मराठीमय महाराष्ट्रासाठी अनेक संकल्पना राबवता येऊ शकतात. खरंतर आपल्या साधुसंतांनी म्हटलेलं, हे विश्वची माझे घर! त्यायोगे मराठीमय विश्व हेही शक्य आहे. तूर्तास आपल्या राज्यातील मराठीच्या वापराबाबत बोलूयात! व्यावसायिक भाषा वाढते अन टिकते!
आक्रमणाचे म्हणाल तर गेल्या दोन हजार वर्षांपासून महाराष्ट्रावर व मराठी संस्कृतीवर आक्रमण होत होतंच आहे. त्यामुळे आधी सगळं छान होत आणि आता ह्रास होतोय असं काही नाही! त्यावेळेस प्रत्यक्षात शत्रू मराठी माणसांचेच गळे चिरायच्या! आता केवळ तो भाषेला मारण्याचा प्रयत्न करतोय. थोडक्यात मराठी संस्कृतीवर आक्रमणे होत आलेली आहेत व पुढेही होतील!
मुद्दा इतकाच की, मराठी माणसाने मराठी भाषेवर व महाराष्ट्रावर येणाऱ्या संकटाची चिंता करू नये! ते होणारच! जर महाराष्ट्र अख्या देशावर हिंदवी स्वराज्याची पताका फडकवू शकतो तर तो मराठी संस्कृती व भाषेचा प्रसार जगभर करून मराठीमय पृथ्वी करू शकतो!
ब्रिटिशांनी ज्यावेळी जगाच्या पृष्ठभागाच्या एक चतुर्थांश भूभागावर स्वामित्व मिळवले त्यावेळी त्यांची लोकसंख्या साधारण ५१ लाखांच्या घरात होती! जर ५१ लाख ब्रिटिश जगाच्या चौथाईवर अधिकार मिळवू शकत असतील! जर ते त्यांची भाषा जागतिक बनवू शकत असतील तर आठ कोटींच्या मराठी संस्कृतीला काय अशक्य? खरतर संख्याबळ आणि ध्येय यांचा काहीच संबंध नाही! तरीही जर आपल्याला शंका असेल तर आपण जगातील कोणत्याही युद्धाचा ताळेबंद करून पाहावा.
इथं तर आपण केवळ मराठीमय महाराष्ट्राची संकल्पना राबवण्याची गोष्ट बोलत आहोत! आज देशातील प्रत्येक राज्यात मराठी भाषिक आहे. इतकंच काय २०० देशांपैकी ७२ हुन अधिक देशामध्ये मराठी भाषिक स्थायिक आहेत. मग भीती कशाची?
मराठीमय महाराष्ट्र करण्यासाठी आधी आपल्याला वस्तुस्थिती पाहावी लागेल! जेणेकरून अमराठी भाषांची आणि मराठीची सद्यस्थिती व ताकद याची जाणीव होईल! अमराठी भाषिक संस्थांमध्ये मराठीचा वापर कसा होईल व तो होणार नसेल तर त्याला मराठी पर्यायी संस्था कशा उभ्या राहतील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्याखेरीज आपण या लढाईत यशस्वी होणार नाहीत!
लक्षात घ्या हेही युद्धच आहे! अन युद्ध कधीही संपत नसते! भाषिक आक्रमण आर्थिक कारणांमुळे झालेले आहे! त्याच कारणासाठी पूर्वीही युद्धे झालेली! महाराष्ट्र मराठीमय करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या प्रत्येकाने हे कधीही विसरता कामा नये!
मराठी वाढवण्याचे अनेक मार्ग आहेत. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर महाराष्ट्रात दिशादर्शक व फलकांवर मराठी असावी असा कायदा आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या पाठी आपण लागणे आवश्यक आहे! कोणीही कुठेही जाऊन राहू शकतो वा व्यवसाय करू शकतो परंतु, त्या भागातील कायदे पाळणे अपेक्षित असते. अमराठी भाषिकांकडून कळत नकळत अनेक कायद्यांचे उल्लंघन होते. तेही आपण लक्षात आणून दिले तर राज्यात मराठीचा प्रसार जोमाने होऊ शकतो!
देशातील राज्यातील एक तृतीयांश लोकसंख्या १३ वर्षांपेक्षा कमी असलेल्यांची आहे. त्यांच्यासाठी मराठीचे सांस्कृतिक वर्ग भरवले तर नक्कीच त्याचा फायदा त्यांना व मराठी संस्कृतीला होईल. मराठी संबंधी जनजागृती करण्यासंबंधी विविध स्पर्धा भरवून त्याद्वारे मराठीबाबत व महाराष्ट्राच्या अजेय इतिहासाची माहिती दिली जाऊ शकते.
शासनाची विविध आस्थापनांमध्ये नियमानुसार मराठीचा वापर होतो का नाही हेही पाहणे आवश्यक आहे. त्यानेही अमराठी भाषांचा अकारण वापर थांबेल व मराठीला कायद्यानुसार प्रथम स्थान मिळू शकेल. असे साधे परंतु सोपे पर्याय आपण वापरायला हवेत!
सोबतच आपण आभासी जगताचा योग्य वापर करीत मराठी भाषेसंबंधी अनेक उपक्रम राबवू शकतो. भविष्यात माहिती हे इंधनाची जागा घेईल. त्यावेळी मराठी भाषेमुळे आर्थिक फायदा मराठी भाषिकांना होऊ शकेल! माहिती असणे हे एकप्रकारे शस्त्रसज्ज असण्याप्रमाणे आहे! त्यामुळे मराठी भाषिकांनी ज्ञान मिळवावे! व मराठीत नसलेल्या गोष्टी मराठीत भाषांतरित कराव्यात! त्यानेही महाराष्ट्र मराठी वाढवण्यास मदत होईल!
मराठीमय महाराष्ट्रासाठी मराठीत सर्व सेवा कशा येतील याची चाचपणी करणे आवश्यक आहे. तसेच व्यावसायिक भाषा म्हणून मराठीचाच वापर कसा होईल हेही कटाक्षाने पहिले पाहिजे. अन या दोन्ही गोष्टींसाठी व्यावसायिक मराठी भाषिक असणे वा सेवा पुरावठेदार मराठी असणे आवश्यक आहे. त्यासाठी रोजगाराच्या व व्यवसायाच्या संधी मराठी भाषिकांनाच कशा मिळू शकतील याच्या यंत्रणेची नितांत गरज आहे!!