बाळासाहेब ठाकरे


काय बोलू! अगदी असह्य होतंय. अगदी ती, बाळासाहेब नसण्याची बातमी आल्यापासून ते आतापर्यंत सगळंच.. माहिती नाही का, पण त्या महान व्यक्तीच्या नसण्याच्या गोष्टीने अगदी असुरक्षित वाटत आहे. खर तर एक गोड बातमी तुम्हाला सांगणार होतो. पण हे अस घडलंय की..घराचाच आधारस्तंभ कोसळल्याप्रमाणे वेदना होत आहेत. त्या महामानवाबद्दल काय बोलावं, काय सांगाव.

माझ्यासारख्या मराठी माणसाचा तर तो एक देव होता. तो सामन्यांच्या वेदना जाणणारा. मनातलं जाणणारा, खऱ्याखुऱ्या अर्थाने ‘हिंदुह्रदयसम्राट’. मराठी मुलखाच्या रयतेचा ‘सरकार’. मराठी माणसाचा खरा जाणता राजा. त्यांच्या एका हुंकारांनी साध्या मराठी तरुणाच्या अंगी बारा हत्तींचे बळ संचारत असे. त्यांची भाषणे म्हणजे मनाशी केलेला संवाद होता. बाळासाहेब ठाकरे खऱ्या अर्थाने ‘वक्ते’ होते. त्यांची शैली, त्यांचे अवघे जीवन म्हणजे एक ‘इतिहास’ आहे.

एका मध्यमवर्गीय मराठी माणसाचा, मराठी माणसाच्या हक्कासाठीचा केलेला लढा. त्यांच्याकडे पाहून कोणत्या मराठी माणसाची छाती अभिमानाने भरून येणार नाही? निराशेच्या काळोख्या अंधारात आणि जुलमी सरकारच्या जुलामांना त्रासलेल्या जनतेसाठी निर्भीडपणे लढणारा एक ढाण्या वाघ. ज्याच्या डरकाळीत दिल्लीचा दरबार हलवण्याची धमक होती. मराठी अस्मितेचा मानबिंदू.

बाळासाहेब ठाकरेंच्या कर्तुत्वाचे वर्णन इतक्या साध्या शब्दांतून होणे अथवा शब्दबद्ध होणे शक्य नाही. असा महापुरुष पुन्हा होणे शक्य नाही. प्रत्येक मराठी माणसाच्या जीवनातील त्यांचे स्थान अढळ आणि आदरणीय आहे. माझ्यासारख्या अतिसामान्य मराठीकडून भावनेच्या भरात त्या महान व्यक्तीबद्दल काही अपशब्दांचा वापर झाला असेल तर चुकभूल क्षमा असावी. खर तर माझ्या भावनांनी परिसीमा गाठली आहे. अश्रूंचा महासागर थांबायला तयार नाही आहे. त्यामुळे इथेच थांबतो.

,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.