मुलगी झाली


एक गोड बातमी आहे. मुलगी झाली. उशिरा सांगतोय, याबद्दल क्षमस्व! गेल्या महिन्यात, म्हणजेच नोव्हेंबरच्या दोन तारखेला दुपारी अडीचच्या सुमारास आमच्या घरी ‘कन्यारत्ना’चे आगमन झाले. बाळ आणि बाळाची आई दोघेही सुखरूप आहेत. बाळाचे दोन्ही आजी आजोबा जाम खुश आहेत. आणि बाळाचे बाबा बाळाच्या लीलात मग्न झाल्याने बोलायला उशीर झाला.

बस्स! याच्यापुढे मला अस, फॉर्मल बोलणे कठीण झालंय. जाम मस्ती चालू असते. त्यामुळे सगळा वेळ त्यातच जातो. चेहरा आणि हसणे आई प्रमाणे. बाकीच्या सवयी तिच्या बाबांप्रमाणे. खरच, गेले काही दिवस इतके सुंदर गेले आहेत की, कधी दीड महीना उलटला कळलेच नाही. मुलगी, मुलगा असं कधीच मनातही नव्हतं. उलट मुलगी अधिक काळजी घेत असे ऐकलेलं आहे.

तिच्या सवयी असल्या मजेदार आहेत ना. म्हणजे झोपतांना दोन्ही हात वर करून झोपते. आणि दुध पितांना पहीलवान ज्या पद्धतीने दंड फुगवतो त्याप्रमाणे. आणि तिच्या आवडीची गोष्ट म्हणजे भिंतीवरील पंखा. म्हणजे तो दिसला की झालं. बाईसाहेब एखाद्या ध्यानस्थ स्वाध्वीप्रमाणे मग्न होतात.

मग जसा अर्जुनाला पक्षाचा डोळा दिसला होता. तसा हिला पंखा. हे सगळंच मजेदार. मी देवाचा आणि माझ्या बायकोचा, दोघांचाही मनापासून आभारी आहे. एवढी ‘अनमोल’ भेट. खरंच, हा माझ्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण आहे. आणि याक्षणी मी स्वतःला परिपूर्ण आणि समाधानी मानतो. तृप्तीचा आनंद खरंच वेगळा असतो. यात ना अपेक्षा आणि ना अभिलाषा. तिचे रोजचे नवनवीन कृत्ये पाहून मनाला जो आनंद मिळतो तो अवर्णनीय आहे.

, ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.