राजकारणातील क ख ग घ


बाळांनो, ‘राजकारण सोपे नोव्हे’ अस कोणी तरी म्हणून गेले. राजकारण शिकायचे आणि एक उत्तम राजकारणी बनायचे असेल. तर राजकारणाची बाराखडी यायलाच हवी. नाहीतर निवडणुकीच्या परीक्षेत नापास व्हाल. चला तर मग सुरु करूयात का?.. माझ्या मागे मोठ्याने म्हणा. प्रत्येकाने प्रत्येक अक्षराचा नीट अभ्यास करायचा बर का! त्यांचा अभ्यास केला तर परीक्षेनंतर चांगल्या ‘मंत्री’पदांनी खूप मोठे व्हाल. चला म्हणा.. ‘क’ रे ‘करप्शन’चा. बाळांनो, ‘करप्शन’चा अर्थ माहिती आहे ना? करप्शन म्हणजे भ्रष्टाचार. ते यायलाच हवं. नाहीतर राजकारणी बनू शकत नाही. ज्यांना अजूनही कळला नसेल त्यांनी लालू गुरुजींना मधल्या सुट्टीत भेटा.

दुसरा शब्द आहे ‘ख’ रे ‘खर्चाचा’. खर्च करता यायलाच हवा. नाहीतर ‘निधी’ कसा येणार. आणि करप्शन होणार कसं? चला पुढचा शब्द. हां! जर या दुसऱ्या शब्दाचा अर्थ कळला नसेल त्यांनी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत जाऊन समजावून घ्या. पुढचा शब्द, ‘ग’ रे ‘गप्पांचा’. गप्पा मारता यायला हव्यात. गप्पांना पैसे पडत नाहीत. निवडणुकीत लोकांना ‘रस्ते करू, पाणी आणू, वीज फुकट देऊ’ अशा गप्पा मारायला जमायला हव्या. आणि जरी पूर्ण करता आल्या नाहीत तरीही ‘प्रिंटींग मिस्टेक’ अशाही गप्पा मारता यायला हव्यात. गप्पा कोणत्या माराव्यात याचे उत्तम उदहारण २००४ साली प्रकाशित झालेलं कॉंग्रेसचा ‘जाहीरनामा’ हे पुस्तक वाचा. चला पुढंच.. ‘घ’ रे ‘घोटाळ्यांचा’. विरोधी नेत्यांचे असो अथवा नसो, पण ‘घोटाळे’ केल्याचा आरोप करता यायलाच हवा. नाहीतर निवडणूक परीक्षेत नापास व्हाल. ‘ङ’ रे ‘डान्सबार’चा. यावर अधिक भाष्य आबा गुरुजीच करू शकतील. ‘च’ रे ‘चमचेगिरीचा’. हे यायलाच हवं. नाही तर तुम्हा कोणाला सोनियाच्या उंबरठ्यावर उभे राहू देणार नाही. आणि हो! निवडणूक परीक्षेत दाढ्या कुरवाळत बसल्याशिवाय पास कसे होणार? चला पुढे.

‘छ’ रे ‘छक्या’चा. सर्वात महत्वाचे हे! ही गोष्ट जो करतो तो पंतप्रधान बनतो. म्हणजे पाकिस्तानच्या कारवायांचे नुसता निषेध करून मोकळा होतो. आपल्या पंतप्रधानांनी हे कसब जन्मभर पाळल आहे. युवराजसिंग, विरू किंवा सचिनचे ‘छक्के’ आणि या कलेचा काहीही एक संबंध नाही. ‘ज’ रे ‘जातीचा’. बाळांनो जातीचे सूत्र ज्याने उमगले तोच निवडणुकीच्या परीक्षेत पास होवून ‘मंत्रीपदाचे’ डिस्टिंशन मिळवले म्हणून समजा. ‘झ’ रे ‘झगड्यांचा’. एकाला कुरवाळा आणि दुसर्याला डीवचा म्हणजे मग आपोआप झगडा निर्माण होतो. आणि मग त्यात विरोधकाला अडकवा. आणि राज्य करा. याचा अभ्यास करायचा झाल्यास मिरजेत जयंतरावांना भेटा. ‘ञ’ रे ‘ञ’चाच. कारण बाळांनो, असल्या अवघडात कोणी राजकारणी पडत नाही. तुम्ही देखील पडू नका. ‘ट’ रे ‘टक्यांचा’ बाळांनो, कुठलेही टेंडर काढतांना या टक्यांचा विचार आधी करा. नाहीतर नंतर काही ‘अर्थ’ नाही. ‘ठ’ रे ‘ठोशाचा’. हे बाकी असलेच पाहिजे. नाहीतर अबू साबू डोक्यावर चढतात. ‘ड’ रे ‘डोक्याचा’. हे डोक सगळया ठिकाणी वापरायचे बर का बाळांनो. नाही तर राजकारणात ‘अर्थ’ रहाणार नाही. अधिक माहितीसाठी ललित मोदी गुरुजींना विचारा. ‘ढ’ रे ‘ढोसण्याचा’. हे बाकी कोणालाही न शिकवता येण्याची गोष्ट आहे.

चला पुढे.. ‘ण’ रे ना’ण्या’चा हेच राजकारणी लोकांचे ध्येय असते. याचा अर्थ गवार गुरुजींकडून शरद ऋतूत विचारा. ‘त’ रे ‘तडीपारीचा’. पुण्यातील पोलिसांना नाहीतर गृहमंत्रालयात जाऊन विचारा. त्यांना याची माहिती जास्त आहे. ‘थ’ रे ‘थंड’चा. डोक कायम असंच असायला हवं. नाहीतर ‘अहिंसा’ तत्व कसं पाळणार? ‘द’ रे ‘दान’चे. मंदिर आणि देवस्थानांना, लोकांना निवडणुकीच्या वेळी दान देऊन मत’दान’ वाढवून पास होता येत. ‘ध’ रे ‘धोक्याचा’. हे जमलेच पाहिजे. कारण राजकारणात कोणीच मित्र नसते. आणि काम संपल की धोका द्यायला जमायला हवा. अधिक माहिती गवार गुरुजींना विचारा. ते या कलेत पारंगत आहेत. ‘न’ रे ‘नाटकीपणा’चा. ही जमलीच पाहिजे. राहुलबाबा यात माहीर आहे. ‘प’ रे ‘पक्षांचा’. पक्ष म्हणजे राजकीय पार्टी. सगळे पक्ष समभाव ठेवायचा. तिकीट मिळाले नाही किंवा मंत्रीपदाच्या वेळी याचा उपयोग होतो. राणे गुरुजींना अधिक माहिती विचारा. ‘फ’ रे ‘फळ’चा म्हणजे काय मिळणार याचा विचार करायचा. फळ म्हणजे आंबा वगैरे नाही.

‘ब’ रे ‘बंद’चा. आता तुम्हाला याचा अर्थ चांगला माहिती आहे. सोमवारी बघितलं ना! खूप मोठे शस्त्र आहे. ‘भ’ रे ‘भक्तीचा’. देवाची नाही ‘हायकमांडची’. अशोक गुरुजींना चांगलंच माहिती आहे. म रे ‘मत’चा यासाठीच तर आणि यामुळेच तुमचे अस्तित्व आहे. हे प्रत्येक राजकारणीने कायम लक्षात ठेवावी. ‘य’ रे ‘योजना’चा. याशिवाय म्हणायला देशाचा आणि खरा स्वतःचा विकास केला अस कसं म्हणता येईल. ‘र’ रे ‘राजकारणाचा’. हेच  तर आपण शिकतो आहे ना! ‘ल’ रे ‘लाज’चा. ही जवळ ठेवायची गोष्ट नाही राजकारणात. बागवे गुरुजींना माहिती आहे. ‘व’ रे ‘वर्तमानपत्र’चा त्यांना देणग्या देऊन. आणि त्यांच्या पत्रकारांना ‘गिफ्ट’ देऊन खुश ठेवायचे. म्हणजे आपल्या विरोधात बातमी छापली जात नाही. इति श्री. गवार गुरुजी. ‘श’ रे ‘शक्ती’चा. ही जवळ ठेवायचीच. नाहीतर कोणीही तुम्हाला संपवून टाकील. ‘ष’ रे ‘षटकार’चा. राजकारणातील षटकार म्हणजे चर्चा, बैठकी, बोलणी, आश्वासने, करार, निषेध. आता सगळे जवळपास सारखेच आहेत. परंतु आपले पाक धोरणाच्या वेळी याचा फार उपयोग होतो. ‘स’ रे ‘सही’चा. करता आलीच पाहिजे. नाहीतर तुम्हालाही लोक ‘राष्ट्रपती’ म्हणतील. ‘ह’ रे ‘हसण्याचा’. हे सगळ्यांत महत्वाचे. नाहीतर फोटोत तुम्ही छान कसे वाटणार? सुशीलकुमार गुरुजींना बघा. त्यांचा आदर्श घ्या.

ठीक आहे बाळांनो. तास संपत आलेला आहे. उद्या येतांना बाराखडी पाठ करून यायचे नाही तर वर्गातून निलंबित करील. काय आता निलंबन माहित नाही. ‘राजू’ सांग रे…


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.