माथेफिरू


हे सर्टीफिकेशन खुपंच कमी लोकांना मिळते. आणि हे टिकवणे त्याहून अवघड. कोणी संताने नमूद म्हटले आहे नां ‘जया अंगी माथेफिरूपण| तया यातना कठीण||’ खर आहे म्हणा. हे येरा गबाळ्याचे काम नोहे. दोनशे बळी घेऊन देखील कसाबला ‘आरोपी’ आणि ‘दहशतवादी’वरच समाधान मानावे लागले. कसाब काय आणि राजा काय. आणि राजू काय आरोपीच्याच सर्टीफिकेशन पर्यंत जाऊ शकतात. एवढेच काय नक्षलवादी देखील फार फार तर ‘दहशतवादी’ सर्टिफिकेट मिळवू शकतील. कारण, ‘माथेफिरू’ची परीक्षा तितकी अवघड आहे. ‘गुरु’जी सुद्धा संसदेत केलेल्या हल्ल्यानंतर जेमतेम ‘गुन्हेगार’ सर्टिफाईड होवू शकले.

खर तर या सर्टीफिकेशनला, पात्र होण्याचीच मोठी भयानक अट आहे. डोंबिवली फास्टच्या नायकाप्रमाणे अथवा ‘वेनस्डे’च्या नसरुद्दीन शाह प्रमाणे सोसावे लागते. स्पष्ट शब्दात आता जे महागाईचे हंबरडे, आणि भ्रष्टाचाराचा भ्रष्टासुराची दाह. आणि सरकारचा निरंकुश कारभाराच्या ओझ्याने दबावे लागते. गुलामीचा गंध आल्यानंतरच तो त्वेष निर्माण होतो. ती एक आग अंगात पेटते. अगदी लाही लाही करून सोडते. अगदी आत्महत्येचा विचार देखील डोकावू लागतो. जो यातून वाचला तो पात्र ठरतो. पण असह्य होते म्हणून हिमेश प्रमाणे सारखं सारखं रडण सुरु केल तर मात्र काय फायदा नाही. म्हणून तर ‘माथेफिरू’ सर्टीफिकेशन मिळवणारे खुपंच कमी व्यक्ती आहेत. पारतंत्र्यात ब्रिटिशांच्या अत्याचाराच्या विरोधात अशाच तीन लोकांनी असेंब्लीत बॉम्बस्फोट घडवून आणला.

स्वातंत्र्यानंतर अशाच एका व्यक्तीने एका महान आत्म्याला परलोकात धाडले होते. आणि गेल्या ‘थसडे’ला घड्याळाच्या मोठ्या काट्याच्या गालावर पंजा उमटवला. घड्याळात ‘बारा’ वाजवले. अशीच लोकं  ‘माथेफिरू’ सर्टिफाईड होवू शकतात. कारण नेत्यांना त्रासदायक होणारा प्रत्येक ‘माथेफिरू’ असतो. आता परवाचेच चिंचवडमध्ये घडलेली घटना नाही का, पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना उसाच्या शेतात घुसून गोळ्या घातल्या. मग एवढे करून देखील, ते पोलीस माथेफिरू नाही ठरू शकले. मध्यंतरी, हाताच्या ‘तर्जनीने’ युपीच्या लोकांना ‘भिकारी’ बोलले. पण मग, तरीही त्यांना ‘माथेफिरू’ सर्टीफिकेट नाही मिळू शकले. गुजरातमध्ये दंगली घडल्या. आणि त्याआधी गोध्रामध्ये रेल्वेचा अख्खा डबा पेटून दिला. जीवंत माणसांचे कोळसे झाले. पण त्यांना कधी कोणी माथेफिरू अस सर्टीफिकेट देण्याच्या भानगडीत पडलं नाही.

कारण एकच, मरणाऱ्यांपैकी कोणी नेता अथवा राजकारणी नव्हता. मध्यप्रदेशच्या राजधानीत विषारी वायुगळती झाली. पंधरा हजार लोकांचा नाहक बळी गेला. त्यांच्यावर अन्याय करणारे लोकं कधीही माथेफिरू ‘सर्टिफाइड’ होवू शकले नाहीत. अशी एक ना अनेक उदाहरणे देता येईल. नेत्यांना मिळणारे उत्पन्न, ‘गुरु’जींना माफी देण्याचा ठराव आणणारे काश्मिर सरकार असो. तामिळनाडू विधानसभा असो. ज्याने पंतप्रधानाच्या हत्येच्या दोषींना ‘माफी’ द्यावा असा ठराव ‘पास’ केला. त्यांना चुकूनही माथेफिरू सर्टीफिकेशन मिळणे शक्य नाही. कारण माहिती आहेच.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.