भाषा


भाषा! माफ करा, पण पुन्हा एकदा या विषयावर बोलतो आहे. कदाचित मी फारच स्पष्ट किंवा फारच रागात बोलतो अस वाटेल. पण स्पष्ट बोललेलं कधीही चांगल. मी माझ्या नोंदींवर, ब्लॉगवर प्रत्येकाचा आणि त्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया या सर्वांचा आदर करीत आलो आहे. मला खरच कोणाचे मन दुखावायाची मनापासून इच्छा नाही. याआधी देखील मी हेच बोललेलो. आणि आताही मी बोलतो की, मला प्रत्येकाच्या प्रतिक्रिया मान्य असतात.

खर तर आता जे बोलतो आहे ही एक प्रतिक्रियाच आहे. फक्त फरक भाषेचा. मराठी भाषा खूप जुनी आहे. मुळात कोणत्याही भाषेत पाहिले तर जसे चांगले शब्द आहेत. तसे ‘वाईट’. मुळात शब्द ‘वाईट’ नसतात. त्याचा अर्थ वाईट असतो. किंवा त्या अर्थाने आपण दुखावतो. फार घोळत नाही, आपल्या मराठीत त्याला ‘शिव्या’ म्हणतात. आणि एक आश्चर्याची म्हणा किंवा काय, सर्वांनाच या येत असतात. बस्स, कोणी बोलते आणि कोणी बोलत नाही. पण येतात सगळ्यांनाच. त्या कुठे आणि कशा द्यायच्या हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आता इतकी बडबड ह्याच्यासाठी की, आज आलेली ती एक प्रतिक्रिया. मी काढणार नाही. पण एक विनंती आहे, माझे वागणे बोलणे फारच वाईट वाटत असेल. मी फारच फडतूस किंवा भंगार वाटत असेल तर, कृपा करून येण्याचा त्रास करू नका. कशाला उगाच येण्याचे आणि त्यावर प्रतिक्रिया देण्याचे कष्ट!

वाईट फक्त या गोष्टीचे आहे. ज्या साहेबांनी ही प्रतिक्रिया टाकली आहे. त्यांनी याआधी देखील त्याच जुळत्या मिळत्या भाषेत प्रतिक्रिया टाकलेल्या आहे. म्हणजे मला त्यांना ‘पॉइंट आउट’ करायचे नाही. अजूनही अनेक रथी महारथी आहेत. म्हणजे परवाचेच ‘ते’. आता मी काय बोलू? कदाचित, माझी भाषा कळत नाही. शिवाजी महाराजांचा इतिहास २०२० मध्ये कसा असेल, यावर एका नोंदीत बोललेलो. आता मी काही सत्याचे ‘शोध’ घेत नाही. किंवा तसे काही ‘वास्तववादी’ आणि खरे खुरे ‘सर्वधर्मसमभावाचे’ किंवा ‘जातीभेद’ विसरून तर काही बोलत नाही. मी ही शाळेत मला जो महाराजांचा इतिहास शिकवला. तोच मी प्रमाण मानला. वाईट या गोष्टीचे वाटते, त्यावेळी इतिहासाच्या पुस्तकात महाराजांनी अफझल खानाचा कोथळा बाहेर काढलेला. आणि मध्यंतरी लाल महालात गेलेलो तेव्हा, शिवाजी महाराजांनी अफझल खानाला तलवारीने मारले. खर काय ते, महाराजांना आणि त्या खानाला माहित.

बर, मी थोडीच बोललो की, महाराज मुस्लिमांचे शत्रू होते. किंवा ते धर्मनिरपेक्ष नव्हते. होतेच महाराज धर्मनिरपेक्ष. अगदी सच्चे धर्मनिरपेक्ष. आजकालच्या धर्मनिरपेक्ष प्रजाती आणि पैदास सारखे नाही. त्यांनी खंडोजी खोपाड्याचा ‘चौरंग’ केलाला. आणि शाहीस्ताखानची बोटे छाटलेली. म्हणजे तो सुटला म्हणून. नाहीतर ‘प्यारच’ केला असता. पण दर वेळी भूगोल पेक्षा जास्त वेळा आमचे प्रिय सरकार इतिहास बदलते. मग ते कसे पटेल? बर आमच्या इतिहास संशोधकांना वाद निर्माण करणे फार आवडते. सगळीकडे नुसते वादच वाद. जन्मापासून वाद जे सुरु होतात ते महाराज आणि त्याही पुढे जाऊन पानिपतच्या लढाईपर्यंत. काय मिळते वाद वाढवून? बर ते सोडा. मला एक सांगा शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू नव्हते, हे मान्य. पण मुस्लीम राजे, सम्राट त्यांचे शत्रू नव्हते का?

बर हे सगळ सोडा. मला एक सांगा, संभाजी महाराज. संभाजी महाराज तर ‘धर्मवीर’. का तिथे देखील!!! अजूनही गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी, आमच्या निगडीत संभाजी महाराजांच्यावर रचलेल्या पोवाड्याचे कार्यक्रम होतात. ते ऐकतांना मी एकटाच नाही. म्हणजे ही बोलाची कढी वगैरे नाही. पण प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. अंगात ज्वाळा निर्माण होतात. मन अजूनही भडकते. ती जमात संपवून टाकावी, असे विचार मनात येतात. प्रत्येकातील धर्म जागा होतो. विचार करा! संभाजी महाराज कसे आणि आम्ही कसे! नाही होत का काहीच? कसल्या जाती पाहता? जात गेली खड्ड्यात. कधी अस वाटत नाही? सोडा! काय बोलण्यात अर्थ आहे. आम्हाला ते लाल महालातील कोंडदेवांचा पुतळा काढणे महत्वाचे.

मध्यंतरी, जेव्हा लाल महालात गेलो होतो. त्यावेळी तो पुतळा पाहिला. तो पुतळा कसला माणसासारखा आकार दिलेला एक पत्रा. त्याला एकच काळा रंग. पाहून काहीच वाटत नव्हते. कशावर वाद घालावा? काय बोलावं? कसले पुरावे? काय अर्थ आहे ह्या गोष्टींना? इथे महागाईने हालाहाल केलय. साल, त्या सरकारला फक्त लोकांच्या नुकासानीतच आनंद मिळतो. माझ्या गावात, म्हणजे चिंचवड नाही. माझे जन्मगाव. नगर मध्ये वांबोरी नावाचे एक छोटेसे गाव आहे. तिथे कांद्याचे मोठे मार्केट आहे. तिथे दोन दिवसापूर्वी कांदा पंधरा हजार रुपये क्विंटल. म्हणजे एकशे पन्नास रुपये किलोने विकला गेला. हवं तर परवाचा ‘सकाळ’ चाळा. आता त्या टॅमाटोचे भाव वाढत आहे. आधी आई नसतांना दिवसाचा माझा खर्च शंभर-सव्वाशे यापलीकडे नव्हता. आता तो दीडशेच्या वरती गेला आहे. तीन महिन्यात खर्च वाढला. सोडा, आम्हाला काहीही बोला आम्ही आपले ‘जातीवंतच’ राहणार!

आता मी ज्या गोष्टी बोलल्या ह्या ‘शिव्याच’ होत्या. पण, यातून कोणाची ‘इज्जत’ काढली नव्हती. त्यामुळे, भाषा जर चांगली वापरली तर विरुद्ध बाजूच्या व्यक्तीला ‘अपमानित’ वाटत नाही. जर ‘अरे’ बोललं, तर समोरचा ‘का रे’ असंच बोलणार. पहा, फार विषय चघळत बसण्यात अर्थ नाही. प्रत्येक जण सुज्ञ आणि समजूतदार आहे. ‘भाषा’ हे एक शस्त्र आहे..


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.