मी चुका सम्राट


काय सांगू काल आणि आज मी कंपनीत कामात फारच चुका केल्या. तसा चुका अखंडपणे करण्याचा विक्रम मीच नोंदवला असेल. ज्या कामाला फार फार तर अर्धा दिवस लागायला हवा तिथ मी काल आणि आज मिळून दोन दिवस लावले आहेत. आणि अजूनही काम काही झालेलं नाही. अकरावीत असताना एका निबंध स्पर्धेत भाग घेतला होता. विषय होता भ्रष्टाचाराचा. त्या स्पर्धेत मला प्रथम क्रमांकाचे बक्षीस सुद्धा मिळाले. पण ज्यांनी स्पर्धा आयोजित केली होती त्या अण्णा हजारेंच्या कार्यकर्त्यांबद्दल आणि त्यांच्या समितीतील भष्टाचार बद्दल बरच काही मी त्या निबंधात लिहिले होते. वकृत्व स्पर्धेत भाग घेतला, आणि भाषणासाठी उभा राहिलो. विषय होता माझा आवडता नेता. आणि भाषणाची पारंपारिक सुरवात केली आणि कोणावर बोलायचे तेच नेमके विसरलो. मग काय एका मित्राने सांगितले, मी कोणत्या नेत्यावर बोलणार होतो ते.

परीक्षेत तर काही विचारूच नका. दहावीच्या चाचणी परीक्षेचा बीजगणित, भूमिती या विषयांचे गुण कळले. उत्तरपत्रिका वाटल्या नंतर मला सरांनी उभे केले आणि विचारले कि तू कॉपी केली होतीस ना परीक्षेत. मी म्हणालो नाही मग ते म्हणाले कि तुला बीजगणितात ३८ पैकी ३५ गुण आणि भूमितीत ३७ पैकी शून्य अस कस काय. मग मला खर काय ते सांगावा लागल. मी म्हणालो कि बीजगणित आणि भूमितीचा अभ्यास करून मी आलो होतो. पण दिलेल्या वेळेत मी फ़क़्त बीजगणिताची प्रश्नपत्रिका सोडवली. भूमितीचा सुद्धा पेपर सोडवायचं हे मी विसरूनच गेलो. घंटा झाल्यावर लक्षात आल. बारावीत असताना मी शास्त्र शाखेत होतो. बोर्डाच्या परीक्षेत मी इंग्लिश विषयाची प्रश्पात्रिका तीन तासात शंभर पैकी पन्नासच गुणांची सोडवून घरी आलो होतो. निकालाच्या वेळी खूपच धाकधूक लागलेली होती. अस वाटत होत इंग्लिश विषयात नापास झालो तर लोक काय म्हणतील मला. शास्त्र शाखेत जावून इंग्लिश विषयात नापास झाला. पण देवाच्या कृपेने ४४ गुण मिळाले. आई ने एकदा मला एक किलो चक्का आणायला बाजारात पाठवले. आणि दुकानात भावाची पाटी वाचता वाचता मी दुकानदाराकडून एक किलो मलई आणली. मग काय आई चिडली आणि वडील हसत बसले मला. एकदा तर प्रगती पुस्तकावर मी पालकांच्या स्वाक्षरीच्या ठिकाणी माझी स्वाक्षरी केली होती.

आमच्या गावातील क्रिकेटच्या स्पर्धेतमध्ये मला एका संघात घेतले. अगदी शेवटी पाठवले. त्यावेळी आमच्या संघाला तीन चेंडूत चार धावा करायच्या होत्या. पहिला चेंडू हुकला. दुसरा चेंडू काखेत. आणि तिसऱ्याला मी डोळे झाकून फळी घुमवली (ह्या डोळे झाकून फळी घुमावण्याच्या प्रकाराला तिथे ‘आंधी’ असे म्हणत असत) डोळे उघडून बघतो तर काय समोर चेंडू दिसेच ना. म्हटलं गेला कुठ. अस विचार करत मागे वळून पाहतो तर काय चेंडू सीमेच्या पलीकडे. आता हे कसे घडले हे मला पण नक्की सांगता येणार नाही. कारण मी त्यावेळी डोळे मिटून घेतले होते. तो चौकार सुद्धा चुकून गेला होता. मराठी विषयाच्या तोंडी परीक्षेत मला कुसुमाग्रजांची ‘ओळखलत का सर मला?’ नावाची एक कविता पाठ करून म्हणायची होती. मी सरांसमोर जाऊन त्यांनी सुरवात कर म्हणायच्या आधीच ‘ओळखलत का सर मला’ अस म्हटलो, त्यावर वर्ग पूर्ण हसायला लागला तर सर जाम चिडले. एकदा आमच्या एका सरांनी मला प्रश्न विचारला कि तू शाळेत कसा येतो त्यावेळी मी त्यांना ‘चालत चालत’ अस उत्तर दिल होत. बारावीत असताना तर मी जीवशास्त्रच्या सरांना भर वर्गात ‘मुलींनाच का मुल होतात?’ असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी सगळे हसले. आणि आता मलाही ते आठवून हसू येते. एकदा मुंबईत असताना रात्रीच्या वेळी डब्यात गर्दी कमी म्हणून मी एका स्त्रियांच्या डब्यात चढलो होतो. एकदा क्रोसिंग करताना टीसीने पकडल्यावर एका क्रोसिंग करणाऱ्या मुलीकडे बोट दाखवून मी त्याला विचारले होते ‘तुम्ही तिला का नाही पकडत?’ एकदा तिच्या घरी जेवायला बोलावले होते. आणि ती जेवायला चल म्हणायला खूप उशीर केला. खूप भूक लागली होती. ती ज्यावेळी आली त्यावेळी मी चुकून तिला नको म्हटलं होत. मग काय उपास घडला. माझ्या बॉस ने एकदा मला माझी जन्म दिनांक विचारली त्यावेळी मी त्याला जन्म वर्ष २००९ असे लिहून पाठवले होते. आणि दहावीचा बोर्डाचा फॉर्म भरत असताना मी सरांना ‘सर मी मेल की फिमेल?’ अस विचारलं होत. अजूनही आठवल कि हसून हसून पोट दुखत. बाकी लेखांमधील चुका तर तुम्ही जाणताच.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.