येजा वू


काय करू यार? देवाने माझ्या चित्रपटात तेच तेच सीन का टाकले तेच कळत नाही. बर ह्या विषयावर, मी खूप बोलायचे टाळत होतो. पण आज इतक्यांदा घडलं ना! सकाळी लवकर उठायचे ठरवून देखील आज मी उशिरा उठलो. आधीच खूप गोरा होता. दोन दिवस उन्हात भटकल्यामुळे आणखीन गोरा झालो. लेट मॉर्निंगची बससाठी सुद्धा धावपळ झाली. देवपूजा नाही झाली आज. बस स्टॉप गेलो तर ‘परीवहिनी’. गेल्या पंधरा वीस दिवसांपासून रोज कुठे ना कुठे दिसतातच. त्यांना विचारलं ‘बस गेली नाही ना अजून’. तर त्यांनी हसून ‘नाही’ म्हणाल्या. त्या गप्पा मारायच्या रंगात होत्या. असो, मी ‘टाळले’. मग पुन्हा एकदा, त्यांना पहिले तर त्या आपल्या हसरा चेहरा करून माझ्याकडे पहात होत्या. मग हे आधी कुठे तरी पहिले अस वाटायला लागले. बसमध्ये बसल्यावर, मी मुंबईला असतांना हे असल् ‘अर्धवट’, ‘अर्थहीन’ स्वप्न पडलेलं आठवलं.

बसमध्ये देखील ‘वहिनीसाहेब’ मला न्याहाळत होत्या. बहुदा, रंगाचा परिणाम. आज अप्सरा नाही आली. एकवेळ वाटलं चांगल झालं. कारण माझा आजचा ‘रंग’ पाहून तीचा रंग उडाला असता. खर तर माझाही उडालेला. पण नंतर तिची खुपंच आठवण यायला लागली. तीच्या मोकळ्या डेस्ककडे खूप वेळ पहात बसलो. तीच असल्याचा भास व्हायचा. यार मी, खूप मुर्ख आहे अस आता कळून चुकल आहे. मला आज ती तीच्या मैत्रिणीत देखील वाटत होती. म्हणजे नंतर मी स्वतःला सावरलं. पण तीच्या मैत्रिणीकडे देखील मी अप्सरेकडे पाहतो तस् पहिले. हे तर सोडा, अप्सराची ती सिनिअर. मी आधी म्हटलेलं ना! ती. ती आज लाल रंगाचा ड्रेस घालून आलेली. तीचा तो ड्रेस पाहून अप्सराची खूप आठवण यायला लागली. थोड्या वेळाने लक्षात आल की, तिची सिनिअर देखील मला पाहते आहे. अस दोनदा घडलं.

संध्याकाळी मित्राला ‘बाय’ करावं म्हणून गेलेलो. त्याच्या दुसऱ्या ‘रो’ मध्ये तिची सिनिअर फोनवर होती. काय अर्थ काढला कुणास ठाऊक. मला पाहून चेहरा खुलला सिनिअर बाईंचा. हा देखील बहुतेक रंगाचा परिणाम. मग हे देखील कुठेतरी पाहिलेलं अस वाटायला लागलेलं. आधी वाटलं, असंच डोक्यात विचार येत आहेत. पण नंतर विचार केल्यावर कुठेतरी नक्की हा ‘सीन’ घडलेला जाणवला. मग पुनः ते स्वप्न पडलेलं. ज्यावेळी पडलेलं त्यावेळी मी ह्या कंपनीत देखील नव्हतो. मग डोक जाम झालं. तसाच बसमध्ये येऊन बसलेलो. तर माझ्या पुढच्या स्टॉपवर उतरणारी ती ‘मिस्ट्री’ येऊन बसली, माझ्या बाजूच्या बाकावर. आता ती असे काही वागते ना! त्यामुळे ती खरंच एक ‘मिस्ट्री’ आहे. तिच्यासाठी बसमधील टाईमपास ‘मी’ आहे.

मागील आठवड्यात तिने असली खतरनाक ओठांची हालचाल केली होती ना. माझ्या बाजूचा हिरोला ते पाहून घाम फुटला होता. आणि त्याला घाम फुटलेला पाहून माझे हसून हसून दिवसभर पोट दुखले. सोडा, नंतर कधीतरी बोलू त्या ‘मिस्ट्री’बद्दल. बसमध्ये देखील अप्सराची खूप आठवण आली. मन हलक करावं म्हणून मी कंपनीच्या बसनेच निगडीत उतरलो. तिथेच एका हॉटेलात जेवलो. ती ‘मिस्ट्री’ भेळ चौकात उतरली. जेवण करून पुन्हा भेळ चौकातून चालेलो. त्यावेळी ती एका मुलाच्या बाजूला उभी. आणि तो हीरो कोणत्या तरी दुसऱ्या मुलाशी बोलत होता. अगदी तेच. आणि ही मिस्ट्री माझ्याकडे पहात होती. अगदी हेच मी आधी स्वप्नात पाहिलेलं. आता या स्वप्नाला एक वर्ष देखील झाले नसेल. स्वप्नात देखील मी भेळ चौकात वळतो तर एक मुलगी माझ्याकडे पहात असते. म्हणजे त्यावेळी देखील हिलाच पाहिलेलं. त्यावेळी देखील रस्त्याच्या दुसऱ्याच्या बाजूला मंडळाचा गणपती पाहावा म्हणून मी जाणार असतो. पण थोडे पुढे जाऊन पुन्हा मागे वळतो तर तीच ‘मिस्ट्री’ माझ्याकडेच पहात असते. अगदी आजही तेच घडलं.

आणि आता खूप डोक उठलं आहे. अस आजच घडलं अस नाही. पण आज तीनदा! सकाळी ‘परीवहिनी’ नंतर तिची ती सिनिअर आणि आता रात्री ती मिस्ट्री. याआधी देखील अप्सरा माझ्या डेस्कवर येऊन स्वतःहून बोललेली ना! ते देखील मी आधी स्वप्नात पाहिलेलं. त्यात देखील मी तिला तुझा घसा बसला आहे का अस मुद्दाम विचारलेलं. आता ना माझ्यातच काहीतरी खूप मोठा प्रॉब्लेम आहे अस वाटत आहे. हे असले चित्रविचित्र स्वप्न पडतात. आणि नंतर खरी देखील होतात. अस आजकाल खुपदा घडतं आहे. ते आधी डोळ्याची पापणी फडफड करायची. आता ते कमी झालं तर हे सुरु झालं आहे. यार मी दोन वर्षापूर्वी असंच स्वप्न पडलेलं होते. ते मी मित्रांना सांगितले, त्यावेळी त्यांनी माझी टर उडवली होती.

त्या स्वप्नात मी कोणत्यातरी ग्रुप सोबत बाहेर कुठे तरी फिरायला चाललेलो असतो. म्हणजे सगळे बाईकवर. आणि त्यातील एक मुलगी मला खूप आवडत असते. कोण होती हे त्या स्वप्नात देखील समजले नाही. पण ती एका ठिकाणी थांबल्यावर एका मुलाच्या बाईकवर बसलेली असते. आणि त्या मुलाच्या पाठीवर हात ठेवून सर्वांना सांगते की, हा माझा बॉयफ्रेंड. आणि मग मी फोन करून येतो अस म्हणतो. आणि थोडे लांब असलेल्या एसटीडी बुथ मध्ये जाऊन रडगाण्याचा कार्यक्रम करतो. ज्यावेळी पडले, त्यावेळी वाटले मला बाईक कुठे येते. पण आता येते ना! यार हे स्वप्न खर होईल की काय, याची आता खूप भीती वाटायला लागली आहे. याला देजा वू, अस काहीतरी म्हणतात अस प्रतिक्रियांमध्ये वाचलेलं. पण आज ते ‘देजा वू’ इतक्या वेळा घडलं ना की ‘येजा वू’ झालं.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.