बुजगावणे


माझ्या कंपनी जवळपास सर्वच बुजगावणे काम करतात. ते शेतात आपण पाखरांना येऊ नये म्हणून चारा आणि लाकडांचा वापर करून एक ‘बुजगावणे’ बनवतो. त्याला कपडे घालतो. आणि उभे करतो. तसे, अगदी तसे आमच्या कंपनीत हे बुजगावणे आहेत. बसमध्ये बसले तर मानेचा साधा ४५ अंशाचा देखील करीत नाहीत. शेजारी कोण येऊन बसला. कोण गेला. यांना काहीच फरक पडत नाही. कधी चुकूनही स्वतःहून बोलणार नाहीत. एक तर नाकासमोर बघणार किंवा खिडकीतून बाहेर. आता मुलींना बुजगावणे म्हणणार नाही. कारण त्यांची ‘बडबड’वरून त्या जिवंत आहेत हे तरी कळते.

पण आमचे बाकीचे जणू काही कोणाच्या श्राद्धावरून आले आहेत असे! काय बोलणार? लिफ्ट मध्येही असेच. आणि डेस्कवर तर काही बोलू नका. माझ्या बाजूला बसणार्यांची नावे देखील मला माहित नाहीत. बर, जाता येतांना निदान तोंडओळख म्हणावी तर ती देखील नाही. आता कदाचित त्या पगारात मिळणाऱ्या आकड्यांवरून ह्यांचे बुजगावणे तर झाले नाहीत ना अशी शंका येते. म्हणजे सगळे असेच आहेत. एखाद्या प्रोजेक्टमध्ये काही काम असेल तरच ही बुजगावणी जिवंत होतात. प्रोजेक्टमध्ये असेल तर ‘हाय बाय’. आणि प्रोजेक्ट संपला की झालेच ‘बुजगावणे’. आता या बुजगावणेगीरीला हे ‘प्रोफेशनलीझम’ समजतात. पण बोलू नका. निदान जिवंत असल्याची एखादी खुण तरी दाखवा. साधे मान हलवायला काय मोठे कष्ट पडतात देव जाणे.

मी पाणी घ्यायला ‘पॅंट्री’ जातो त्यावेळी देखील असेच. जणू काही ह्यांनी दुसर्याला पहिले तर कंपनी ह्यांच्यावर खुनाचा गुन्हाच दाखल करणार आहे.  प्रोफेशनलीझम यांच्यात रक्तातच आहे. साधे शिंकले, बर तर शिंकणे कसले. शिंकतांना देखील एवढी नाटके. बर चुकून ‘बुजगावणे’ शिंकलीच तर ‘सॉरी’. साधे बसमध्ये सीटवर दुसरा आला म्हणून थोडे आपण सरकले की झालेच ‘थॅंक्स’ सुरु. म्हणण्यापर्यंत ठीक आहे. पण पुढे परत ‘बुजगावणे’ बुजगावणे बनतात. आणि पुन्हा कधी चुकून भेटले तर आयुष्यात पहिल्यांदाच भेटत आहोत असा चेहरा करतात. यांना काही भावना, वेदना काही आहेत की नाही देव जाणे. अरे मीच चुकलो, बुजगावण्यांना कधी वेदना, भावना असते का? कधी हलणार, डुलणार नाही. आता काही बुजगावणी नाहीत. पण त्यांची संख्या एकूण संख्येच्या अर्धा टक्का देखील नाहीत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.