माणुसकी


काल संध्याकाळी कंपनीतून डायरेक्ट चिंचवड स्टेशनवर गेलो होतो. आजकाल दर शुक्रवार, शनिवार माझा ‘मॉल’ दिन असतो. त्या बिग बझारमध्ये दोन जीन आणि एक टी-शर्ट खरेदी केला. जायलाच संध्याकाचे साडेसहा झालेले. यावेळी पहिल्यांदाच तिथे कपडे ट्रायल करून बघितले. मागील वेळी मित्रासोबत डी-मार्ट मधून दोन जीन खरेदी केल्या होत्या आणि घरी येऊन पहिले तर त्या कमरेखाली खुपंच घट्ट झाल्या. त्यामुळे यावेळी कपडे ट्रायल करून घेतले.

त्यात माझा बाहेर जेवणाचा कार्यक्रम ठरलेला. एकतर आधीच कपडे शोधणे, ट्रायल आणि नंतर खरेदी अस करता करता साडेसात झालेले. बाहेर आलो तर पावसाची भुरभूर चालू झालेली. लवकर जाऊन आवरायचे होते. त्या बिगबझार मधून बाहेर पडलो. निघतांना बाहेर ठेवलेला जेवणाचा (संपलेला) डबा घेतला. आता कंपनीतून तसाच आलो होतो. त्यामुळे माझा गळ्यातील पट्टा जवळ होता. आणि डबा असं सगळा संसार घेऊन मी तिथे गेलेलो. येतांना त्या चिंचवडच्या पुलाच्या जवळ आलो. आणि एकदम लक्षात आले की माझे गळ्यातील पट्टा नाही. आता त्या ‘गळ्यातील पट्यात’ आय डी कार्ड, एक्सेस कार्ड, बस पास आणि तिथल्या छोट्या कपाटाची किल्ली सगळंच अडकवलेल. मग सगळे खिसे. माझ्या जवळ बिगबझारमधून येतांना बरोबर घेतलेली पिशवी, डब्याची पिशवी. सगळे दोन-तीनदा तपासले. पण सापडेच ना.

पुन्हा त्या बिगबझार मध्ये गेलो. पण तिथले सुरक्षा रक्षक कोणाचे रक्षण करतात कुणास ठाऊक. त्यांना विचारले तर ‘माहित नाही’ असे उत्तर दिले. मग त्या पावसात जाम घाम फुटला होता. वरती पाऊस आणि अंगातून घाम. काय करावं सुचेच ना! तेवढ्यात माझ्या मैत्रिणीचा मिस कॉल. पुन्हा दोनदा सगळया गोष्टी चेक केल्या. पण मिळेच ना. त्या सुरक्षा रक्षकाला सांगितले तर तो बोलला. कस्टमर सेंटरला जाऊन सांगा. माझे मन देखील मला नावे ठेऊ लागले. त्यात सोमवारची बोंब कशी होईल याची दिवास्वप्न दिसू लागली. मग अजूनच, डोक जाम झाले. वेळ बघितली तर आठ वाजत आलेले. साडेआठला माझी मैत्रीण, मी आणि माझे भाऊ बहिण असे चौघे बाहेर जेवायला जायचा कार्यक्रम होता. आता सगळेच बोंबलले अस वाटत होते. कारण तो पट्टा सापडणे आवश्यक होते.

तेवढ्यात वडिलांचा फोन आला. उचलला तर त्यांनी विचारले की कुठे आहे. मी ‘बिगबझार’मध्ये आहे अस सांगितल्यावर त्यांनी तुझा ‘गळ्यातला पट्टा’ एका व्यक्तीला सापडला आहे. आणि एक नंबर दिला. बहुतेक माझ्या आय कार्डवर असलेला इमर्जन्सी संपर्क वरील फोन नंबर पाहून त्याने कॉल केला होता. मी फोन केल्यावर कोणी एका व्यक्तीने तो त्याला सापडल्याचे सांगितले. मग कुठे काय करत मी त्याला शोधले. आणि आभार मानून तो पट्टा त्या व्यक्तीकडून घेतला. असो, तो हिंदी बोलत होता. पाहिल्यावर तर मराठी वाटला. पण यावेळी मात्र त्या हिंदीचा ‘राग’ आला नाही.

अजूनही लोक किती चांगले आहेत. खूप आनंद झाला. एखादया वाळवंटात एखादा मोठा जलाशय मिळाल्याप्रमाणे वाटले. अस या आधी माझ्याकडून काही विसरले अस कधीच घडलं नव्हते. आणि अचानक घडलेला प्रसंग. ती होणारी धाकधूक आणि नंतर मिळणारा आनंद हे सर्व वीस पंचवीस मिनिटांत घडला. असो, अजूनही माणसांत ‘माणुसकी’ आहे म्हणायची. असंच मुंबईला लोकलमध्ये एकाचा आय कार्ड पडले. आणि तो माणूस शोधण्यासाठी खाली उतरला. लोकल निघाली. त्यावेळी त्याची काय अवस्था झाली होती. त्याची जाणीव आज झाली. त्यावेळी देखील तो खूप गोंधळाला होता. लोकल निघाली आणि लोकलमधील एकाला तो आय डी सापडला. त्याने तो त्या बाहेरील माणसाला हाक मारून लोकलच्या खिडकीतून दिला. त्यावेळी देखील कदाचित त्याच्याही मनात माझ्याप्रमाणेच ‘माणुसकी’चा विचार आला असेल. काल मलाही तोच ‘माणुसकीचा’ अनुभव आला म्हणायचा.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.