मना


मी मना ला समजावतो. पण ते माझ ऐकून घेतच नाही. ‘निर्णय’ झाल्याचे मी त्याला सांगतो. पण.. ते माझ हे ऐकताच रुसून बसते. उदास होते. मी त्याला ‘चांदणी’ आयुष्य असल्याचे सांगतो. ते मला चंद्राची कोरीचा हट्ट करते. मी त्याला सांगतो, तो भूतकाळ. ज्यात फक्त अधीरता होती. ज्यात फक्त मी होतो आणि मीच. ते मला त्या सोनेरी क्षणांची आठवण करून देते. त्या सहवासाची, त्या अनमोल मोत्यांची. मी त्याला पुन्हा बोलतो. जाम झापतो. पण ते माझा निर्णय ऐकतच नाही. मला नाही नाही ते प्रश्न विचारून भंडावून सोडते. मला माझ्या शांततेची कारण विचारते.

मी त्या मनाला स्पष्ट शब्दात, चांदणीच आयुष्य असल्याचे दरडावतो. ती कोर कधीच आपली नव्हती. ती होती त्या चंद्राची. मी त्याला पुन्हा समजावतो. तो ‘नामकरणाचा’ क्षण आठव अस सांगतो. ते शब्द. ते लाव्हापेक्षा भयानक असे शब्द. मन शांत होते. माझ्याकडे पाहून, का अस घडलं? विचारू लागते. मी त्याला भूतकाळ सोड, वर्तमान पहा. भविष्याची पहाट अनुभव. त्यात रममाण हो! अस सांगतो. पण ते भूतकाळातील ते अधीर परंतु न विसरता येणारे दिवस कस विसरू? असा प्रश्न करते. मी त्यावर, ते दिवस आठवून तरी काय होणार? असा प्रतिप्रश्न करतो. मन मला देवाने अस का केल? अशा इच्छा का वाढवल्या? हे धडधडणारे हृदय का दिले. विचार करणारे मन का दिले? अस खिन्नतेने विचारू लागते.

मी त्याला झाल गेल, सोडायचं असत. भूतकाळाला कवटाळून वर्तमान वाऱ्यावर सोडण्यात काहीच अर्थ नसतो. ते हुंदके देऊ लागते. डोळे त्याची साथ देऊ लागतात. मी दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न करतो. मी त्याला भविष्यात येणारी ती चांदणी सर्वस्व असेल, जिच्यावर तुझा हक्क असेल. जी फक्त तुझी असेल. पण मन त्या रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात लपून बसते. मी त्याचा शोध घेतो. मी थकतो. घरी जावून झोपतो. मग स्वप्नात, मनासोबत ती चंद्रकोर असते. कधी त्याला ती रागावते. कधी त्याच्याशी दिलखुलास ती गप्पा मारत असते. मन तिच्यासोबत समाधानी असते. त्या दोघांना पाहून मी देखील आनंदी असतो.

सकाळ सोबत वास्तव मला जागे करतो. वास्तव पहातच मी हडबडून जातो. त्या आरशासमोर उभा राहिल्यावर मन पुन्हा उदास असते. स्वप्नातील ती चंद्रकोर सत्यात का नाही? अस पुन्हा एकदा विचारू लागते. मी मनाला समजावतो, चांदणी पुन्हा आपले विश्व आनंदी करील. आपल्याला पुन्हा सुख मिळेल. ते मोत्याचे, ते सोनेरी क्षण पुन्हा येतील. पुन्हा एकदा हसरी पहाट असेल. आणि वास्तवात ती असेल. त्या काळ्याकुट्ट रात्री ती चमकत असेल. मन उभारी भरते. कामासाठी सज्ज होते. मी आणि मन दोघेही कामात गुंततो. कामाचा आणि त्या दिवसाचा आस्वाद घेतो. दिवस जसजसा संपू लागतो तसतशी मनाची स्थिरता ढळू लागते. मन पुन्हा केविलवाणी आर्जवा करू लागते. एकाद्या जोडप्याला पाहून. पुन्हा तेच तेच प्रश्नांचा भडीमार करू लागते. आणि मी त्या वेड्या मनाला आधीप्रमाणेच समजावतो. तरीही ते त्या काळ्याकुट्ट आकाशात त्या चंद्राच्या कोरीला न्याहाळत असते. मी रोज त्या अंधारात, त्याचा मग काढीत त्याच्या मागे असतो. मना, एकदा तरी माझे ऐक. बाळ मना जगायचे, जगण्यात मरणे की मरणात जगणे हे आपण ठरवायचे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.