बोनस


आमच्या कंपनीत यावेळी बोनस काही होणार नाही. दिवाळी आणि दसरा हे सण जसे धार्मिक महत्व असते तसे आर्थिक देखील असते. दसऱ्याला घरी गेलो होतो. माझ्या लहान भावाला दसऱ्याला बोनस मिळाला. त्याबरोबर मिठाईचा बॉक्स देखील. स्वारी भलतीच खुश होती. आल्या आल्या विचारलं आईने ‘बोनस कधी मिळणार?’. आता हा प्रश्न याआधी काका, काकू, ‘ती’ ची आई, बहिण अशा सगळ्यांनीच विचारला होता. आणि सगळ्यांना दिलं तेच उत्तर मी आईला दिलं ‘यावेळी मिळल अस काही वाटत नाही’. मित्राचा आज इमेल आला होता. त्यात ‘हे सगळे बोनसची वाट पाहत आहेत, आणि तुम्ही?’, आणि खाली दहा पंधरा लाल रंगाच्या माकडांचा ग्रुप फोटो होता. पाहून त्याच्या देखील कंपनीत यावेळी बोनस नाही हे मी समजलो.

परवाच लोकलमध्ये हा विषय झाला. सगळेच नाराज होते. मी मंदी आल्यापासून बघत आहे. सगळ्या वृत्तपत्रात मंदी मंदी म्हणून रकानेच्या रकाने भरून येत होते. आपले पंतप्रधान सुद्धा मंदीची री ओढली होती. आमच्या कंपनीत तर मंदीच्या काळात काम वाढले होते. मी आधी रोज जेवढे काम करायचो त्यापेक्षा अधिक काम करून देखील काम बाकी रहायची. पण म्हणायला मंदी ना. कुठलेच भाव कमी झाले नाही. बँकने होम लोन कमी केले पण त्यात अटी वाढवल्या. म्हणजे जस स्टेट बँकने होम लोन ८% केल पण त्यापुढे तो ‘*’ टाकायला विसरले नाहीत. खाली अट अशी होती की ‘आठ टक्के व्याज दर फ़क़्त एका वर्षासाठी आहे’. थोडक्यात काय मस्तपैकी उल्लू बनवलं. बाकी थोड्या फार प्रमाणात टीव्ही कंपनींना नफा कमी करावा लागला. आता खर तर अस होत की मंदी पोलादाचा भाव कमी झाला म्हणून निर्माण झाली. त्यामुळे पुण्यात काय पण इतरही ठिकाणी बिल्डरांची बुड बसली. अजूनही काही कारण आहेत. पण सगळ्या क्षेत्रात मंदी नव्हती. निदान आयटीमध्ये तरी मोठ्या कंपन्या सोडल्या म्हणजे ज्यांचे अमेरिकन क्लायंट त्यांना नक्की फरक पडला. पण त्याचा फायदा इतरांनी करून घेतला. म्हणजे आमच्या कंपनीत कोणालाच पगारवाढ झाली नाही. माझ्या मित्रांच्या कंपनीत देखील नाही.

आमच्या कंपनीला आता अमेरिकन क्लायंट आहेत. पण मंदीच्या सुरवातीला नव्हते. त्यामुळे आम्हाला आणि आमच्या कंपनीला तर काही फरक पडण्याचं कारणच नव्हत. पण गंगेत हात धुतल्यासारखे, मंदीत देखील आमच्या कंपनीने हात धुऊन घेतले. पुण्यात तर काही विचारूच नका. अनेकांना बेकार व्हाव लागल. मंदीची भीतीच वातावरण असताना अनेक कंपन्यांनी आपल्या फायद्यासाठी अनेकांना काही कारण नसताना नोकरीवरून काढलं. आता फायदा सगळ्या कंपन्याचा होतो आहे म्हटल्यावर कशाला कोण बोलेल? नुकसान मात्र अनेक कामगारांचे झाले. ह्या मंदीच्या काळात अजूनही आमची कंपनी फायद्यात आहे. उलट नफा वाढला आहे. पण बोनस नाही. कारण मंदी आहे ना. माझ्या काकाला या दसऱ्याला बोनस मिळाला. पण मागील वेळेपेक्षा कमी. आता मंदी आली म्हणून काही सरकारने प्रोफेशनल आणि इन्कम ट्याक्स काही माफ केला नाही.

बहुतेक या दिवाळीत माझ दिवाळ वाजणार. भाऊबिजेला सगळ्या बहिणींना काही ना काही द्यावे लागेल. त्यात दिवाळीची खरेदी. त्यात दिवसाला भाजीपाल्याचे आणि कांद्याचे भाव वाढतात. पण फिकीर कोणाला? शरद फिरतो आहे मताचा चंद्र शोधत. राहुल कोणाला ‘आम आदमी’ म्हणतो कुणास ठाऊक. एकूणच या महिन्यात माझा पूर्णच्या पूर्ण दिवाळ वाजणार हे नक्की दिसतंय. बाकी बोनसचा विचार कारण म्हणजे मूर्खपणा आहे अस मला आता तरी वाटायला लागल आहे. मुंबईला होतो त्यापेक्षा जवळपास अडीच पटीने खर्च वाढला आहे. पण मी आधीच्या मानाने खूपच कमी खर्च करीत आहे. बोनस बाकी बंधू राजांना मिळाल्याने साहेब मला आणि माझ्या कंपनीला नावे ठेवायची एकही संधी सोडली नाही. आणि त्यात आईने त्याला खूपच मदत केली. जाऊ द्या अस होत असत कधी कधी.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.