महिला आरक्षण


घरी येतांना अनेक ठिकाणी ‘महिला दिनाचे’ फ्लेक्स बघितले. चिंचवडमध्ये महिलांनी बनवलेल्या वस्तूंची ‘प्रदर्शन व विक्री’ सुरु आहे. हे राजकारणी ना कशाचा स्वतःसाठी कुठेही वापर करून घेतील. सगळीकडे ‘महिला दिनाच्या शुभेच्छा’च्या नावाखाली स्वतःचे हसमुख फोटो लावले आहेत. काल मी शिवाजीनगरला मित्रांना भेटायला बस मधून जाताना लेडीज सीटवर बसून प्रवास केला. बऱ्याच दिवसांनी असा लेडीज सीट प्रवास केला. खूप टेन्शन होत. म्हटलं कोणी महिलेने येऊन उठायला सांगितलं तर उठावे लागेल. तस म्हटलं तर बसमध्ये डाव्या बाजूच्या सगळ्या सीट महिलांसाठी ‘आरक्षित’ असतात. कदाचित पुण्यातील अनेकांचा या ‘आरक्षणाला’ तात्त्विकदृष्ट्या विरोध आहे. उदाहरण पहायचं असेल तर ‘अग बाई अरेच्या’. पण माझा तरी सगळ्याच ठिकाणी महिला आरक्षणाला विरोध नाही.

मी तर म्हणतो बसप्रमाणे सगळ्याच ठिकाणी ५० टक्के आरक्षण असायला हवं. पण त्यांनीही पन्नास टक्के मध्येच राहायला हवं. ‘अग बाई अरेच्या’ सारखं नको. आय टी मध्ये तर ‘महिला राज’ च आहे. गावी असताना बसमध्ये कोणी मुलगीला जागा नसेल तर आपण उठून आधी तिला जागा द्यावी असा अलिखित नियमाच होता. माझ्या मोठ्या बहिणीचा आदर्श आमच्या सगळ्यांसमोर असायचा. तस ती ‘आदर्श’ ठेवावा अशीच आहे. घरची परिस्थिती नसतांना तीच्या स्वतः च्या हिमतीवर तिने इंजिनीयरींग पूर्ण केली. माझा लहान भाऊ ही तसाच. नेहमी या दोघांना पंच्यांशी टक्क्याच्या पुढे मार्क असायचे. त्यामुळे मला साठ-पासष्ठी गाठून देखील घरात नेहमी ‘ढ’ ची उपाधी मिळायची. आमच्या घरात न मागताच ‘महिला आरक्षण’ आहे. आता माझ घर देखील जरी मी घराचे लोन वगैरे बघत असलो तरी घर ‘आई’ च्या नावावर घेतले आहे. म्हणजे आर्थिक क्षेत्रात देखील आईवर बरीच इन्व्हेस्टमेंट आहे. पण या गोष्टीला कोणाचाच कशाही प्रकारे विरोध नाही. असायचं कारण देखील नाही. घरात जरी वडीलांच ऐकले जात असल् तरी आईच्या अपमानाची हिम्मतही कधी झाली नाही. साध एखादी भाजी चुकली किंवा नको म्हटलं तर आईसाहेब हसून ‘उठा’ किंवा जेवण करू ‘नका’ असा सल्ला द्यायचा. पण त्यामुळे खरं तर खूप चांगल झाल. फालतू नखरे, हट्ट असे काही प्रकार झाले नाही. कुठेही जुळवून घ्यायचं शिकायला मिळाल.

पण राजकारणात ‘महिला आरक्षण’वरून राजकारणी चांगलच राजकारण करीत असतात. एका खासदाराने जर महिलांना आरक्षण ठेवलं तर संसदेत प्रत्येक टेबलवर एक लिपस्टिक आणि आरश्याची सोय करावी लागेल अस म्हटलं होत. मी संगणकाचा कोर्स करीत असताना माझ्या मैत्रिणीच्या एका ‘वाद विवाद’ स्पर्धेत विभाग पातळीवर प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाल्याबद्दल अभिनंदन करायला मी, ती आणि आणखीन एक मित्र असे तिघे गेलो. माझी आणि त्याची पहिलीच भेट. तिने त्याच्याशी ओळख करून दिली. साहेब तर वाद विवाद पंडित होते. ती त्याचे अभिनंदन करायला म्हणून आली आणि हा पठ्या पंधरा मिनिटांत ‘महिलांना आरक्षण कशाला हवे?’ यावरून तिच्याशी वाद घालायला सुरुवात केली. आता ती एक मुलगी. ती कशाला आरक्षण नको म्हणेल. पण तिला तिचा मुद्दा पटवून सांगता येत नव्हता. हा पठ्या ‘ ३३ टक्के का मागता ५० टक्के का नाही मागत?’ ‘घटनेत सर्व समान असताना हक्क असताना आरक्षण कशाला हवे?’. यावर ती म्हणाली की महिला राजकारणात खूप मागे आहेत. त्या निवडून येऊ शकत नाही. त्यावर हा पठ्या ‘मायावती, सोनिया, स्वराज, जयललिता कशा निवडून येतात?’ अस उलट प्रश्न केला. मग तिला निरुत्तर केल्यावर साहेबांनी माझ्या मित्राला त्याच मत विचारलं. पण तोही ‘आरक्षण’ नको असंच म्हणाला. मग काय कोणी तरी तिची बाजू घ्यायला हवं ना. मग मला विचारल्यावर त्याला म्हटलं ‘तू एखाद्या लहान बाळाला बघितलं असेल ना’. तो म्हणाला ‘त्याचा यात काय संबंध?’. त्याला बोललो ‘त्याला आपल्याप्रमाणे हात, पाय, नाक, डोळे, डोक वगैरे सगळ्या गोष्टी असतात’. तो ‘हो’ म्हटल्यावर पुढ त्याला म्हणालो ‘पण त्याला चालता येत नाही. मग त्याला चालता याव यासाठी पांगुळगाडा दिला जातो.’ मग त्याला उलट प्रश्न केला ‘बाळाला पांगुळगाडा देतात?’ तो म्हणाला ‘चालता याव यासाठी’. मग त्याला म्हणालो ‘बरोबर, आता जोपर्यंत त्याला चालता येत नाही तोपर्यंत त्याला तो पांगुळगाडा दिला जातो. चालता यायला लागल की तो स्वतःच पांगुळगाडा वापरण बंद करतो.’ त्याला काही कळेना. म्हणाला त्याचा यात काय संबंध.

त्याला म्हटलं ते महिला आरक्षण असंच आहे. जोपर्यंत या मुलींना आपण स्वतच्या बळावर निवडून येऊ शकत नाही हे कळत नाही. तोपर्यंत त्यांना दिलेला हा पांगुळगाडा आहे. जेव्हा कळेल त्यावेळी त्यांना याची काहीच गरज भासणार नाही. आता असल ‘चिल्लर’ उदाहरण दिल्यावर त्याची मोठी मोठी वाक्य काय करणार. मग काय आम्ही दोघे हसत होत. आणि तो बिचारा आता काय बोलू म्हणून विचार करत बसला होता. असो हा विषय खूप मोठा आहे. असली छोटी उदाहरण देखील मी खोडू शकलो असतो. पण तो ‘अतिरेक’ करत होता. म्हणून अस म्हणावं लागल. नाही तरी आपण ज्या ‘देवी’ची पूजा करतो त्यांनाच आरक्षण मागायची पाळी आणायला लावतो हेच खर दुख: आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.