योगायोग?


योगायोग आहे का काय चालले आहे हेच कळेनास झाल आहे. अस नेहमी नेहमी का घडते तेच कळत नाही. म्हणजे मागील आठवड्यात शुक्रवारी, एक कावळीण माझ्याकडे पहात चालली असते. माझ्या लक्षात आल्यावर मी तिच्याकडे पाहतो. ती मान खाली घालून निघून जाते. ती माझ्याकडे अशी का पहात होती याचा मी विचार करीत चाललो असतांना, पुन्हा एकदा ती तशीच माझ्या समोरून जाते. थोडक्यात ‘एक्शन रिप्ले’. आता हा जो ‘एक्शन रिप्ले’ घडला ना, तो इथे जॉईन होण्याच्या खूप आधी म्हणजे बहुतेक जून वगैरे महिन्यात स्वप्नात पाहिलेला. त्यावेळेसही मी स्वप्नात हाच विचार करीत होतो.

असो, याआधी अस अनेकदा घडल आहे. मध्यंतरी देखील असेच! एका मुलीचा चेहरा ओळखीचा वाटला. माझा मित्र दुकानातून काही वस्तू खरेदी करण्यासाठी गेलेला. मी दुकानाच्या समोरच्या बाजूला उभा. ती मुलगी देखील त्या दुकानात आलेली. ती माझ्याकडे पहात होती. माझ्या मित्राच्या बाजूला उभी होती. दोघेही एकाच वेळी माझ्याकडे पाहिलेलं. दोघांच्या चेहऱ्याची सारखी ठेवण पाहून मी थोडासा स्तब्ध झालो. तो आल्यावर मला सांगत होता की, ती मुलगी सिगारेटचे पाकीट खरेदी करायला आलेली. मग हेच कुठेतरी आधी पाहिल्याप्रमाणे वाटायला लागलेलं. मग लक्षात आले हे ‘वूवू’ झाल.

काय यार, हा योगायोग आहे की अजून काय? अस सारख घडायला लागलं की जाम टेन्शन येत. म्हणजे पहा, हा पाच आकडा कधी माझी पाठच सोडत नाही. माझ्या जन्म दिनांकात पाच, महिन्यात पाच आणि जन्म वर्षात देखील पाच. शाळेत असतांना हजेरी क्रमांक, ते सोडा. दहावीच्या बोर्डाचे हॉल तिकीट. त्यावरील माझा क्रमांकाच्या शेवटी पाच. माझा पहिला मोबाईल क्रमांकाच्या शेवटी देखील पाच. त्या आयसीएफएआयच्या आयडी नंबरच्या शेवटी देखील पाच. परवा बाईकची रक्कम भरायला गेलेलो, तिथेही रकमेच्या शेवटी पाच. बाकी माझा आताचा मोबाईल क्रमांक आणि माझा जुन्या कंपनीचा एम्पोई आयडी यातही शेवटी पाच येत होते. पण मी ते टाळले. आत याला काय म्हणायचे? योगायोग? अरे हो, आज बाईक घेऊन जा अस शोरूमवाल्यांनी सांगितलेलं. आजच्या दिनांकातही पाच होतेच की!

आता वडील म्हणाले आजचा दिवस अनिष्ट आहे. पुढच्या सोमवारी आण. असो, माझ काय जाते आहे. ते जस् म्हणतील तस्. आता गाडीचा जो नंबर भेटेल त्यातही तो पाच आला तर आश्चर्य वाटणार नाही. अरे आताच्या माझ्या वयातही शेवटी पाच. बर ते सोडा, ज्या कोण माझ्या चांगल्या मैत्रिणी आहेत ना, त्यांच्या प्रत्येकीच्या नावात ‘ल’. बर, ज्यांच्याशी माझ चांगल पटत ना! त्यातही जवळपास सर्वच नावातील इंग्रजी अक्षरांची संख्या सहा. आता अस का? हे मला देखील माहित नाही. अजून एक गोष्ट राहिली की, आई वडिलांनी कोणतेही स्थळ शोधले की कधी डावी तर कधी उजवी पापणी फडफडू लागते. अस प्रत्येक वेळी का घडते? कदाचित योगायोग..


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.