माझी बडबड


मी बडबडा आहे. खूप गप्पा करतो. बहुतेक सगळे मला बघून पकाऊ आला अस मनात म्हणत असतील अस वाटतं. काल कंपनीत दुपारी माझ्या काही सहकारींशी मी बोलत होतो. पण त्यांचे माझ्याशी गप्पा मारण्यात काही रस आहे अस दिसलं नाही. त्या आपल्या पीसीत डोक घालून आपआपल काम करत होत्या. संध्याकाळी लोकलमध्ये माझ्या मित्राशी बोलायला गेलो तर त्याने लगेचच दुसरीकडे तोंड केल. नंतर तो स्वतहून बोलला. पण त्याच्या वागण्याने माझा अडवाणी झाला होता. अस माझ्याबरोबर आधी खूप वेळा घडल आहे. पण आज प्रथमच मला जाणवलं. नंतर मी काही परत त्यांच्याशी गप्पा मारल्या नाहीत.

परवा ‘ती’ च्या लहान बहिणीचा फोन आला. ती म्हणाली ‘आज आपण संध्याकाळी बाहेर जेवायला जाऊ’. तिथ पण माझी बडबड नडली. मी तिला ‘का काय विशेष? काही विशेष आहे का?’. असं काही कारण नसताना फालतू प्रश्न विचारून तीच्या आनंदावर विरजण टाकले. ती फार आनंदाने सांगत होती. आणि मी आपला एखाद्या आजोबा सारखा आडवं लावलं. मग व्हायचं तेच झाल. ती म्हणाली ‘मी तुला परत थोड्या वेळाने फोन करते म्हणून’. दोन दिवसापूर्वी माझ्या मोठ्या बहिणीने फोन केला. त्यावेळी पण असच, ती म्हणाली ‘तुझा दसऱ्याचा एसएमएस मिळाला. पण मला मध्ये वेळ झाला नाही. म्हणून आता फोन केला’. आणि मी मुर्खासारखा तीला ‘तुझा एसएमएस मिळालाच नाही असं काही तरी वेगळेच बोलत बसलो’. मग काय होणार आहे. ती म्हणाली मी आता थोडी बिझी आहे. नंतर बोलू. आजकाल आई देखील फोन केल्यावर कशासाठी फोन केला तेवढ सांगते आणि फोन ठेऊन देते. माझ्या काही मित्रांनी मला जीटॉकवर ब्लॉक करून टाकले आहे. या गोष्टीची कल्पना खूप उशिरा आली.

एकदा शाळेत असताना मी वकृत्व स्पर्धेत भाग घेतला होता. विषय होता ‘मला पडलेले स्वप्न’. अर्धा तास मी मला पडलेले स्वप्न या विषयावर बोलत होतो. सगळे जाम वैतागले होते. मध्यंतरी मी माझ्या बॉसला काम झाल म्हणून सांगायला गेलो तर तो म्हणाला ‘एकदाच सगळ काय ते सांगत जा’. लोकलमध्ये नेहमी असं होत. कोणी तरी मला माझा बुटाची घाण त्याला लागली म्हणून हिंदीत सांगत असत. आणि मी त्याला ‘मराठी येत नाही का?’ तो चुकून ‘नाही’ म्हणाला तर मग मी त्याला ‘मग कशाला आला महाराष्ट्रात?’ असं बोलतो. असं अनेक वेळा झालं आहे. आणि मग मी माझा सगळा परप्रांतीयांचा राग त्यावर काढतो. तो बिचारा मान खाली घालून ऐकून घेतो. पण मूळ विषय बाजूला पडतो आणि माझ काही तरी वेगळेच चालते.

परवा असं पी.चितंबरंम याचं झाल पुण्यात. आले भाषणाला. भाषण केल इंग्लिशमध्ये . पुण्यातील कॉंग्रेस कार्यकर्ते पी.चितंबरंम यांची तोंड बघत राहिली. सगळेच सिक्सर गेले. मग परत ते भाषण हिंदीत भाषांतर करून सांगितले. पण ते भाषांतर सुद्धा चुकीचे केलेले. मग काय, भाषणं ऐवजी हास्यसम्राटचा कार्यक्रम झाला. मध्यंतरी गावी गेलो होतो. रात्री मित्रांबरोबर गप्पा मारत असताना एक जण झोपून गेला. बाकी आपले धरून आणल्यासारखे ऐकत होते. एकदा माझ्या लहान भावाला एक सोफ्टवेअरची माहित सांगत होतो. माझ तोंड संगणकाकडे होत. आणि तो मागच्या बाकड्यावर बसला होता. कधी झोपला ते कळलसुद्धा नाही. तरी मी विचार करत आहे मागील काही दिवसांपासून मला फोन येण एवढ कमी का झाल ते. जाऊ द्या. आज पासून हि चूक पुन्हा घडणार नाही. मी तीच्या प्रेमात पडलो होतो त्यावेळी देखील तासन तास माझा लहान बहिण आणि भावाला ‘ती’ किती छान आणि गोड आहे. याच प्रवचन द्यायचो. बर बहिण त्यावेळी पाचवीला आणि बंधुराज चौथीला. त्याचं डोक्यावरून जायचं. पण ते बिचारे माझ सगळ मी मोठा भाऊ म्हणून ऐकायचे. मागील महिन्यात मी गणपती स्थापनेला माझ्या मोठ्या बहिणीकडे गेलो होतो. तिथं पण मी माझ्या बहिणीच्या नवऱ्याला आणि बहिणीला खूप पकवलं. आता ह्या सगळ्या चुका आता झाल असं वाटतंय. बडबड तसे सगळेच करतात. पण मी जरा जास्तच केल आहे असं वाटत आहे. खूप वाईट केल्यासारखं वाटत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.