यांना म्हणायचे खरे मित्र


जे आपल्याला कधीही आणि चुकूनही फोन करणार नाही. फार फार तर मिस कॉल. आणि केला तर काही ‘त्यांचे’ काम असेल तरच. आणि त्यांचे ते काम म्हणजे जणू काही ‘राष्ट्रीय संकट’ आहे, असा आविर्भाव आणतील. पण आपले काही काम असेल तर मग मात्र जणू काही अंगावर पाल पडल्याप्रमाणे वागतील. आपण फोन केला तर त्यांना फोन कट करण्याचा ‘जन्मसिद्ध’ हक्क. आणि आपण कट केला तर त्यांची नाराजी. ज्यांना त्यांची इच्छा महत्वाची वाटेल, आपली नाही. थोडक्यात त्याचं काम ‘काम’, आणि आपल काम ‘टाईमपास’.

ते रागावले तर, आपण स्वतःहून माफी मागायची. चूक असेल तरी आणि नसेल तरी. पण आपण रागावलो तर ‘गेला उडत’ या आविर्भावात वागणारे. कुठल्याही ठिकाणी जा. कॅन्टीन, हॉटेल किंवा साध्या टपरीवर. आपले पाकीट त्यांना त्यांचे पाकीट वाटेल. जर कधी स्वतःहून पैसे मागितलेच तर नंतर परत करायचे विसरून जातील. आपण मागितले तर मात्र, यांच्याकडे एकही रुपया नसेल. त्यांच्या गप्पा म्हणजे अनुभवाचे बोल, आणि आपल्या गप्पा बिनकामाचे बोल. ते डेस्कवर आले की, आपण पीसी सोडून त्यांना सुपूर्त करायचा. किंवा ते म्हणतील तसे वागायचे. आणि आपण त्यांच्या डेस्कवर गेलो की, त्यांना खूप काम असणार. ते कायम घोड्यावर असणार. आणि आपण नेहमी गाढवा मागे.

आपल्याला एखादी जरी आनंदाची गोष्ट घडली तरी त्यांना स्वखर्चाने ‘पार्टी’ द्यायची. आणि त्यांना पार्टी मागणे हा गुन्हा. ते आपल्या सोबत असतात की फोनसोबत हाच मोठा प्रश्न निर्माण होईल. अशा लोकांना खरे मित्र म्हणायचे. त्यांच्या घरी आपण जायचे, पण आपल्या नाही त्यांच्या कामासाठी. ते कधी चुकूनही आपल्या घरी येऊन आपली ‘कुटी’ त्यांच्या पदस्पर्शाने पावन करणार नाही. मग आपले घर त्यांना जणू काही ‘प्ल्युटो’वर आहे. असे वाटणार. आणि लांब देखील. ते आपल्याला कोणत्याच आनंदाच्या सोहळ्यात सामावून घेणार नाही. आणि आपल्याही सोहळ्याला येणार नाहीत. त्यांना चुकून एखादी आवडली तर मग मात्र, आपण दिवस रात्र एक करून तिला पटवून द्यायला श्रम घ्यायचे. आणि आपण कोणाच्या प्रेमांत पडलो तर मग मात्र, ‘कधी सुधारणार नाही’ असा शेरा मारणार. पुन्हा त्या मुलीच्या आपण कसे योग्य नाही हे पटवून देणार. हे तर कमीच ‘आपण नालायक’ ह्या अर्थाचा शेवट करणार. यांनाच खरे मित्र म्हणायचे..


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.