प्रांतिकवादाबद्दल तुमचे मत काय?’. बाबाच्या कानावर ‘राज’ हे शब्द पडताच, डोक्यावरची पुणेरी पगडी आणखीनच जड वाटू लागली. दोन मिनिटे तसाच शांत उभा राहून, टोपी काढत बाबा ‘त्यांचे फक्त बंबईमे..’ कोणी तरी ओरडले ‘मुंबई’. बाबा गडबडला ‘हा तेच, माझ चुकल. मुंबईत त्यांचा आवाज चालतो’. पुढचा एक जण उभा राहिला आणि बोलला ‘मोनोरेल बद्दल तुमचे मत काय?’. बाबा बोलला ‘जपान मध्ये एका मिनिटांत दुसरे स्टेशन गाठणाऱ्या मोनोरेल आहे. माझ्या मते आपण देशात असंच विकास घडवून आणला पाहिजे. त्यासाठी युवकांनी राजकारणात यायला हवं.’.

पुन्हा कोणी तरी ओरडल ‘इथे रस्ते नाहीत त्याचं काय?’. बाबा गोंधळून ‘मॉमने असंच बोलायला सांगितले होते’. अजून एक जण उभा राहून ‘देशात धान्य सडते आहे त्याबद्दल तुमचे मत?’. बाबा ‘मॉमने याबद्दल काहीच बोलायचं नाही अस सांगितले आहे’. पुढचा एक जण उभा राहताच बाबाने त्याला विचारले ‘इथे वॉशरूम कुठे आहे?’


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.