मी स्वतः


एक पंचतंत्रातील गोष्ट आहे. एक अभ्यास पारंगत, विद्याभूषण नदीच्या कडेने चालले होते. तेवढ्यात त्यांना एका मुलाच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी वळून पहिले तर, एक मुलगा नदीच्या पाण्यात गटांगळ्या खात होता. त्या विभूतींना पाहून तो वाचवण्यासाठी विनंती करू लागला. त्यांनी त्याला पहिले आणि म्हणाले, ‘जर तुला पोहता येत नव्हते, तर मग तू पाण्यात गेलाच कशाला?’. त्या मुलाने चूक मान्य केली आणि पुन्हा वाचवण्यासाठी विनवणी करू लागला. परंतु हे महाशय त्याला उपदेशाचे डोसच पाजत बसले.

खरंच, मला अनेकदा आपणसुद्धा त्या विद्याभूषण प्रमाणे वागतो आहोत, अशी शंका येते. प्रत्येक गोष्टीत सरकारला दोष देत राहतो. रस्त्यांपासून ते पाण्यापर्यंत, सगळयाच गोष्टीत सरकार कसे चुकते आहे. याचीच चर्चा. गेल्या अनेक दिवसांपासून मी अनेक गोष्टींचे निरीक्षण करतो आहे. अगदी स्वतःचे सुद्धा. मी दुकानातून सामान खरेदी केल्यावर ‘प्लास्टिकच्या’ पिशवीची मागणी करतो. कंपनीत जागेवरून उठतांना मी पीसी ‘लॉक’ करतो. परंतु, मॉनिटर ऑफ करीत नाही.

रस्त्यांवर गर्दीतून गाडी चालवतांना, अनेकदा सिग्नल तोडण्यापासून ते रॉंग साईडने गाडी चालवण्यापर्यंत सर्वच गोष्टी मी अगदी बिनधास्तपणे करतो. तसे जेवतांना, ताटातील सर्व अन्न संपवतो. हेच काय ते योग्य करतो. असो! तो संस्काराचा भाग झाला. ते माहिती असेल ना! ‘गाढवापुढे वाचली गीता | कालचा गोंधळ बरा होता || – पण वाचणारा कोण होता ?’ आपणही मनमोहनच्या सरकारपुढे नेहमी काय करतो? अजून एक म्हण माहिती असेलच ‘यथा राजा तथा प्रजा’ याचे उलटे केले तर प्रश्नाचे उत्तर सहज मिळेल.

मला फक्त अस म्हणायचे आहे की, आपण असे आहोत म्हणून आपले सरकार असे आहे. माझ्या सोबत काम करणारे सहकारी, हे उच्च शिक्षण घेतलेले आहेत. पण नेहमी, वॉशरूम मध्ये तोंड हात धुतल्यावर पाण्याचा नळ व्यवस्थित बंद करीत नाहीत. असो! मला असे घडतांना दिसले की, मी स्वतः जावून तो बंद करतो. आणि हेच लोक दोन महिन्यांनी सरकारला पाण्यावरून दोष देत फिरतील. अशा एक न अनेक गोष्टी सांगता येतील. केंद्रात मनमोहनाचे सरकार का निवडून येते? राज्यात आघाडीच का आहे यांचे उत्तर मिळाले. मी स्वतःला बदलण्याचा मनापासून प्रयत्न करीत आहे. कदाचित ह्यातून काहीतरी बदल घडेल.

, ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.