मम


चार दिवसांच्या ‘गृह’वासा नंतर मी कंपनीत जाण्यासाठी उतावीळ झालो असतो. बसमध्ये बसल्यावर मन अप्सरेच्या विचारात बुडून जाते. फक्त ती ती आणि ती. दुसरा विचारच डोक्यात नसतो. कंपनीत गेल्यावर मी डेस्कवर जातो. पण ती तीच्या डेस्कवर नसते. मी संगणक चालू करतो. माझे चुकून एका मुलीकडे लक्ष जाते. तीचा चेहरा माझ्या विरुद्ध दिशेला असल्याने ‘अप्सरेपेक्षा अजून सुंदर कोण आहे?’ अशी शंका येते. मेंदू मला ‘हे चुकीचे आहे’ असे सांगायला सुरवात करतो. मी खजील होतो. पण मन ती अप्सरा आहे अस म्हणायला सुरवात करते. ‘ती कोण?’ याविषयावर मेंदू आणि मन यात द्वंद सुरु होते. दोघांचे भांडण थांबवण्यासाठी मी संगणकात डोके घालतो.

थोड्या वेळाने अचानक ती आल्याचा आभास होतो. मी मान वर करून पाहतो तर ती मुलगी तीच्या मित्राशी बोलून निघालेली. आणि पहातो तर खरोखर ती ‘अप्सरा’च असते. मेंदू आणि मी तीच्या सौंदर्यात बुडून गेलो असतो. मन तर आधीच तीला पाहून तिच्यात बुडून गेले असते. तीच्या लक्षात येत. ती मला पाहून हात हलवून ‘हाय’ करते. माझाही हात तिला ‘हाय’ करतो. मन, मेंदू आणि मी तिघेही तिचे रूप पाहून हरखून गेलेलो असतो. मी तिच्याशी बोलायला खुपंच उतावीळ झालो असतो. तीच्या डेस्ककडे जाण्यासाठी मी निघतो. मन खुशीत मला गुदगुल्या करीत असते. आणि पुन्हा नेहमीप्रमाणे माझे पाय तीच्या डेस्ककडे जातांना अडखळतात. मी माझा रस्ता बदलतो. आणि एपीएमच्या डेस्ककडे मी माझा मोर्चा वळवतो. मन आणि मेंदू मात्र तिचाच विचार करीत असते. एपीएमशी गप्पा मारल्यावर तीच्या डेस्ककडे जाण्यासाठी निघतो. पण.. ती डेस्कवर नसते. मी उदास चेहऱ्याने माझ्या डेस्कवर येऊन बसतो.

मन स्वस्थ बसू देत नाही. मी कॅन्टीनमध्ये जातो. बाजूच्या एटीएममधून पैसे काढतो. बूट पॉलिश करून तिथून वडिलांना फोन करतो. फोनवर बोलत जात असतांना, ती तीच्या मित्रासोबत कॅन्टीनमध्ये दिसते. ती पुन्हा हात हलवून ‘हाय’ करते. आणि मी ही तेच करतो. एक सेकंदासाठी मन तिच्याशी जाऊन बोल म्हणून हट्ट धरते. पण तिच्याकडे वळताच त्या एसीमध्येही मला घाम फुटतो. मी तिथून सटकतो. डेस्कवर बसतो. कम्युनिकेटरवर डीएम ला पिंग करतो. काही सेकांदापुर्वी हरीण होणारे मन डीएम शी बोलतांना वाघ बनते. खर तर ते तिच्याच विचारात बुडून गेले असते. मी डीएमला भेटायला कंपनीच्या दुसऱ्या इमारतीत जातो. याआधी वाटणारी भीती, अचानक नाहीशी होते. मेंदू आणि मन इतके कठोर बनते की, डीएमला ‘एक घाव दोन तुकडे’ च्या भाषेत बोलायला सुरवात करते. पण शेवटी माझ्या शिक्षणाचा मुद्दा उपस्थित करून ‘डीएम’ वेळ मारून नेतो. पण आम्ही तिघेही हार मनात नाही. निघतांना मात्र ‘कंपनीच्या पे रोल वर येणे शक्य नाही’ असे डीएम सांगतो. पण त्याच सोबत कंत्राट वाढवले जाईल अशी पुस्तीही जोडतो.

मी आणि मेंदू मात्र तिला आता कसं मनातलं सांगायचे ह्या विचाराने उदास होतो. दुपारी कॅन्टीनमध्ये जेवणानंतर पुन्हा एकदा ‘हाय’ होते. मग माझा मूड बदलतो. मेंदू मात्र पुढे काय ह्या विचाराने चिंतेत असते. मेंदू मनाला सावरण्याचा खूप प्रयत्न करतो. पण ते तिच्यात बुडून गेले असते. संध्याकाळी मी हिम्मत करून तिच्याशी बोलायला तीच्या डेस्कवर जातो. पाच एक मिनिटे गप्पा होवून देखील मनाचे समाधान होत नाही. तिच्याशी बोलतांना तिच्यातच बुडून गेले असते. तिचे रूप आणि ती सोडून काहीच दिसत नसते. शेवटी अचानक ‘मला काम आहे’ असे शब्द माझ्या कानी पडतात. ते ऐकताच मन एकदमच उदास होते. आणि मी तिथून काही न बोलता तडक माझ्या डेस्कवर येतो.

मन सुन्न झालेले असते. मेंदू नेहमीप्रमाणे मला आणि मनाला नावे ठेवते. पण दहा मिनिटांत ती तीच्या मित्रासोबत कॅन्टीनमध्ये जाते. हे पाहून ‘पहा, तिला तुझ्याशी बोलायला वेळ नसतो. तू तीच्या डेस्कवर गेलास की तिला काम असते. आणि पाच मिनिटांत तिला तीच्या मित्रासोबत जायला वेळ मिळतो. याचा अर्थ काय?’ असे प्रश्न उपस्थित करून गोंधळ घालते. तरीही मन आणि मी तिचीच बाजू घेतो. माझी निघायची वेळ होते. मी तीच्या एका झलकसाठी थांबलेलो असतो. ती फ्लोरवर येते. आणि.. मी आणि मन एक सेकंदासाठी शॉक होतो. ती खूप छान गेटमधून हसत येते. पण तीच्या मागून तो शेंड्या आणि नारळ. हे पहाताच डोळे पाणावतात. राग रंग दाखवायला सुरवात करतो. मेंदू ‘आता तरी सुधार स्वतःला’ म्हणून मनाला रागवायला लागतो. मी संगणकाकडे निर्विकारपणे पहात असतो.

सगळ् आवरून मी माझ्या बसमध्ये येऊन बसतो. बाहेर पावसाची हलकीशी सर् येत असते. पण खुपंच उदास वाटत असते. मी एकटक बाहेर पहात असतो. अचानक तीचा हसरा चेहरा दिसतो. मी गडबडून नीट निरखून पाहतो. तर ती माझ्याकडे पहात हसत चाललेली असते. माझा राग विरघळून जातो. मन आनंदाने नाचू लागते. पण मेंदू मात्र अजूनही शांत झालेला नसतो.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.