मम्याव


मम्याव! काल मित्राशी बोलत होतो. मला म्हणाला माझ्या मुलीचे मी ‘इंग्लिश’ मिडीयममध्ये शिक्षण करील. ती अजून दहा दिवसाची सुद्धा नाही. तो खुश होता. ‘बाप’ माणसाचा आनंद. संध्याकाळी घरी आलो तर, बाजूची चिमुरडी तिच्या आईला आई न म्हणता ‘मम्याव’ म्हणून हाक मारीत होती. ऐकून हसू आले. परवापर्यंत ती आई म्हणून हाक मारायची. बहुतेक ही तो तिच्या ‘मम्मी’ची इच्छा! मी जिथे रहातो तिथे ही चिल्लर कंपनी खूप आहे. सगळेच ‘देड फुटे’. मजा येते. नुसतीच दंगामस्ती चालू असते. खेळ काहीही! मध्यंतरी पावसानंतर पाण्यात उड्या मारत बसलेली. त्याचे बोबडे बोल! हसू येते.

ती अआई मला ‘काक्का’ म्हणून हाक मारते. तिच्या आईला आई म्हणून हाक, तर तिच्या वडिलांना ‘पपा’. मी माझ्या वडिलांना ‘अण्णा’ म्हणून हाक मारतो. काय माहित कस, त्यांना अस का हाक मारतो. माझा एक मित्र आहे. तो त्याच्या वडिलांना ‘काका’ म्हणून हाक मारतो. दुसरा एक आहे. तो त्याच्या वडिलांना ‘आबा’. माझा आत्येभाऊ त्याच्या वडिलांना ‘तात्या’ म्हणून हाक मारतो. ‘बाबा’ हा शब्द तर खूपच कॉमन आहे. म्हणजे खूप जास्ती प्रमाणात वडिलांना हाक मारायला वापरला जातो. एक तर वडिलांना ‘मामा’ म्हणतो. ते थोडे वेगळे वाटते. अजून एक आहे, तो त्याच्या वडिलांना ‘नाना’ म्हणून हाक मारतो. पण जवळपास सर्वच मित्र आईला ‘आई’ म्हणून हाक मारतात. पण ते काल ‘मम्याव’ ऐकल्यापासून खूपच वेगळ वाटल. एखादी मांजर जशी ‘म्याव’ करते तसं.

शब्द ही एक ताकद आहे. सगळे मंत्र म्हणजे तरी शब्दच ना! आपण उच्चारणारे प्रत्येक शब्दात, एक ताकद असते. ‘आई’ किंवा ‘बाबा’ शब्द अगदी, आई वडील असल्याचा भास करतात. पण हे काय ‘पप्पा’ आणि ‘ममा’. मुळात कानाला खूप वेगळ वाटते. अस हळू हळू एक एक शब्द वाढत जाऊन आपण आपले मूळ अस्तित्व विसरून जाऊ. आणि आमच्या गावाकडील गावकरी लोक, अस ‘मम्याव’ करायला लागले. तर ह्याला प्रगती कशी म्हणणार. ‘इंग्लिश’ भाषा आली की, विकास झाला अस का मानतात कुणास ठाऊक. चीन आणि जपान या देशांपेक्षा आपली ‘इंग्लिश’ नक्कीच खूप चांगली आहे. पण आपण खूप वर्षे मागे आहोत त्याच्या मानाने. फार बोलण्यात अर्थ नाही. निर्णय ज्याचा त्याचा आहे. माझ्या घरात मम्याव आणि पप्पाव शब्द मला तरी ऐकायला आवडणार नाही.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.