मराठी कालगणना


मराठी कालगणना पुन्हा वापरात आणणे आवश्यक आहे. आपण मराठी आहोत. आणि आपली संस्कृती मराठी आहे. पण आपण आपली संस्कृती खऱ्या अर्थाने पाळतो का?

गंमत वाटेल पण, आपण जन्माने मराठी आहोत अन कर्माने अमराठी. आता ह्याला आपण जबाबदार आहोत असं मला म्हणायचं नाही. मला असं म्हणायचं आहे की, आजूबाजूच्या वातावरणामुळे आपण नकळत काळे ब्रिटिश झालो आहोत.

साधं कालगणनेच पहा ना. आज आपल्याला आपले महिने माहित नाही. न दिनांक! आपण जी दिनदर्शिका पाळतो ती अमराठी संस्कृतीची आहे. बरं आपली अचूक कालगणना सोडून जगाच्या बरोबर राहण्याच्या नादात आपण आपली प्राचीन कालगणना विसरून गेलो आहोत.

गुढीपाडवा हा आपल्या वर्षाचा पहिला दिवस. त्या दिवशी निसर्गाला नवीन पालवी फुटते! याच काळात फळांच्या राज्यच, आंब्याचं आगमन होत. याचा अर्थ निसर्गानुरूप आपली कालगणना आहे.

बरं, पृथ्वीच्या सूर्याभोवती आणि स्वतःभोवती फिरण्याच्या गतीवर आपण सर्व मनुष्यांनी आपली कालगणना ठरवली. स्वतःभोवती फिरण्यासाठी पृथ्वीला साधारणपणे २४ तास लागतात. बरं अचूक काढायला गेल्यास काही क्षणांचा फरक पडतो. हेच क्षण पुढे तास आणि दिवसांमध्ये वाढत जातात आणि ते सामावण्यासाठी अमराठी कालगणनेत दर तीन वर्षांनी काही दिवस वाढवले जातात.

सोप्या भाषेत, दिवस आणि रात्र ह्यात बदल होत असतात. त्याप्रमाणे न आपली घड्याळे चालतात न कालगणना! मराठी कालगणनेत सूर्य उगवल्यावर दिवस सुरु होतो. आणि मावळल्यावर रात्र! अमराठी कालगणनेत रात्री बारालाच दिवस सुरु होतो. इतकी अचूक कालगणना आपण आपलीच स्वीकारायला हवी!

आपले उत्सव आपली मराठी कालगणना स्वीकारतात. अन नेहमी गणपती उत्सवात हत्ती नक्षत्राच्या रूपाने निसर्ग धो धो जलधारा आसमंतातून कोसळतात. इतकी निसर्गानुरूप कालगणना क्वचितच दुसरी सापडेल!

जगात चिनी, इजिप्त, ज्यू, ग्रीक, रोमन, मध्य अमेरिका, ख्रिस्ती, मराठी(भारतीय) अशा अनेक कालगणना आहेत. आपल्याला व निसर्गाला पूरक गणना म्हणजे मराठी कालगणना. त्याचा आपण सणांसोबत दैनंदिन जीवनातही वापर व्हावा.

आपल्या महाराष्ट्रात आठवडी वेतन पद्धती होती. सात दिवसांचा आठवडा अशी सरळ मांडणी. ब्रिटिशांनी मासिक वेतन सुरु केले. एका वर्षात ५२ आठवडे असतात. प्रत्येक महिना चार आठवड्यांमध्ये विभागणी केल्यास १३ महिने होतात. पण ग्रेगोरियन कालगणनेत बाराच महिने असतात. सोप्या शब्दात तुम्ही १३ महिन्यांच्या बदल्यात १२ महिन्याचं वेतन घेता.

बक्षीस म्हणून जे दिवाळीत वेतन मिळते. ते बक्षीस नसून ते तेराव्या महिन्याचं वेतन आहे. आता हेही अधिकृत करून घेण्यामागे एका मराठी माणसाचाच हात आहे. आता मराठी कालगणना पुन्हा सर्वत्र करायची झाल्यास आधी स्वतःपासून ती वापरात आणणे आवश्यक आहे.

व्यक्तीपासून समाज आणि समाजापासून देश अन पुढे जग ते स्वीकारेल. त्यामुळे ह्या बदलासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवे इतकीच विनंती!!


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.