या गोजिरवाण्या घरात


यार, अप्सरा आल्यापासून सगळंच बदलते आहे. आणि रोज काही ना काही नवीन घडतं आहे. परवा मी बीसीएच्या परीक्षेला एन्रोल केल. काल म्हटलं, अभ्यासाला सुरवात करावी. माळ्यावर ठेवलेले पुस्तकांचे खोके काढावे. काढायला गेलो तर, खोक्यातली अर्धी पुस्तके पुस्तके राहिलीच नव्हती. म्हणजे कचरा झालेला. ते खोके देखील अनेक ठिकाणी कुरतडलेले. मी स्टुलावरून उभा राहून काढतांचा त्या पुस्तकांच्या अस्थींची अंघोळ झाली. दोरीवर ठेवलेल्या कपड्यांची देखील अंघोळ. आणि खोके खाली काढतांनाच एक भला मोठा उंदीर ‘मामा’ त्या खोक्यातून उडी मारून पळाला.

तीन महिन्यांपूर्वी एका उंदराला इथल्या एका मांजरीने पकडून नेले होते. पण नंतर माझ्या लहान भावांनी त्यांच्या सुट्ट्यात त्या मांजरीचे इतके लाड केले. एखादया बाळाचे त्याची आई देखील लाड करणार इतके लाड. आणि ती मांजर देखील तशीच ‘लोचट’. शेवटी त्या मांजराचे येणे बंद करावे लागले. नंतर दोन महिन्यांपूर्वी मांडणीतील कप्यात पाच उंदराची पिल्ले सापडले. आता त्यात आई कायम न वापरातील वस्तू ठेवायची. त्यामुळे तो कप्पा उघडलाच जात नसायचा. त्यातील एका उंदराच्या पिल्लाला आईने मारले. त्यावर मी आईला ‘जीव पुराण’ विषयावर तासाभराचे व्याख्यान दिले होते. आणि सगळी उंदरांची पिल्ले एक किमी लांब असलेल्या सरकारी कचराकुंडीत जाऊन टाकली. त्यावेळी वाटले सगळे उंदीर संपले. पण काल! हेमंत ‘आठ’ल्येच्या या गोजिरवाण्या घरात ‘आठ’ ‘गोजिरवाणी’ उंदराची ‘बालके’!

मग तो पळालेला उंदीर ‘मामा’ नसून ‘मामी’, नाही नाही ‘मॉम’ होती हे लक्षात आल. अप्सरा थोडी आधी भेटली असती तर, ह्या गोष्टीचा शोध आधी लागला असता. आणि मी ‘जनगणनेच्या’ वेळी अरे! पुन्हा चुकले. मला ‘जातगणनेच्या’ अस म्हणायचे होते. घरात एक व्यक्ती राहतो ही खोटी माहिती दिली नसती. माझ्यासोबत आठ मुलांची उंदीर ‘मॉम’ रहाते हे देखील सांगितले असते. कदाचित आपल्या सरकारने पुढे जाऊन त्यांनाही मतदानाचा आणि आरक्षणाचा कायदा केला असता. अरे हो, पण त्यांची ‘जात कंची?’ हा प्रश्न उभा राहिला असता. मग ‘२०११च्या जातगणनेत’ माझ्याकडून अडचण निर्माण झाली असती. मग त्यांनाही, जात पडताळणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात खेटे मारावे लागले असते. बिचाऱ्या ‘मॉम’ला त्रास झाला असता.

सोडा, जे होते ते चांगल्यासाठीच होते. तसे, माझ्या घरात झुरळ कुटुंब फार मजेत रहाते आहे. खूप वेळा त्यांनाही मी नोटीसा आणि कारवाई केली. पण त्यांना माझे हे घर सुद्धा फार आवडले आहे. आता त्यांना घटना किंवा हिंदू कायदा लागू होत नाही. त्यामुळे त्यांना कितीही वाढवले तरी चालते. थोडक्यात, ह्या गोजिरवाण्या घराच्या संपत्तीवर त्यांचा पहिला हक्क आहे. इति श्री/स्त्री पंतप्रधान उवाच. मग त्या मॉमच्या बालकांना सरकारी कचराकुंडीत राहायला पाठवले. सगळया पुस्तकांच्या अस्थी गोळा करतांना, माझा भूतकाळ माझ्या डोळ्यासमोरून गेला. मी अकरावीत असतांना वडिलांना मी ‘शिकण्यात मला काही रस नाही. मला शेती करायची इच्छा आहे’ अस म्हटले होते. आणि शेतात काय काय करायचे याची यादी देखील बनवली होती. त्या यादीची अस्थी गोळा करतांना त्याची आठवण झाली. क्लासमध्ये असतांना त्यावेळच्या वह्या, आणि ती ‘डायरी’. त्यांचे अवशेष पाहून फार वाईट वाटले. अगदी तो माझा संगणकाच्या जुन्या हेडफोनला आणि त्याच्या वायरीचे अवशेष पाहून ‘सगळे नश्वर आहे’ ह्या वाक्याची आठवण झाली.

इतिहास इतिहासात गेला. अनेक पुस्तकांच्या पानावर उंदीर मॉमने केलेली कलाकुसर पाहून फार आनंद वाटला. पण बरीचशी बीसीएची पुस्तके ठीकठाक आहेत. बहुतेक मॉम देखील अभ्यासाच्या बाबतीत माझ्याच प्रमाणे असेल. घाबरली बीसीएला. चला सगळ आवरता आवरता घामाच्या धारा सुरु झाल्या होत्या. आता ती पुस्तके तात्पुरती बाहेरच्या खोलीत ठेवली आहे. एका कपाटाची व्यवस्था करावी लागेल. असो, गोजिरवाण्या घरात बऱ्याच गोष्टींची आवश्यकता आहे, याची जाणीव झाली. बहुतेक या दिवाळीत ‘आय मॅक’चे स्वप्न स्वप्नंच राहाणार. काहीही असो, आता त्या मॉमला शोधून कुठे कुठे अजून तीच्या बच्चे कंपनीला सरकारी कचरापेटीत रवानगीची जबाबदारी पार पाडावी लागेल. त्यासाठी कोणत्या ‘हायकमांड’च्या आदेशाचे वाट पहावी, अस काही या गोजिरवाण्या घरात चालत नाही.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.