रद्दताई पाटील


कोणीही चिडायचे नाही आता! आठ जणांची फाशी रद्द केली म्हणून. करणारंच ना! एकतर त्यांना चीन, अमेरिका सारख्या ठिकाणी तुम्ही लोक फिरवता. काय खोट बोलू नका.. २६ मे ते ३० मे ला आजींना चीनला पाठवलं. एक तर इच्छा नसतांना इतक्या सह्या करायला लावल्या. त्या आधी २९ ऑक्टोबर ते १ नोहेंबर २००९ मध्ये साइप्रस, त्याआधी २६ ते २९ ऑक्टोबर २००९ ला इंग्लंडमध्ये. किती सह्या करायच्या त्यांनी? आणि हजार पानी रद्यांच्या कागदावर सह्याच नुसत्या. त्यात त्यांचे वय बघा ना!

आजींना डोळ्याच्या चष्म्याच्या बहिर्वक्र भिंगाचा नंबर किती वाढलाय ती रद्दी वाचून. हा कायदा आणि तो निर्णय. आणि किती कंडीशन आणि कलम. ह्याच गोष्टींमुळे कलामांनी पुन्हा राष्ट्राध्यक्ष व्हायचे टाळले. तरीही तुम्हाला कळत नाही. बर नको नको म्हणलं तरी आजीताई पाटीलांना राष्ट्राध्यक्ष केल. ह्या वयात सगळ समजत पण अंगात शक्ती नसल्याने कोणाचा तरी ‘सहारा’ लागतो. ‘सहारा’ चांगला असेल तर सगळे विधी व्यवस्थित होतात. नाहीतर सगळ्या क्रिया आहे तिथेच! आता हलण्यापासून ते बसण्यापर्यंत सर्वच ठिकाणी ‘सहारा’ लागतो. गेल्या काही वर्षांपासून आजीताई पाटील या सर्वच गोष्टीला कंटाळल्या आहेत. बघा ना, प्रत्येक महिन्याला पुण्यातील आपल्या नातवाला खेळवण्यासाठी येतात. त्याचं मन नाही रमत त्या ‘सोनियाच्या’ कारभारात.

काही तरी विचार करा आजींचा. मनमोहन नानांचे देखील असेच झाले आहे. बघा किती चेहरा सुकलाय आजीप्रमाणेच. मग काय करणार ‘दयेच्या’ अर्जांच्या फायली काढल्या आणि आजींनी केल्या न बघताच सह्या. आता वाचणार आणि मग सही करणार किती वेळ जाईल? आहे का इतका वेळ आजींना? त्यात वाचले तर अजून नंबर वाढेल. आणि अर्ज ‘वाचला’ तर तो फाशीचा कैदी ‘वाचेल’ का? तुम्ही पण ना.. सगळी चुकी तुम्हा लोकांची आहे. आधी आजींना या वयात असल्या जबाबदाऱ्या वाढवून दिल्या. आता नाही होत हो.. आधीही असेच सोनियाच्या इच्छेखातर आजींनी ती भयानक ‘लढाऊ विमान’ यात्रा सुद्धा केली. किती त्रास झाला आजींना. तुम्हाला मुळी काळजीच नाही आजींची. त्यात मनमोहन नाना सारखे काही ना काही सहीसाठी घेऊन येतात. त्यात ती वर्षभरासाठी ठरवलेली ‘वर्ल्ड टूर’.

त्यात आजींच्या आजोबांनी केलेली ‘प्रकरणे’. बर हे कमी म्हणून बाळाचे ‘घासदार’ बनण्याची इच्छा पूर्ण करायला किती खोकी, आणि दवादारू दिल्या. त्यात अजून नेहमीचे सरकारने पद्मभूषण सारख्या पुरस्कारांची खैरात वाटायची. वरतून भाषण ठोका. कस जमायचं? म्हणून मग आजीताई पाटलांना सगळ वाचायला वेळ नाही मिळत. रद्द केलेल्यांमध्ये एकाने पाच जणांचा खून करणारा ‘नर सम्राट’ होता. बघा चिडले ना! अस नाही हो, बघा अशा दयेने आपल्या भारताची सहिष्णुता किती विशाल आहे याची जगाला प्रचीती येते. आणि त्यातल्या त्यात आजीताई किती महान आहेत. त्यांच्यापुढे बुश काय आणि ओबामा काय? आजीताई जर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षा असत्या तर लादेन कधीच पकडला आणि नंतर दया घेऊन सुटून सुखरूपपणे अफगाणिस्तानात परतला असता. कारण गुन्हा काय हे आजींना कळण्याआधी सही झाली असती.

आणि हो उद्या चुकून ती ‘गुरु’जींची फाईल देखील आली आणि आजीबाईंना नेहमीचीच गडबड असेल आणि त्यांनी न वाचताच ‘सही’ केली तर भडकायचे नाही. मग सैनिकांचे बलिदान, पोलीस आणि गुप्तहेर लोकांची मेहनत आणि वकिलांचे प्रयत्न, सर्वोच न्यायालयाचा निर्णय असल्या बाष्कळ गप्पा मारायच्या नाही. आणि जर भारताचा जावई कसाबने दयेचा अर्ज सादर करण्याआधीच आजीबाईनी दया दाखवली आणि फाशी रद्द केली तर आजीबाई पाटलांना कोणीही ‘रद्दताई पाटील’ म्हणायचे नाही.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.