मामा तुपाशी आणि भाचा उपाशी


सध्याला पुण्यात सभाच सभा होत आहे. सगळ्यांनाच पुण्याला यायला आणि भाषणाला वेळ मिळतो आहे. राहुल गांधी सोडून. राहुल गांधी आले. पुढे काय झाले तर ‘हाय आणि बाय’. जाऊ द्या ‘बडे लोग बडी बाते’. नंतर बोलू त्या विषयावर. नासाने चंद्रावर स्फोट घडवून आणले आहेत. चंद्रावर पाणी कुठे आहे, ते शोधण्यासाठी. आता नासाचा निर्णय घेण्यामागे काही ना काही तथ्य असेलच. काही दिवसांपूर्वी आपल्या भारताने चंद्रावर पाणी असल्याचा शोध लावला. खूप मोठी कामगिरी केली. आपला भारतपण ना एक प्रश्नचिन्ह आहे. एका महिन्या आधीपर्यंत पुण्यात पाणी कपात चालू होती. एक वेळ तर अशी आली होती की पंधरा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा उरला होता. कोल्हापुरात तर पाऊस पडावा यासाठी काही लोकांनी यज्ञ देखील केले. शेवटी पाऊस पडला. आता ठीक आहे. पाणी पूर्वीसारखे येते आहे.

आमची गावी साडेतीन एकर जिरायती जमीन आहे. पण पाण्यामुळे तिथे पेरलेले धान्य हव त्या प्रमाणात येत नाही. पण वडिलांची जिद्द. ते नेहमी आमच्या वाटेकऱ्याकडून शेतीत नांगरून. मशागत करून. खत टाकून. ज्वारी, मुग पेरतात. पण दोन तीन पोत्यावरती काही येत नाही. मेहनत आणि खर्च कुठेच कमी होत नाही. पण प्रश्न अडतो पाण्याचा. विहिरीच्या पाण्यावर पिक उभ राहू शकत नाही. आपल्या राज्यातच काय पण देशभरात स्वातंत्रापासून दुष्काळ पडतच राहिला आहे. साठ वर्षापूर्वी देखील आणि आताही दुष्काळ पडतो आणि सरकार दुष्काळ जाहीर करते. यापलीकडे काहीच होत नाही. पाणीप्रश्न यावर हजारो पाने, हजारो तज्ञांनी आणि हजारो तास यावर खर्च केले आहेत. पण शेवटी उत्तर काहीच नाही. पाणी नाही म्हणून पिक नाही. पिक येत नाही म्हणून शेतीत उत्पन नाही. उत्पन नाही म्हणून शेतकऱ्याजवळ पैसाच नाही. पैसा नाही म्हणून शेतकरी नाईलाजाने कर्ज घेतो. पण मिळकत नसल्याने शेवटी आत्महत्या करतो. असा गाडा चालू आहे.

मध्यंतरी समुद्राचे खारे पाणी शुद्ध करून पिण्यायोग्य बनवण्याचा शोध आपल्या शास्त्रज्ञांनी लावला. पाणी प्रश्न सोडवावा म्हणून मग आपले शास्त्रज्ञ चंद्रावर असलेल्या पाण्याचा देखील शोध लावला. बहुतेक आता भारतीय शास्त्रज्ञ चंद्रावरील पाणी यानाने भारतात आणणार आणि पाण्याचा प्रश्न सोडवणार अस वाटतं. नाही तर ‘मून लिंक’ असा काही नदी जोड प्रमाणे चंद्रजोड प्रकल्प होईलही. किंवा आपल्या शास्त्रांज्ञांच्या मनात असेलही. मग त्याला शरद पवार ‘सोनिया गांधी मून लिंक’ अस नाव सुचवतील. आणि पुढच्या निवडणुकीत हाच मून लिंक मुद्धा असेल. असा दूरदृष्टी ठरवून विचार केला की काय अस वाटत आहे. स्पष्टच बोलतो, चंद्रावर भलेही पाणी असेल आणि जीव सृष्टी असेल. पण आपल्या इथे पाणी नाही का? का नद्या नाहीत? का समुद्र नाही? का पाऊस कधीच पडत नाही? आपण कर भरायचा आणि यांनी मनात येईल आणि जे वाटेल ते करायचं. आता खूप मोठा प्रदेश पाण्याविना तडफडत आहे. आपण हे वाक्य देखील अनेक वर्षापासून आणि अनेक वेळा ऐकत आलो आहोत. पण चंद्रावर दलदल शोधायला आणि कीटक शोधायला यांना जमत. आणि इथले पाणीप्रश्न यांना गौण वाटतात. बर एकं यान पाठवायला आणि एक पाण्याचा ट्रक पाठवण्यातील कोणता खर्च अधिक आहे?

इकडे सरकाने पैसे नाही म्हणून बोंबा मारायच्या आणि तिकडे हवेत फुसके प्रयोग करायचे. बर संशोधन कसलं तर दगडाचं आणि मातीच. उद्या पाण्याविना पृथ्वीवरचे लोक मरायला टेकले त्यावेळी काय करायचं त्या चंद्राच्या दगडांच्या फोटोचं? पाणी नाही म्हणून अनेक लोक नव्हे तर गावाच्या गाव स्थलांतरित होतात. पाण्यामुळे इथे राज्याराज्यात वाद होतात. आणि आपण ते चंद्रावरचे चिखलाचे काढलेले फोटो बघून आपली पाठ थोपटायची. काय उपयोग? आधी घरच मग बाहेरच. साधा आणि सोपा हिशोब आहे. घरी दोन वेळ जेवणाची बोंब आणि आपणाला घरी फोर्ड गाडी हवी. काय करणार त्या गाडीच? रस्ते, पाणी असे अनेक प्रश्न कोणीच सोडवले नाहीत. नेते आणि सरकार सोडवतील याची आशा नाही. पण शास्त्रज्ञ लोक खूप हुशार असतात. मग त्यांच्या डोक्यात ह्या कल्पना येत नाहीत? आधी इथे पाणी शोध आणि त्याचा फायदा लोकांना होऊ द्या. मग हाका तुमची यान हव तिकड. इकडे चांदोमामावर पाणी आहे म्हणून काही देशात दिवाळी साजरी झाली नाही. उलट दिवाळच वाजल म्हणायचं. अबज्यावधी रुपये खर्चून ते यान पाठवण्यात आणि दगडा गोट्यांचे फोटो पाहण्यात फुशारकी मारण्यापेक्षा नक्कीच इथले स्थानीक पाणी प्रश्न सोडवल्यास निदान इथले जीव शास्त्रज्ञांना आशीर्वाद देतील. उपकार समजून पुतळे उभारतील.जेव्हा या देशातील प्रश्न मिटतील त्यावेळी शास्त्रज्ञांनी खुशाल प्ल्युटोवरदेखील पाण्याचा शोध घ्यावा. इथं भाचा पाण्याविना उपाशी आणि तिकड पाणी म्हणून चांदोमामा तुपाशी.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.