मित्र


परवाच्या गोष्टीनंतर आता मित्र कोणाला म्हणावे असा प्रश्न पडला. परवा माझ्या चार मित्रांना रविवारी भेटू म्हणून फोन केला. त्यापैकी एक गावी गेलेला होता. म्हणून त्याला यायला जमणार नव्हते. तसे त्याने मला फोनवर सांगितले. दुसर्याला फोन केला तर तो ‘बायको भक्त’ दुपारी दोननंतर भेटलं तर चालेल का अस विचारले. त्याला हो म्हणालो. तिसर्याला फोन केले तर तो चालेल म्हणाला. आणि चौथ्याला फोन केला तर तो ‘बहिण भक्त’ बहिणीला भेटायचे आहे. त्याची बहिण आजारी होती. मग त्याला म्हणालो आपण दोघेही भेटायला जाऊ संध्याकाळी. तर तो ठीक आहे म्हणाला. तो मला निघण्याआधी फोन करेल असा वायदा केला.

रविवारी सकाळी त्या तिसर्याचा फोन आला की, थोडे कंपनीत काम आहे. मग आपण दुपारी भेटले तर चालेल का? म्हणून. त्या ‘कंपनी भक्ताला’ चालेल म्हणालो. त्यानेही दुपारी फोन करतो निघालो की अस म्हणाला. आता त्या बहिणी भक्ताच्या फोनची वाट पाहत बसलो. तर त्याचा तर फोन काही आलाच नाही. साडेबाराच्या सुमारास ‘बायको भक्ताचा’ फोन आला. मला म्हणाला की मला थोडे काम आहे. त्यामुळे मला यायला जमणार नाही. असो, शेवटी बायकोचा आज्ञाधारक अजून काय बोलू शकतो? मागील महिन्यात बायको माहेरी गेली होती त्यावेळी माझ्या मागे लागला होता की आपण भेटूयात म्हणून. आता बायको आली. मग कस काय जमणार? ‘साहेबांना’. लग्न झाल्यावर सगळंच बदलून जात अस म्हणतात. ते खर आहे, हे मला काल कळलं. कधीही नाही न म्हणणारा, ‘काम आहे’ अशी थाप मारत होता. सोडा.

त्या ‘कंपनी भक्ताचा’ देखील फोन नाही आला. शेवटी त्यांची ‘वाट’ पाहण्यात माझ्या दिवसाची वाट लागली. रात्री वैतागून ‘कंपनी भक्ताला’ फोन लावला. तर जणू काही घडलेच नाही अस बोलत होता. असो, हे आजकाल नेहमीचेच झाले आहे. त्यांनी फोन केला की मी त्यांच्याही आधी भेटायला पोहचतो. आणि ज्यावेळी मी फोन करतो. त्यावेळी हे असे. बहुतेक यांनाच खरे मित्र म्हणतात. तो बहिण भक्त कधीच चुकून देखील फोन करत नाही. आठवण येत नाही का की मुद्दामहून करतो, कुणास ठाऊक? ‘कंपनी भक्त’ करीत असतो अधून मधून काही ‘गरज’ असल्यावर त्याची. ‘बायको भक्ताचे’ एक वर्षापूर्वी लग्न झाले. मग काय त्याची बायको माहेरी गेल्यावरच त्याला मित्रांची आठवण येते. आणि मी फोन केला की, ‘तुला आजकाल माझी आठवण येत नाही’. अस तो मला म्हणतो. ‘चोराच्या उलट्या बोंबा’ यालाच म्हणतात बहुतेक.

एक तर हे विकएंड एवढे बोर करतात ना! ‘एकटेपणाची’ जाणीव करतात. काही काम असेल तर काही वाटत नाही. पण काहीही काम नसेल तर घर ‘खायला’ उठत. मग ते विकएंडचे दोन दिवस दोन महिन्याप्रमाणे वाटतात. या ‘बहिण भक्ताला’ आज सकाळी फोन केला तर ‘मी आजारी आहे’ अशी नवीन थाप मारली. काय झाले विचारले तर ‘चप्पल चावली’ असे उत्तर आले. म्हणजे काल याची बहिण आजारी होती. आणि आज हा. असो सोडा तो विषय, आता चुकूनही ही चूक करायचे नाही अस मनाशी ठरवलं आहे. त्या ‘थ्री इडीयटां’वर पुन्हा कधी विश्वास ठेवणार नाही.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.