मेट्रो


पुण्यात ‘मेट्रो’ रेल्वेचा प्रकल्प सुरु होणार आहे. खर्च दहा हजार कोटी. या शनिवारी आमच्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने आठ टक्के करवाढ मंजूर करून घेतली आहे. १०५ नगरसेवकांपैकी ३४ नगरसेवकांनी करच्या बाजूने मतदान केले. आणि अनेक नगरसेवक गैरहजर राहिल्याने तो प्रस्ताव मंजूर झाला. आता तो जो ‘मेट्रो’ रेल्वे प्रकल्प सुरु करण्याचा हट्ट आमच्या दोन्ही महानगरपालिकांनी घेतला आहे त्यापैकी एकाही महानगरपालिकेकडे पैसे नाहीत. काल परवापर्यंत बीआरटी च्या बसेस ३३० कोटी खर्च करून १५०० बसेस खरेदी या दोन्ही महानगरपालीकेंना जास्त खर्चिक वाटत होत्या. आता दहा हजार कोटी ही रक्कम लहान वाटत आहे. काय गणित आहे कुणास ठाऊक? बर स्वारगेट ते वाकडेवाडी मध्ये याचा पहिला टप्पा होणार आहे. इथे रस्त्याला जागाच नाहीत. आणि हे भुयारी मार्ग कुठून काढणार देव जाणे.

आमच्या दोन्ही महानगरपालीकेंना या आधी लोकल, नंतर बीआरटी चा चांगला अनुभव आहे. त्या गुजरातमध्ये तो बीआरटी प्रकल्प यशस्वी झाला. आम्हालाच का नेहमी यशाच्या पहिल्या पायरीवर उभे राहावे लागते? मला तर वाटत ‘अपयश ही यशाची पहिली पायरी’ म्हण पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या असल्या बिन कामाच्या उद्योगांमुळेच पडली आहे. माझ्या एकूण नोंदींपैकी निम्म्या नोंदी त्या लोकलच्या ढिसाळ कारभारावर आहे. पण गरज कोणाला? मागील शुक्रवारी मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वेबसाईटला एक इमेल पाठवला होता. विषय होता वेबसाईट मराठीत उघडावी आणि वाटल्यास डाव्या बाजूच्या कोपर्यात इंग्लिश मध्ये करण्याची लिंक असावी. बर आता सध्याला वेबसाईट इंग्लिशमध्ये उघडते. आणि डाव्या बाजूला कोपर्यात मराठीची लिंक आहे. पण आणखीन एक अडचण अशी की ज्या संगणकावर तो मराठी फोन्ट नाही तिथे केवळ चौकोन चौकोन दिसतात. आता ह्या इमेलचा काही रिप्लाय येईल याची मी ‘अपेक्षा’ केलेलीच नव्हती. आणि आला सुद्धा नाही. आता या शनिवारी त्यांना एक हाच अर्ज पुन्हा लिखित स्वरुपात देणार आहे. जर त्यांना वेबसाईट मराठीत दाखवता येणार नसेल तर मी त्यांना मराठीत बनवून द्यायला तयार आहे. आता हे देखील नमूद केल आहे.

बर असली साधी सोपी काम करायची ना. ते राहील बाजूला. हे न झेपणारी कर्ज आणि कर वाढवून करायची काम करायला ह्यांना सुचते. तीनशे तीस कोटी रुपये खर्च करून पंधराशे बसेस घेण सोप की दहा हजार कोटी रुपये खर्च करून ती मेट्रो आणण?. बर दिल्लीचा अनुभव काय आहे हे माहिती असताना देखील हे असले चाळे सुचातातच. बर खर्चाला पैसे कुठून आणणार. आपल्या केंद्र सरकारने महानगरपालिकेचे आधीच बरेच पैसे बुडवले आहेत. थोडा खर्च केला तर पुण्याची लोकल मुंबई प्रमाणे दर तीन मिनिटांनी धावू शकेल. बर त्याचीही योजना आणि हवी असलेली जागा रेल्वे खात्याने आधीच विकत घेऊन ठेवली आहे. खर्च करायचा आहे तो फक्त रेल्वेच्या रुळाचा. पण मग ते स्वस्तात होईल ना. म्हणून ते नको. एका वर्षानंतर येणाऱ्या निवडणुकात नगरसेवक कशाच्या बढाया मारणार? काही तरी हव ना पंजाला आणि घड्याळाला म्हणायला. बर ह्या दोन्हीही पालीकेंनी काम केलीच नाही असही नाही. पण शेवटी ‘भाई’ आणि ‘दादा’ हट्ट. ब्लेकबेरी , लैपटोप आणि आता मेट्रो.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.