भेडीया


एका जंगलात एक भेडीया रहात असे. जंगलातील, सर्व प्राण्यांच्या बित्त ‘बातम्या’ तिला माहित असत. सिंह कोणाची शिकार करतो. ससे, हरणे परिवारातील कोणकोणत्या सदस्यांवर ससेमिरा चालू आहे. जंगलातील कुत्री कोणाकोणाकडून हप्ते गोळा करतात. अगदी, मुंगीचे कितवे बाळपण होते, इथपर्यंत सर्वांची माहिती. राजा सिंहाच्या गुप्तहेरांना देखील जी माहिती उपलब्ध नसे ती माहिती भेडीयाकडे असे. ती रोज सकाळी जंगलातील घडलेल्या महत्वाच्या बातम्या एका चौकोनी आणि उंच शिळेवर उभे राहून कथन करीत असे. आणि त्या महत्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी जंगलातील सर्व प्राणी रोज त्या शिळेस समोर गोळा होत असत.

तिच्या निर्भीड परंतु गोंधळ न करणाऱ्या बातम्यांमुळे जंगलात शांतता नांदत असे. घडलेला वाईट अथवा चांगला प्रसंग थोडक्यात विवेचन आणि अर्थपूर्ण शब्दात असल्याने जंगलातील प्राणी सहजासहजी चूक आणि बरोबर याचा निर्णय बरोबर घेऊ शकत असे. आणि त्यामुळेच राजा सिंहने अघोषित बातम्या देण्याचा हक्क तिला दिला होता. आणि त्यामुळे तिला जंगलात महत्व प्राप्त झाले. त्या भेडीयाला बातम्या गोळा करायचा छंद जडला. आणि तोच पुढे जावून सर्वांच्या डोकेदुखीला कारणीभूत ठरला. तिला मिळालेल्या महत्वामुळे कोणीही तिला कोणत्याही गोष्टीला अडवत नसे. आणि तिच्या वागण्याला देखील चुकीचे म्हणत नसे. त्यामुळे त्या भेडीयाला आपण जे करतो आहोत हेच बरोबर आहे असा ‘गैरसमज’ झाला. आणि ती ‘सुसाट’ सुटली.

जंगलात कुणाच्या गुहेत अथवा घरट्यात एखादी दुर्दैवी घटना घडली अथवा वाईट प्रसंग ओढवला तर भेडीया एका झेपेत त्या ठिकाणी जाऊन ‘तुम्हाला आता कसे वाटत आहे?’ असा प्रश्न त्या प्राण्यांना करायची. आधीच दुख: आणि चिंतेत अडकलेला तो प्राणी या प्रश्नाने गोंधळून जायचा. तो प्रश्न त्याला त्याच्या जखमेवर मीठ चोळल्या प्रमाणे वाटायचा. तो त्या प्रश्नाने चवताळून जायचा. पण याचे भान त्या भेडीयेला नव्हते. तिने सिंहाच्या मंत्रिमंडळात एखादा नवा मंत्री आला अथवा काढला गेला. तर त्यांनाही जावून तोच ठरलेला प्रश्न ‘तुमचे यावर मत काय?’ ‘तुम्हाला आता कसे वाटत आहे?’. अनेकदा एखादा प्राणी त्याचा राग त्याच्या प्रतिक्रियेतून दुसऱ्या प्राण्यावर काढायचा.

आपल्या चुकीचे खापर दुसऱ्यावर फोडायचा. त्याने ज्यावर खापर फोडायचा त्याचा जावून भेडीया त्याची प्रतिक्रिया विचारायची. तोही मागचा पुढचा विचार न करता त्याच्या विरुद्ध आपले मत नोंदवायचा. त्यामुळे जंगलात हळू हळू गट तट निर्माण होवू लागले. चूक आणि बरोबर यातली दरी आता विद्वेषाने घेतली. प्राण्यांमध्ये शत्रुत्व टोकास जाऊ लागले. आणि जंगलाचे शांततामय वातावरणाला धक्का पोहचू लागला. सर्वजण आपापसांतील हेवेदाव्यांमध्ये गुंतून पडले. याचा गैरफायदा काही जंगलातील तस्करांनी आणि चोरांनी घेतला. पैशाच्या जोरावर ती भेडीयेकडून हवे तसे वदवू लागली. सिंह राजाने घेतलेला निर्णय कसा चुकीचा आहे. किंवा एखादा चांगला प्राणी कसा नियमाविरुद्ध कृत्य करतो. याचे खुलासेवार वर्णन भेडीया आपल्या बातम्यांद्वारे करू लागली. त्यामुळे असंतोष निर्माण झाला.

सिंह जंगलातील असंतोष कमी कमी करण्यासाठी घेतलेले निर्णय मागे घेऊ लागला. सिंहाचा धाक कमी होवू लागला. आणि भेडीयेचा दबदबा वाढू लागला. आधी जंगलातील आनंदी आणि सुखमय जीवन आता त्रासदायक आणि चिंताजनक झाले. सर्वजण विचार करू लागले. या चिंतेचे कारण काय? पण कुणालाच कळेना, या घटनेमागे चूक कोणाची आहे. आणि का वातावरण चिघळले?


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.