भयकथा


भूत असते की नाही माहित नाही. पण भूतावर अनेक दंतकथा आहेत. या चिंचवडमध्ये पूर्वी चिंचेची आणि वडाची खूप झाडे होती. पवना नदीच्या दुसऱ्या बाजूला बाजूला, म्हणजे थेरगावमध्ये एका चिंचेच्या रात्री भुते असतात. असे लोक म्हणायचे. त्यावेळी एल्प्रो कंपनीची सेकंडशिप चार ते रात्री बारावाजेपर्यंत असायची. एकदा काही कामगार सेकंडशिप करून कंपनीतून सुटल्यावर अशाच गप्पा मारत सायकलीवर घरी जात असतांना एका नवीन कामगाराला इतर कामगारांनी त्या चिंचेच्या झाडाजवळ भूत असल्याची गोष्ट सांगितली. त्याने या सगळया खोट्या गोष्टी असतात, भूत वगैरे नसतात. असे त्या बाकीच्या कामगारांना म्हटले. त्यावर त्या कामगारांनी ‘मग हिम्मत असेल तर त्या झाडापाशी रात्रीच्या वेळी जाऊन दाखव’ अशी अट घातली. त्या नवीन कामगाराने देखील ताबडतोप ताबडतोप ती अट स्वीकारली.

नदीच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या त्या चिंचेच्या झाडाखाली तो नवीन कामगार गेला. सायकलीवरून त्याने झाडाला एक गोल चक्कर मारली. चिंचेच्या झाडाच्या खाली असलेल्या पारावर उभा राहुन त्याने मोठ्याने ‘कोणी आहे का?’ अशी आरोळी दिली. सगळीकडे भयाण शांतता पसरली होती. हवेचा झाडांतून होणारा आवाज सोडून बाकी सगळ शांत होत. याने पुन्हा मोठ्याने ‘कोणी आहे का?’ अशी आरोळी ठोकली. तरीही काहीच नाही. त्याच्या बाकीच्या कामगार मित्रांना इथे काहीच नाही अस सांगायला म्हणून मागे वळला तर बाकीचे कामगार मित्र भुताच्या भीतीने आधीच पळून गेलेले. ह्याला ते कामगार मित्र भित्रे हसल्याचे हसू आले. तेवढ्यात आपल्या मागे कोणी असल्याची हालचाल त्याला जाणवली. त्याने मागे वळून पहिले तर कोणीच नव्हते. घरी निघण्यासाठी तो कामगार जाऊ लागला तर अचानक त्याच्या समोर एक रक्ताने माखलेला हात आला. कामगार ते पाहून गडबडला. त्याच्या हातात असलेली सायकल तिथेच टाकून तो वेगाने पळू लागला.

तो रक्ताने माखलेला हात पहिल्याने ह्याला काहीच सुचत नव्हते. धावता धावता रस्त्याच्या कडेला एका झोपडीत कंदिलाचा प्रकाश दिसला. हा धावत झोपडीसमोर गेला. त्या झोपडीत एक म्हातारी बाई कंदिलाच्या प्रकाशात उसवलेले कपडे शिवत होती. ह्याने त्या झोपडीत जाऊन घडलेली सगळी हकीकत त्या म्हाताऱ्या बाईला सांगितली. तिने ह्याच सगळ म्हणण एकून घेतल्यावर त्याला तो हात कसा होता अस विचारलं. ह्याने घाबरलेल्या अवस्थेतच ‘रक्ताचा’ होता अस सांगितलं. ते ऐकल्या बरोबर त्या म्हातारीने तिचा हात समोर करून विचारलं ‘हाच का तो हात?’ त्याने हाताकडे पहिले तर तोच हात जो त्याने चिंचेच्या झाडाखाली बघितलेला होता. त्या म्हातारीचा रक्ताचा हात बघितल्या बघितल्या हा आणखीनच घाबरला आणि झोपडीच्या बाजूला असलेल्या शेतातून पळत सुटला.

पळता पळता एका शेतात एक शेतकरी त्याला शेत नांगरणी करतांना दिसला. हा भेदरलेला पाहून त्या शेतकऱ्याने ह्या कामगाराला आवाज दिला. हा शेतकऱ्याच्या जवळ गेल्यावर त्या शेतकऱ्याने त्याला पळण्याचे कारण विचारले. ह्याने घडलेली संपूर्ण हकीकत सांगितली. त्यावर तो शेतकरी त्याचा हात दाखवत विचारले ‘हाच का तो हात?’. ह्याने त्याचा हात बघितला तर तोच ‘रक्ताने माखलेला हात’. मग हा जाम घाबरला. तिथून हा जो धावत सुटला ते डायरेक्ट घरीच पोहचला. रात्रीचे दोन वाजले होते. घरी जाऊन बघतो तर त्याची आई देवपूजा करीत बसलेली. ह्याने रडत रडत सगळा प्रकार तिला सांगितला. तिने आपल्या मुलाचे सगळे म्हणणे ऐकून घेतले आणि जाऊन झोप असे सांगितले. हा इतका घाबरलेला होता की ह्याची झोपच उडून गेली होती. त्याने तिला जवळ बसायला सांगितले. त्यावर तिने ‘एवढे काय घाबरायचे ह्या हाताला’ असे म्हणून तिचा तो ‘रक्ताने माखलेला’ दाखवला. तो हात पाहून तो नवीन कामगार जागेवरच हृदययाच्या झटक्याने मरून गेला. असो, ही दंतकथा माझ्या बहिणाबाईने मी आठवीत असतांना अशीच एकदा रात्री सांगितली होती. आणि इतकी रंगवून सांगितली होती की रात्रभर मला झोपच आली नव्हती. अशा अनेक दंतकथा आहेत की ज्या खऱ्या की खोट्या माहित नाही पण ऐकतांना अंगावर काटा उभा राहतो.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.